Home | विज्ञान तंत्रज्ञान | पुरुष बनतात धूम्रपानामुळे मूर्ख

पुरुष बनतात धूम्रपानामुळे मूर्ख

धूम्रपानाच्या दुष्परिणामांमध्ये आता आणखी एका दुष्परिणामाची भर पडली आहे. एका नव्या संशोधनानुसार धूम्रपानाचे मेंदूवरही दुष्परिणाम होत असून, जे पुरुष धूम्रपान करतात त्यांच्या मेंदूचा -हास धूम्रपान न करणा-या पुरुषांच्या तुलनेत अतिशय झपाटय़ाने सुरू होतो. मात्र, धूम्रपान व स्त्रियांमधील मेंदूचा -हास यामध्ये तशाच प्रकारचा संबंध असल्याचे शास्त्रज्ञ सिद्ध करू शकले नाहीत.

 

यापूर्वी धूम्रपानामुळे केवळ फुप्फुसाचे आजार, कर्करोग व हृदयरोग होत असल्याचे समजले जात होते. मात्र, वाढत्या वयानुसार धूम्रपानाचे दुष्परिणाम अधिक ठळक होऊ लागतात. साधारणपणे वयाच्या 45 व्या वर्षापासून ते दिसू लागतात. हे दुष्परिणाम केवळ अतिधूम्रपान करणा-यांमध्येच नव्हे तर मधूनमधून धूम्रपान करणा-यांमध्येही निर्माण होत असल्याचे आढळले आहे. या संशोधनासाठी ब्रिटनच्या नागरी सेवेतील सुमारे 6000 पुरुष व 2100 महिलांचे निरीक्षण करण्यात आले. त्यांच्या विचार करण्याच्या क्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी या सर्व प्रतिसादकर्त्यांना त्यांच्या वयाच्या मध्यावर म्हणजे सरासरी 56 व्या वर्षी पहिले मानसिक मूल्यमापन देण्यात आले. या मूल्यमापनामध्ये त्यांनी पाच चाचण्या समाविष्ट केल्या. या चाचण्या स्मरणशक्ती, शब्दसंपदा व कारणमीमांसा(तोंडी व गणितीय) कौशल्यावर आधारित होत्या. एका दशकामध्ये दर पाच वर्षानी या प्रतिसादकर्त्यांच्या पुन्हा चाचण्या घेण्यात आल्या.

 या प्रतिसादकर्त्यांच्या 25 वर्षातील धूम्रपानाच्या सवयी निश्चित करण्यासाठी संशोधकांनी त्यांच्या तेव्हाच्या व सध्याच्या धूम्रपानाच्या सवयी व पूर्वेतिहास यांचा अभ्यास केला. मधल्या काळात त्यांनी धूम्रपान सोडले किंवा पुन्हा सुरू केले हेदेखील त्यांनी जाणून घेतले. या प्रतिसादकर्त्यांमधील मध्यमवयीन पुरुषांमध्ये जे सध्या धूम्रपान करणारे होते त्यांच्यात धूम्रपान न करणा-या पुरुषांच्या तुलनेत गतिमान मानसिक ऱ्हास दिसून आला. मात्र, ज्या पुरुषांनी धूम्रपान सोडल्यानंतर ते या सवयीपासून किमान 10 वर्षे दूर होते त्यांच्यात हा -हास आढळला नाही.