पुरुषी दृष्टिकोनालाच आव्हान!
हाच प्रश्न लोकलमधून प्रवास करणा-या काही मुलींना विचारला असता, मी काय करणार, असा प्रश्नच जवळपास प्रत्येकीने उपस्थित केला. मुलुंडला राहणारी रेश्मा काळे म्हणते, ‘मनात असूनही प्रत्युत्तर देऊ शकत नाही. एकच भीती वाटते, आज आपण बोललो नि उद्या डूख धरून त्याच्या मित्रांना घेऊन येऊन उलट-सुलट काही केलं तर, मी एकटीनेच प्रवास करते. स्वत:चे संरक्षण मी कसे करणार’ त्यावर रोजा फर्नाडिस म्हणाली, ‘ऐसे लुख्खे लोगों से क्या डरना? निर्लज्जपणे एखादी व्यक्ती आपला अपमान करत असताना आपण समाजाची भीड का ठेवायची, त्याच्या मुस्काटात देऊन त्याच्या सभ्यतेची लक्तरे का उतरवायची नाहीत.’ तिचे वाक्य अध्र्यावर तोडत, सेजल शर्मा म्हणाली, एखाद्या मुलीने हिंमत दाखवून कोणाला मारले तरी इतर लोक बघ्याची भूमिका घेतात. त्यामुळे कोणीही अशा गोष्टींकडे दुर्लक्षच करते. गेल्या वर्षी लोकलमधल्या प्रवासात, रात्री उशिरा एक गर्दुल्ला महिलांच्या डब्ब्यात चढला. हवालदाराचा पत्ता नव्हता. मी इतर महिलांना म्हटले, त्याला सगळ्यांनी मिळून लोकलमधून खाली उतरवू या. कोणी ऐकायलाच तयार नाही. सगळ्या गुपचूप डब्याच्या एका बाजूला जाऊन बसल्या.’
माणसाची ही वृत्ती स्वाभाविक आहे. खरंतर अशा प्रसंगात डब्यात असलेल्या 10-15 महिला एकत्र त्या गर्दुल्याविरोधात उभ्या ठाकल्या तर तो विकृत चाळे करण्यास धजावेल का, पण आपल्याकडे ‘मला या गोष्टीचा त्रास होत नाही, तर मी का बोलू,’ ही भावनाच बळावत असल्याचे दिसते. महिलांच्या डब्यात महिलेचाच धक्का लागल्यावर एकमेकींच्या झिंज्या उपटण्यात आपण मागे राहत नाही. मग, ही कजाग वृत्ती रस्त्यावरच्या लफंग्याविरोधात का जागृत होत नाही? या गप्पा उत्सुकतेने ऐकणारी परमिंदर सिंगदेखील या चर्चेत सामील झाली. ती म्हणाली, ‘मुलींनी छोटा चाकू जवळ बाळगण्यात काय हरकत आहे. स्वसंरक्षणाचा अधिकार कायद्याने सर्वानाच दिला आहे. मिरचीची पूड रामबाण उपाय. छोटी डबी ठेवायची बॅगेत. कोणी आलाच अतिप्रसंग करायला तर तेवढय़ा तयारीत आपण राहायलाच हवे. माझी मैत्रीण बसने प्रवास करते. तिच्या हातात सेफ्टी पीन तयारच असते. कोणी उगाचच अंगलट करायला आला की, ती सरळ त्याला पीन टोचायची.’गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये विल्सन कॉलेजमधल्या बीएमएमच्या पाच मुलींनी छेडछाडीविरोधात ‘चप्पल मारूंगी’ मोहीम सुरू केली होती. फेसबुकवरही ‘चप्पल मारूंगी’चे पेज खूपच पॉप्युलर झाले होते. जवळपास 600 जणांनी या मोहिमेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. ही मोहीम सुरू करणा-यांपैकीच आलिशा शर्मा म्हणते, ‘मुली किंवा महिलेला रोजच टिंगल-टवाळ्यांना किंवा नको त्या स्पर्शाना सामोरं जावं लागत असतं. अशा वेळी आपल्याकडे असलेले एकमेव शस्त्र म्हणजे, चप्पल. मागेपुढे न पाहता सरळ चप्पल काढून या रोमिओंना मार दिला तर पुन्हा ते असा फालतूपणा करण्यास धजावणार नाहीत.’
एकूणच बोटावर मोजण्याइतपत स्त्रिया स्वत:च्या आत्मसन्मानाबाबत जागृत असल्या तरी कित्येक स्त्रिया अशा प्रसंगांमध्ये हतबल होताना दिसतात. सद्य:स्थिती पाहता भविष्यातही अशा घटना थांबणे अशक्यच दिसते. कारण समाजाचा स्त्रीकडे पाहण्याचा भोगवादी दृष्टिकोन अजूनही बदललेला नाही. पुढेही तो बदलेल, असे दिसत नाही.