डर्टी पिक्चर!डर्टी मिडिया!
‘डर्टी पिक्चर’ हा चित्रपट पाहण्यासाठी नागपूरच्या चित्रपटगृहात गेलेले काही आमदार व मान्यवर यांचे चित्रण करण्याचा इलेक्ट्रॉनिक मिडियाचा अयशस्वी प्रयत्न व त्या प्रकारावरून आलेल्या ब्रेकिंग न्यूज, यामुळे मागच्या आठवडय़ात इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडियामध्ये बराच धुरळा उडाला. भक्ष्याला जिवंतपणी चोची मारून घायाळ करणारे कावळे किंवा कलेवराच्या मांसाचा शेवटचा तंतू ओरबाडून खाणारी गिधाडे जशी दबा धरून बसतात, त्याप्रमाणे एका चित्रपटगृहाबाहेर इलेक्ट्रॉनिक मिडियाचे कॅमेरे ‘डर्टी पिक्चर’ ही शोकांतिका पहाण्यासाठी गेलेल्या मान्यवरांना कॅमे-यात कैद करण्यासाठी टपून बसले होते. मान्यवर काही कॅमे-यांना कैद करता आले नाहीत, परंतु त्यांची वाहने मात्र कॅमे-यात आली. मग त्या वाहनांची दृष्ये फिरून फिरून दाखवून चिखलफेक करण्याचा नेहमीचा यशस्वी प्रयोग पुन्हा रंगविण्यात आला.
‘डर्टी पिक्चर’ ही दाक्षिणात्य अभिनेत्री सिल्क स्मिता हिच्या वास्तव जीवनावर व करुण अंतावर आधारलेली शोकांतिका. अनेक कारणांमुळे हा चित्रपट गर्दी खेचत आहे. अभिनेत्री विद्या बालन हिच्या या चित्रपटातील कसदार अभिनयाबद्दल सर्व स्तरांमध्ये तिला वाखाणले जात आहे. सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर किंवा संपविण्यात आल्यानंतर रिकाम्या वेळेत काही मान्यवरांनी हा चित्रपट पाहिला. अशा वेळी जणूकाही या मान्यवरांना चित्रपटगृहातून बाहेर येताना दाखवून आपण मोठी चोरी पकडून दिल्याचा इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा आविर्भाव होता, परंतु, तो प्रत्यक्षात फसला.
या सर्व प्रकारातून काही प्रश्न उभे राहतात. पत्रकारिता म्हणजे काय, पत्रकारांची बांधिलकी कोणाशी, कोणाच्याही खासगी आयुष्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा पत्रकारांना अधिकार आहे काय आणि सरतेशेवटी पत्रकारांनी समाजासमोर काय मांडावे, या प्रश्नांबाबत गांभीर्याने विचारमंथन होण्याची गरज आहे. पत्रकाराची पहिली बांधिलकी सत्याशी आहे आणि त्यांची निष्ठा जनसामान्यांप्रती आहे. स्वतंत्र समाजामध्ये सुविहितपणे काम करता यावे, यासाठी नागरिकांना विश्वासार्ह आणि अचूक माहिती उपलब्ध करून देणे, हे पत्रकारितेचे मूलभूत कर्तव्य मानले जाते. याबरोबरच बातम्या देत असताना समाजाच्या हिताच्या दृष्टीने त्या बातमीचा कितपत उपयोग होणार आहे, याचासुद्धा विचार होणे गरजेचे आहे. कोणाच्याही खासगी आयुष्यात परवानगीशिवाय डोकावण्याचा किंवा ढवळाढवळ करण्याचा कोणताही अधिकार कोणालाही नाही. मागच्या आठवडय़ातील नागपूर येथे घडलेल्या या प्रकारामुळे ही बाब अधोरेखित झाली.
बातम्या देताना तारतम्य दाखविण्याबाबत इलेक्ट्रॉनिक मिडियाला अनेक वेळा अनेक स्तरांवरून उपस्थित झालेल्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागली आहेत. इलेक्ट्रॉनिक मिडियातील तारतम्याच्या अभावाची अनेक उदाहरणे आहेत. नुकतेच गाजलेले एक उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री. शरद पवार यांच्यावर हरिवदर सिंग या माथेफिरूने केलेला हल्ला. एका वेडसराने केलेले हे कृत्य इलेक्ट्रॉनिक मिडियाने दिवसभर व त्यानंतर अनेक दिवस वारंवार दाखवून शरद पवारसाहेबांच्या प्रतिष्ठेला आपण धक्का पोहोचवत नाही ना, याचा विचार केला नाही. अशा अनिर्बंध प्रसारणाचा समाजमनावर काय परिणाम होतो, आपण लोकांना हिंसेची चिथावणी तर देत नाही ना, याचा विचार केला गेला नाही. मिडियाच्या या अशा बेजबाबदार वर्तनामुळेच प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मा. न्यायमूर्ती श्री. मार्कंडेय काटजू यांना प्रेस कौन्सिलला शिक्षा करण्याचे अधिकार मिळावे, तसेच कौन्सिलची व्याप्ती इलेक्ट्रॉनिक व इंटरनेट मिडियापर्यंत वाढवावी, असे विचार मांडावे लागले.
‘डर्टी पिक्चर’च्या संबंधात नागपूर येथे घडलेल्या प्रसंगामुळे डर्टी मिडियाचे हे अंग चर्चेत आले. एखाद्या विषयावर निर्बंध घातल्यास तो वेगाने फोफावतो आणि अनिर्बंध वाढणा-या चुकीच्या गोष्टींबाबत शेवटी समाजच दखल घेतो. मिडियाने, मग तो इलेक्ट्रॉनिक असो की अन्य, असेच अनिर्बंध वागत रहायचे की स्वत:च स्वत:वर काही आचारसंहितेची किमान बंधने घालून घ्यायची याचा निर्णय मिडियानेच घ्यायचा आहे.
