Home | यंगिस्तान | नवा 'मेस्सी'हा

नवा 'मेस्सी'हा

यूईएफएचॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीचा सामना. स्थळ रोमचं मैदान. समोरासमोर उभे ठाकले होते बार्सिलोना आणि मॅन्चेस्टर युनायटेड. स्पर्धेच्या केंद्रस्थानी होते मॅन्युचा ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि बार्सिचा लिओनेल मेस्सी. झावीने दिलेला पास मेस्सीनं अगदी चपळाई दाखवत हेडरमारून जाळीत लोटला. आणि एकच जल्लोष झाला. बार्सिचा हा दुसरा गोल हाच विजयश्री मिळण्यास महत्त्वपूर्ण ठरला. २१ वर्षाच्या मेस्सीचा डोळ्यांचं पारणं फेडणारा हा गोल संपूर्ण जगभरातील फुटबॉल रसिकांनी श्वास रोखून पाहिला. मैदानावर साक्षात मॅराडोनाच खेळत असल्याचा भास होत होता. सर्वत्र लौकिक पोहोचलेल्या मेस्सीचा इथवरचा प्रवास अर्थातच सुखाचा नाही. केवळ तीन वर्षाच्या कालावधीत अनेक समस्यांवर मात करून फुटबॉलसारख्या खेळात मारलेली मुसंडी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेली प्रगती प्रत्येकाला तोंडात बोट घालायला लावणारी आहे.

 

मेस्सीचा जन्म अर्जेंटिनाचा. वडील जॉर्ज एका फॅक्टरीत साफसफाईचं काम करत. दोन भाऊ आणि एक बहीण असा त्याचा परिवार. अवघ्या पाचव्या वर्षीच फुटबॉलशी नातं जडलं. नेवेल्स ओल्ड बॉईज या क्लबमधून त्यानं फुटबॉल जगतात पदार्पण केलं. फुटबॉल हेच सर्वस्वी बनलेल्या मेस्सीला ११ व्या वर्षीच अनपेक्षित धक्का बसला. अचानक त्याच्या रक्तामधील संप्रेरकाची वाढ थांबली. त्याची उंची ४ फूट ४ इंचापेक्षा जास्त वाढणार नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. उपचारासाठी महिन्याला १५०० डॉलर एवढा खर्च येणार असल्यामुळे कुटुंबावर संकटाचं आभाळच कोसळलं. लाखांत एखाद्यालाच होणाऱ्या या रोगानं नेमकं मेस्सीलाच गाठलं होतं. घरची परिस्थिती हलाखीची असल्यानं खर्च पेलवणारा नव्हताच. त्यातच अर्जेटिनाला आर्थिक मंदीनं ग्रासलं होतं. फुटबॉलपटू बनण्याचं स्वप्न डोळ्यांदेखत धुळीस मिळत होतं. सुरू होण्याआधीच कारकीर्द संपण्याची वेळ आली असतानाच बार्सिलोना क्लबचे डायरेक्टर कार्लेस रेक्सेच यांचं मेस्सीकडे लक्ष गेलं. एकाग्रता..तीक्ष्ण नजर..चपळाई.. वेग..आणि पापणी लवताक्षणी प्रतिस्पध्र्याना चकवण्याची ताकद या गुणांमुळेच बार्सिलोनानं दुर्धर विकारासह त्याला स्वीकारलं. ऐन मोक्याच्या वेळी बार्सिलोनानं मदतीचा हात पुढे केला होता. त्यानंतर मात्र मेस्सीनं कधीच मागे वळून पाहिलं नाही. एक से बढकर एक कामगिरी करत विजयाचा झंझावात सुरू ठेवला.

 

विंगरअसलेल्या मेस्सीचं बलस्थान आहे, आक्रमक ड्रिबलिंग (चपळाईनं चेंडू घेऊन जाणं)आणि डॉजिंग (प्रतिस्पर्ध्याला हुलकावणी देणं) यात त्याचा हातखंडा आहे. त्याची कमी उंची हाच त्याचा प्लस पॉइंट ठरला. मेस्सीच्याच खेळामुळे नेदरलँडमधील २००५ चा फिफा वर्ल्ड यूथ चॅम्पियनशिपहा ज्युनिअर विश्वकप अर्जेटिनानं जिंकला. स्पर्धेतील गोल्डन बॉलआणि गोल्डन शूजचा मानकरी मेस्सीच ठरला. चीनच्या ऑलिम्पिकमध्ये अर्जेटिनाला सुवर्णपदक मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. अनेक सामनेजिंकण्यात मोलाचा वाटा असलेला मेस्सी अर्जेंटिनासाठी मसिहा ठरलाय. २००६ च्या वर्ल्ड कप संघात रॉड्रीगेज, हेर्नन क्रेस्पो, रिवेलमी अशा दिग्गजांची वर्णी असतानासुद्धा मेस्सीनं मेहनतीच्या जोरावर आपली नोंद घ्यायला भाग पाडलं. याच वेळी उदयोन्मुख खेळाडूचा किताबही पटकावला. जागतिक फुटबॉल महासंघातर्फे दरवर्षी उत्कृष्ट फुटबॉलपटू निवडण्यासाठी मोठा सोहळा आयोजित करण्यात येतो. गेली दोन वर्षे मेस्सीला उपविजेतेपद मिळालं. यंदा तर रोनाल्डो आणि मेस्सी यांत कमालीची चुरस होती. मैदानावरही बार्सिलोना विरुद्ध मॅन्चेस्टर युनायटेड यापेक्षा मेस्सी विरुद्ध रोनाल्डो असाच सामना रंगत असे. चेंडूवर नियंत्रण ठेवण्याचे कौशल्य.. लीलया पास देऊन हुलकावण्याची क्षमता.. बचावपटूला मदतीस धावून जाण्याची संघभावना यामुळे अगदी कमी वयातच तो एक आघाडीचा खेळाडू बनलाय.

 मैदान गाजवणारा हा खेळाडू मात्र खूपच लाजाळू आहे. सुरुवातीस त्याला नीट हॅलो म्हणायलाही जमत नव्हतं. अर्जेटिना संघात माझी जागा घेणारा खेळाडू आलाय. त्याचं नाव आहे लिओनेल मेस्सी,’ असं सांगून फुटबॉल खेळातील बाप माणूसदिएगो मॅराडोनाने मेस्सीच आपला वारसदार असल्याचं सांगितलं. पेले, मॅराडोनानंतर अल्पावधीतच जगाचं लक्ष वेधून घेणारा अन् प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या मनात धडकी बसवणारं वादळ म्हणजे लिओनेल मेस्सी. आजवरच्या कामगिरीतून या वादळाच्या तडाख्यातून कुणीच वाचू शकत नसल्याचं त्यानं दाखवून दिलंय.