मधुमेह- नियंत्रित आहार, मुक्त विहार
मधुमेहामध्ये आहाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. आहारतज्ज्ञांच्या मदतीने नियंत्रित प्रमाणात आहार घेतल्यास वजनवाढ रोखली जाते. त्याचप्रमाणे नियंत्रित आहारामुळे साखर रक्तामध्ये प्रमाणात मिसळली जाते. परिणामी इन्सुलीनचं कामही सोपं होतं. म्हणूनच योग्य आहारामुळे मधुमेह नियंत्रित राहायला मदत होते.
मधुमेह चोरपावलांनी शरीरात प्रवेश करतो. मधुमेह झालेला लक्षात येत नाही आणि लक्षात येतं तेव्हा त्याने शरीरात चांगलेच हातपाय पसरलेले असतात. ब-याच वेळा त्याचा कोणताही त्रास जाणवत नाही. पण अशक्तपणा, थकवा जाणवणं, कशातही उत्साह नसणं, खूप तहान लागणं, परिणामी जास्त आणि वारंवार लघवी होणं, सारखी भूक लागणं, जखमा लवकर भरून न निघणं, दृष्टी दुर्बल होणं, सतत डोळ्यांचे विकार होणं, त्वचा कोरडी पडणं ही मधुमेह ओळखण्याची काही ढोबळ लक्षणं आहेत. अशा वेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून ताबडतोब तपासणी करून घेणं अत्यंत आवश्यक आहे.
रजोनिवृत्तीनंतर मधुमेही स्त्रीला हृदयरोग होण्याचं प्रमाण मधुमेह न झालेल्या स्त्रीपेक्षा जास्त असतं.मधुमेहाचं निदान झालं की, पुढील संभाव्य धोके टाळण्यासाठी तो नियंत्रित ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. त्यासाठी योग्य आहार आणि विहार महत्त्वाचा आहे. एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून मधुमेहाविषयी माहिती मिळवणं आणि त्यापासून उद्भवणा-या विविध समस्या समजावून घेणं सर्वात महत्त्वाचं असतं. त्याचप्रमाणे डॉक्टरांच्या सूचना आणि सल्ल्यांचं शक्यतो तंतोतंत पालन करणं आणि नियमित रक्तातील साखरेची पातळी तपासणीसुद्धा गरजेचं आहे.
मुख्य म्हणजे मधुमेहींनी जीवनात नेहमी शिस्तीचं पालन करणं गरजेचं आहे. मधुमेहामध्ये आहाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. आहाराचं योग्य प्रमाण, पौष्टिकता आणि जेवणाच्या वेळा पाळणं महत्त्वाचं असतं. आहारतज्ज्ञांच्या मदतीने नियंत्रित प्रमाणात आहार घेतल्यास वजनवाढ रोखली जाते. त्याचप्रमाणे नियंत्रित आहारामुळे साखर रक्तामध्ये प्रमाणात मिसळली जाते. परिणामी इन्सुलीनचं कामही सोपं होतं. म्हणूनच योग्य आहारामुळे मधुमेह नियंत्रित राहायला मदत होते. नियंत्रित आहार याचा अर्थ कमी मीठ-मसाल्याचं बेचव अन्न घेणं असा एक सर्वमान्य समज आहे. पण तो पूर्णत: चुकीचा आहे. अन्नपचनकार्याला असलेल्या मर्यादेमुळे उलट मधुमेहींना समतोल आणि सकस आहाराची गरज असते.
वय, वजन, जीवनशैली, मधुमेहाची तीव्रता आणि असलेले इतर आजार या सा-यांचा अभ्यास करून आहारतज्ज्ञ आहाराचा तक्ता तयार करतात. तसंच रुग्णाचं आदर्श वजन ठरवून रक्तातील साखर नियंत्रित राहण्यासाठी आवश्यक असणा-या कॅलरीज (उष्मांक)सुद्धा ठरवतात. आहाराचा तक्ता तयार करणं म्हणजे कमी खाऊन शरीर भुकेलं ठेवणं नव्हे, तर आहाराची योग्य आखणी करणं होय. त्यामुळे कमी उष्मांकामध्ये शरीराला पोषक घटक मिळून शरीराची अन्नाची गरजसुद्धा पूर्ण होते. अशा आहारामुळे आदर्श वजन कायम राहण्यासाठी मदत होते.
आहारतज्ज्ञांनी तयार केलेल्या तक्त्यामध्ये शरीराला आवश्यक असलेली पौष्टिक, स्निग्ध, कबरेदक, प्रथिनं, जीवसत्त्वं आणि तंतुमय पदार्थ (चोथा) यांचं योग्य प्रमाण असतं. मधुमेहामध्ये आहारातील चोथ्याला जास्त महत्त्वं आहे. कारण चोथ्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहायला मदत होते. योग्य आहारामुळे वजनघट आपोआप होते. शिवाय इन्सुलीनची कार्यपद्धतीसुद्धा सुधारते. एकदा आहारतज्ज्ञांकडून रोजच्या उष्मांकाची असलेली गरज समजावून घेतली की, त्या उष्मांकामध्ये बसणारं आणि पौष्टिक घटक असलेलं अन्न निवडण्याचं काम रुग्णांनी केलं पाहिजे.
पर्यायी अन्नपदार्थ आणि चोथायुक्त पदार्थ यांचं ज्ञान मिळवावं. त्यामुळे आहारातील तोचतोचपणा टाळता येतो. सर्वसाधारणपणे मधुमेहींना भूक सहन होत नाही. वरचेवर भूक लागल्याने ते खात सुटतात आणि वजनवाढीला बळी पडतात. म्हणूनच त्यांना नेमून दिलेल्या उष्मांकाचं अन्न दिवसभरात सहा ते सात वेळांत विभागून त्या-त्या वेळेस खाणं गरजेचं आहे. त्यामुळे शरीर तृप्त राहतं. परिणामी थकल्यासारखं वाटणं, चिडचिडणं हे त्रास उद्भवत नाहीत. शिवाय नियंत्रित उष्मांक शरीरात जात असल्याने वजनवाढीचं भयसुद्धा राहत नाही.
मधुमेहींनी आहारात काही निवडक पदार्थ वज्र्य केले, तर त्यांचं जगणं सुसह्य व्हायला खूप मदत होईल. साखरयुक्त मिठाई, आइस्क्रीम, कँडी, चॉकलेट इत्यादी पदार्थ टाळणं अत्यंत आवयक आहे. त्याचप्रमाणे पिष्टमय पदार्थ असलेले बटाटे, रताळी इत्यादी पदार्थ, तळलेले पदार्थ, मैद्याचे पदार्थ, अंडी, मटण, पनीर, चीज, खवा, लोणी मधुमेहींनी शक्यतो टाळावीच. गोड फळं उदा. आंबा, केळी, चिकू, द्राक्षं इत्यादी फळंसुद्धा टाळणं गरजेचं आहे. त्याऐवजी संत्र, मोसंब, पेर, पपया, सफरचंद, आवळा, जांभूळ, कलिंगड ही फळं खावीत.
मासे खाताना तळण्याऐवजी कालवण करून किंवा ओव्हनमध्ये भाजून खावेत. चोथायुक्त (फायबर) फळभाज्या, पालेभाज्या, वेलभाज्या खाव्यात. शेवग्याच्या शेंगा, चवळीच्या शेंगा खाल्लेल्या चांगल्या. भूक लागल्यावर गाजर, काकडी भरपूर खावी. चपाती, भाकरीचं पीठ कोंडायुक्त असेल याकडे कटाक्ष ठेवावा. म्हशीच्या दुधाऐवजी गाईचं दूध वापरावं. स्कीम मिल्क सर्वात उत्तम. त्याचंच दही, ताक खावं. तेलाचा वापर फक्त फोडणीसाठी करावा. एरवी शक्यतो भाजणं, उकडणं, वाफवणं यावरच भर द्यावा. प्रत्येक मधुमेहीचा आहार, त्याचं वजन, मधुमेहाची तीव्रता आणि इतर शारीरिक आजार इत्यादी गोष्टींनुसार वेगळा असतो. त्यामुळे एकदुस-याचं अनुकरण करू नये. थोडक्यात, मोजून मापून भोजन घेणं हेच मधुमेह आटोक्यात ठेवण्याचं रहस्य आहे.





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (11 पोस्टेड ):
कृपया मला कलवा
kai karave me.......
kai asu shakto ha ?
Please suggest me a diet chart for the day/week Thanks
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा