पहिले पान | मुक्ता | भोंडला ते महाभोंडला व्हाया लेडीज स्पेशल!

भोंडला ते महाभोंडला व्हाया लेडीज स्पेशल!

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
image Facebook this storyFacebook this story

मैत्रिणींची एका निमित्तानं भेट, सर्वाना चालीवर आणि ठसक्यात म्हणता येणारी गाणी आणि नंतर खिरापत.. यासाठी भोंडला आजही हवाहवासाच वाटतो! मुंबई-कोकणात नवरात्राचे नऊही दिवस खेळल्या जाणाऱ्या या भोंडल्याची रूपं मात्र लोकलगाडीतला भोंडला किंवा उपनगरांमधल्या ‘महाभोंडला’पर्यंत बदलत गेली..

आड बाई आडवणी,

 

आडाचं पाणी काढवणी

 

आडात पडला अडकित्ता

 

आमचा भोंडला आत्ता

 भोंडला संपत आला की हे गाणं म्हणायचं. नंतर फक्त खिरापतीचं गाणं..

सर्प म्हणे मी एकूला

दारी आंबा पिकूला

दारच्या आंब्याची फोड गं

खिरापतीला काय गं..

परकरपोलकं घालून किंवा कल्पना साडीनेसून, हातात खिरापतीचा डबा घेऊन आलेल्या आम्ही लहान मुली आणि एकमेकींना बऱ्याच दिवसांनी भेटणा-या आमच्या आया! नवरात्राचे नऊही दिवस संध्याकाळी कुठल्या ना कुठल्या मैत्रिणीकडे होणारा भोंडला आम्ही एन्जॉय करायचो. कॉलेजात असतानाही भोंडल्याला मैत्रिणी भेटायच्याच. त्या- त्या टप्प्यावर भेटलेल्या मैत्रिणी भोंडल्यामुळे आणखी जवळ येतात, असं वाटायचं.

श्रीऽकांता, कमलकांता अस्सं कस्सं झालं,

अस्सं कस्सं झालं माझ्या कऽप्पाऽऽळी आलं..

वेडय़ाच्या बायकोने केल्या होत्या करंज्या

तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले

होडय़ा होडय़ा म्हणून त्याने पाण्याऽत सोडल्या

अशी पुरुषजातीची टिंगलटवाळी; किंवा नणंदा-भावजया दोघीजणीच घरात असल्यावर होणारी भांडणं, ‘अस्सं सासर द्वाड बाई कोंडोनी मारीतं, अस्सं माहेर सुरेख बाई खेळाया मिळतंअसा सासर-माहेरातला फरक- यांची ती गाणी. त्या सर्व गाण्यांमध्ये स्पष्टवक्तेपणा आहे, पण तो आजच्या काळात खरा ठरतो का, असा प्रश्न नंतर पडू लागला. हल्ली एका घरात नोकरी करणारे सासू-सासरे, नोकरी करणारेच मुलगा आणि सून, सगळे एकमेकांना धरून राहणारे, समजून घेणारे. नणंदासुद्धा एकुलत्याच आणि त्यांच्या सासरी गेलेल्या, म्हणजे नणंदा भावजया दोघीच मैत्रिणी! सासरीही सुनांचं कौतुकच.. अशा वातावरणातही सासर- माहेरच्या भावनांमधला फरक तोच कसा काय?

 

भोंडला म्हणजे एकत्र येणं, एकमेकींना लहानपणापासून, चालींसकट ठसक्यात तोंडपाठ असलेली गाणी सर्वजणींनी मिळून म्हणणं आणि नंतर खिरापत ओळखून ती खाणं! या सर्वाची मजा मात्र तीच राहते. लग्नानंतर लेडीज स्पेशल लोकलनं ऑफिसला जाऊ लागले, तेव्हा ही मजा गाडीतच मिळू लागली. हातचा एक तास, एकमेकींसाठी जागा पकडणा-या (कधीकधी त्यासाठी दुस-या मुलींशी भांडणा-या) एका ग्रूपमधल्या घट्ट मैत्रिणी.. मग भोंडल्याची गाणी म्हणायला जोश का नाही येणार?

 

लेडीज स्पेशलमधल्या भोंडल्यात फेर धरायला जागा नसते इतकंच. उत्साह, आनंद तोच! खिरापत ओळखण्याचा सोहळाही तस्साच. गोड की तिखट?’, ‘गरम की गार?’, ‘तेलातलं की तुपातलं?’ असे प्रश्नही तेच.

 काळ बदललाय, मुली शिकून मोठय़ा हुद्दय़ावर बसल्या, पण हे सगळं- भोंडल्याच्या गाण्यांसकट जसंच्यातसं! ऐलमा पैलमापासून सुरू होणाऱ्या पुढल्या गाण्यांमधलं ते कारल्याच्या वेलावरलं कारलं आणि त्याच गाण्यातली तेलकट भांडी, पाचा लिंबांचा पाणवठा आणि कमळाच्या पाठीमागे लपलेली राणी, अक्कणमाती चिक्कणमाती आणि त्या मातीत रोवलेल्या जात्यावर दळलेल्या सपिटीनं तयार केलेल्या करंज्या, झिपरा कुत्रा किंवा सासरच्या वैद्याच्या तोंडातला पादरा किडा.. या सर्वाचे नऊ दिवस. द्वाड सासर- गोड माहेरएवढय़ाच जगाच्या पलीकडे जाणाऱ्या कितीतरी जणींना ही गाणी छानच पाठ आहेत, याचं खूप बरं वाटतं. महाभोंडल्याची पद्धत डोंबिवली- ठाण्यात गेल्या काही वर्षात सुरू झाली. बायकांच्या एकेका गटाची एकेक संपर्क-प्रमुख, तिच्या गटानं अमुक रिंगणात खेळायचं,  एकाआत एक अशी बरीच रिंगणं आखलेली असल्यामुळे ती ओलांडायची नाहीत, प्रत्येक रिंगणाचा एक रंग दिसेल अशाच साडय़ा नेसायच्या वा ड्रेस घालायचे, अशी शिस्त या महाभोंडल्यात असते. क्वचित प्रसंगी सेलेब्रिटीअसतात- टीव्ही सिरियलवर एखादी महत्त्वाची भूमिका करणारी अभिनेत्री वगैरे. या महाभोंडल्यानं आपली संस्कृती जपली जाते आणि आजच्या लहान मुलींना भोंडल्याची ओळख होते. पण मैत्रिणींमधल्या भोंडल्याची सर याला नसते. मैत्रिणींसाठी खिरापत नेणं आणि मैत्रिणीनं आणलेली खिरापत ओळखणं, ही मजाही नसते. मैत्रिणींचा भोंडला तो मैत्रिणींचाच.. मग तो लेडीज स्पेशलमध्ये बसल्याबसल्या का होणारा असेना!

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (2 पोस्टेड ):

vishakha on 07 October, 2010 12:23:23 PM
avatar
आपला लेख खूप चान ज़मला आहे . पुनः एकदा लोकल वारी केवल भोंद्लायासाठी करावी असे वाटते आहे
आठवणी jaaga करणारा लेख लिहिला आहेस
Meenal Dandavate on 14 October, 2010 07:19:35 AM
avatar
खूप दिवसांनी ..वर्षांनी.. भोंडल्याची आठवण झाली. छान वाटले. पण सध्याच्या वातावरणात आणि भारतातून दूर असल्यामुळे ती गाणी फक्त गम्मत म्हणून, वस्तुसंग्रहालयात कौतुकाने पाहावे अशी वाटतात. मला माझ्या शाळेतल्या दिवसांची फेरी मारून आणल्याबद्दल, सुप्रिया, तुझे मनापासून आभार!
- मीनल

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0