PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: उल्हासनगरवासीयांसाठी नवी बससेवा उल्हासनगरवासीयांसाठी नवी बससेवा ================================================================================ प्रहार वार्ताहर on 28 January, 2010 10:30:00 AM उल्हासनगर- वाढते शहरीकरण आणि दळवळणाची गरज लक्षात घेऊन बुधवारी उल्हासनगर महापालिकेच्या परिवहन सेवा समितीमार्फत उल्हासनगरवासीयांसाठी बीओटी तत्त्वावर दोन नव्या बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. शांती आश्रमाचे प्रमुख स्वामी वेदप्रकाश यांच्या हस्ते या बससेवेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे उपस्थित होते. या कार्यक्रमाला परिवहन समितीचे सभापती सुनील गजवानी अनुपस्थित राहिल्याने हा कार्यक्रम घाईगडबडीत घेण्यात आला असल्याची चर्चा शहरात आहे. जीपीएससारखी अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या या बसेसची आसन क्षमता ३४ असून, कॅम्प नंबर १ ते कॅम्प नंबर ५ मधील शिवमंदिर परिसर असा या बसेसचा मार्ग राहणार आहे. सध्या बीओटी तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या या बसेसचे कंत्राट क्रिस्टल इन्फ्रास्ट्रक्चर नावाच्या खासगी कंपनीला देण्यात आले आहे. याच कंपनीचे कंत्राट आज २८ जानेवारी रोजी संपत असल्याने ही घाई करण्यात आल्याचे बोलले जाते. तसेच येत्या वर्षभरात आणखी १० नव्या बसगाडय़ा सुरू होतील, अशी माहिती कंपनीचे ठेकेदार राजा गेमनानी यांनी यावेळी दिली. बुधवारपासून तीन दिवस या बसेसमधून लोकांना विनामूल्य प्रवास करता येईल, असेही त्यांनी सांगितले. बसेसवर चढवण्यात आलेल्या पिवळा, हिरवा व नारंगी रंगांना सरकारी मान्यता मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत मागील आठवडय़ात परिवहन समितीची सभा झाली होती. त्यामध्ये बसेसचे मार्ग निश्चित होईपर्यंत ही सेवा सुरू करू नये, याकरता परिवहन समितीला विश्वासात घ्यावे, असा निर्णय घेण्यात आला होता. परंतु विधानसभेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी या कार्यक्रमाला अचानक हजेरी लावल्याने पालिका आयुक्त अशोक बागेश्वर यांनीदेखील उपस्थिती दर्शवत उद्घाटन उरकून घेतल्याची चर्चा आहे. घाईगर्दीत बसेसचा उद्घाटन सोहळा उरकण्यात आला असला तरी, परिवहन समितीचे सभापती सुनील गजवानी यांची उपस्थिती वगळता आमदार कुमार आयलानी, लोकभारतीचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील, आमदार बालाजी किणीकर, महापौर राजश्री चौधरी, उपमहापौर विनोद ठाकूर आदी प्रमुख मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.