PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: सैफ-कतरीना शोषित महिलांच्या पाठीशी सैफ-कतरीना शोषित महिलांच्या पाठीशी ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 07 February, 2010 10:50:00 PM मुंबई- प्रसारमाध्यमे, आदरातिथ्य, आयुर्विमा, बांधकाम व्यवसाय आदी क्षेत्रात अग्रेसर असणा-या ‘पर्ल्स’ या उद्योगसमूहाने समाजातील शोषित, वंचित स्त्रियांना न्याय मिळावा यासाठी ‘वेव्ह’ या सामाजिक संस्थेची स्थापना करण्याची घोषणा शनिवारी येथे केली. या वेळी सिनेसृष्टीतील सैफ अली खान, कतरीना कैफ, हरमन बावेजा आदी कलाकार उपस्थित होते. भारतात तीनपैकी एका महिलेस कौटुंबिक अत्याचारास सामोरे जावे लागते. एकीकडे आपण महासत्ता होण्याची स्वप्ने पाहतो पण आपल्याच देशातील महिला आज असुरक्षित आहेत हे खेदजनक आहे. अशा महिलांना आधार देण्यासाठी व त्यांच्यावर अत्याचार करणा-यांना इशारा देण्यासाठी आम्ही संस्था स्थापन करत आहोत, असे ‘पर्ल्स’ उद्योगसमूहाचे अध्यक्ष ज्योतीनारायण यांनी स्पष्ट केले. ‘पर्ल्स’च्या उपक्रमास पाठिंबा देण्यासाठी सैफ अली खान, कतरीना कैफ, हरमन बवेजा हे कलावंत आवर्जून उपस्थित होते. याप्रसंगी सैफ म्हणाला की, समाजाने आम्हा कलावंतांना भरभरून दिले आहे, त्या कृतज्ञतेच्या भावनेतून आम्ही या उपक्रमात सहभागी झालो आहोत. तर कतरीनाने सांगितले की, तिची आई लहान मुलांच्या कल्याणासाठी झटणा-या संस्थेला मदत करते. आईकडून मिळालेल्या प्रेरणेतूनच मीही ‘वेव्ह’च्या माध्यमातून शोषित महिलांच्या पाठीशी उभी राहीन. येत्या 20 फेब्रुवारीला ‘पर्ल्स’ उद्योगसमूहातर्फे एमएमआरडीए मैदानावर नारीशक्तीला सलाम करण्यासाठी विविध क्षेत्रातील दहा महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे.