आरोग्यसेवाच बंद करू- मॅग्मो
ग्रामीण भागात दहा वर्षांहून अधिक काळ सेवा केलेल्या आरोग्यसेवेतील डॉक्टरांना सेवेत कायम न करता पुन्हा दुर्गम भागातच सेवा करण्याच्या आदेशाविरोधात आरोग्यसेवा पूर्णत: बंद करण्याचा इशारा मॅग्मोने दिला आहे.
मुंबई- ग्रामीण भागात दहा वर्षांहून अधिक काळ सेवा केलेल्या आरोग्यसेवेतील डॉक्टरांना सेवेत कायम न करता जुन्या नियमांना धाब्यावर बसवून नवीन निकष लावत त्यांना पुन्हा दुर्गम भागातच सेवा करण्याचे आदेश आरोग्य खात्याने दिले आहेत. या अजब निर्णयाविरोधात मंगळवारपासून राज्यातील आरोग्यसेवा पूर्णत: बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय गट अ संघटनेने (मॅग्मो) दिला आहे.
राज्यातल्या ग्रामीण भागात रुग्णांना योग्य प्रमाणात आरोग्य सुविधा मिळत नाहीत. एकीकडे आरोग्यसेवा विभाग ग्रामीण भागात डॉक्टर नसल्याची आरडाओरड करत असतानाच दुसरीकडे दुर्गम भागात दहा वर्षाहून अधिक काळ सेवा करूनही त्यांना सेवेत कायम न करण्याचा प्रकार मंत्रालयातील सरकारी बाबूंच्या ‘कृपादृष्टीने’ सुरू असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
सरकारी नियमावलीनुसार ‘एमबीबीएस’ची परीक्षा पास झाल्यानंतर डॉक्टरांना सक्तीने तीन वर्षे ग्रामीण भागात सेवा करणे बंधनकारक असते. पण सतत आठ वर्षाहूनही अधिक काळ ग्रामीण भागात सेवा केल्यानंतर त्यांना सेवेत कायम न करता उलट पुन्हा नक्षलवादी भागात जावे, असा अध्यादेश आरोग्यसेवा विभागाने काढला आहे. शनिवारी रात्री उशिरा ‘सहसमावेशनासाठी’ दिलेल्या जाहिरातील उत्तीर्ण उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात आली. यादीत शंभरहून अधिक डॉक्टरांची नावे नसल्यामुळे निराश डॉक्टरांनी आरोग्य संचालक डॉ. दे. स. डाखुरे यांना घेराव घातला. तसेच रविवारी झालेल्या ‘पल्स पोलिओ’ मोहिमेवर बहिष्कारही टाकण्याचाही विचार संघटनेने केला होता, दरम्यान यावर लवकर तोडगा काढू, असे आश्वासन दिल्यावर बहिष्कार मागे घेण्यात आला. राज्याचे आरोग्य सेवा विभागाचे कार्यालय असलेल्या सीएसटी येथील आरोग्य भवनात रविवारी दुपारी डॉक्टरांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीदरम्यान, मागण्या मंजूर होत नसल्यास मंगळवारपासून राज्यातील आरोग्यसेवा पूर्ण बंद करण्यात यावी, यावर एकमत होऊन बंदचा इशारा देण्यात आला. गेल्या वर्षी डॉक्टरांची भरती एमपीएससी आणि गुणवत्तेच्या आधारे करण्यात आली होती. पण जुने नियम बदलून डॉक्टरांना कायम करण्यासाठी नवीन निकष लावण्यात आल्यानेच हा आंदोलनाचा पवित्रा संघटनेने घेतल्याचे संघटनेचे डॉ. महादेव चिंचोले यांनी सांगितले. सोमवारी डॉक्टरांचे शिष्टमंडळ आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांना भेटणार असून, मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आरोग्यसेवा बंद करण्यात येईल.ं


del.icio.us
Digg
Facebook
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा