PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: संवेदनशील ‘शाहूनगर’च्या लता दोंदे प्रमुख संवेदनशील ‘शाहूनगर’च्या लता दोंदे प्रमुख ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 09 March, 2010 10:45:00 AM मुंबई- संपूर्ण झोपडपट्टी विभाग, तडीपार गुंडांचे लपण्याचे ठिकाण आणि संमिश्र लोकवस्तीमुळे संवेदनशील पोलिस ठाणे अशी शाहूनगर पोलिस ठाण्याची नोंद आहे. अनेक बेकायदा धंद्यांचे आगर म्हणून ओळखला जाणारा हा धारावीचा भाग. अशा ठिकाणी महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शाहूनगर पोलिस ठाण्याच्या प्रमुखपदी लता दोंदे यांची नेमणूक जाहीर केली. महिला दिनाच्या निमित्ताने झालेल्या या नेमणुकीने आपल्यावर सोपवलेली जबाबदारी आपण योग्यरीत्या पार पाडू, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. धारावीची ओळख वरदराजनच्या बेकायदा धंद्यांमुळे अधिक झाली. गावठी दारूचे अड्डे, मटक्याचे अड्डे, स्मगलिंगचा व्यापार, ते चालवणारे गुन्हेगार यांचे माहेरघर म्हणूनही धारावीचे नाव घेतले जाते. बाबरी मशीद पतनानंतर येथे मोठय़ा प्रमाणात हिंसाचार झाला. येथील गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्याने संवेदनशील म्हणून धारावीकडे आज पाहिले जाते. अशा परिसरात १ एप्रिल २००१ रोजी शाहूनगर पोलिस ठाणे स्थापन करण्यात आले. येथील वाढती गुन्हेगारी एक डोकेदुखी असल्याचे पोलिस अधिकारी खासगीत सांगतात. लता दोंदे नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आलेल्या आहेत. १९८७ रोजी पोलिस उपनिरीक्षक म्हणून त्या भरती झाल्या. प्रामाणिकपणा आणि कुठल्याही दबावाला न पडता काम तडीस नेण्याची त्यांची वृत्ती. चार वर्षापूर्वी ठाणे पोलिस आयुक्तालयात त्यांची नियुक्ती झाली. तत्कालीन पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनी दोंदे यांच्यातील अफाट गुणवत्ता पाहून आर्थिक गुन्हे शाखेत त्यांची बदली केली. तिथेही दोंदे यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. आठ महिन्यांपूर्वीच त्यांची बदली शाहूनगर पोलिस ठाण्यात निरीक्षक म्हणून झाली. येथे सुरुवातीला सात महिने त्यांच्याकडे गुन्हे शाखेचा कारभार होता. गुन्हे प्रकटीकरण अधिकारी आणि सहका-यांच्या मदतीने त्यांनी या विभागातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यात यश मिळवले. किरकोळ वादावादीमुळे तणाव वाढत असेल तर दोन्ही गटांना बोलावून वाद मिटवण्यावर त्यांचा विशेष भर असे. जे गुन्हेगार रेकॉर्डवर आहेत त्यांना अटक करून कठोर कारवाई करण्याचा त्यांचा शिरस्ता. त्यांची कामातली ही धडाडी पाहून याच पोलिस ठाण्याच्या प्रमुखपदी त्यांना बढती देण्याचा निर्णय गृहमंत्री पाटील यांनी घेतला आहे.