गुढ्यातोरणे सण उत्साहाचा
गुढीपाडवा आणि नववर्ष स्वागत यात्रा असं एक समीकरण गेल्या काही वर्षात डोंबिवली ते दादर, गिरगाव, बोरिवली अशा मराठमोळ्या भागांत रूढ झालं आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरांची, आपल्याच वारशाची आजच्या पिढीला ओळख करून देणं, हा या स्वागतयात्रांमागील एक उद्देश. हा मराठी बाणा नाही तर इथल्या मातीशी जुळलेल्या मराठी मनांनी स्वत:लाच घातलेली एक साद आहे. डोंबिवलीकरांनी या स्वागतयात्रेची गुढी पहिल्यांदा उभारली. डोंबिवलीकरांसाठी यंदा स्वागतयात्रेची तपपूर्ती आहे. यानिमित्ताने डोंबिवली, टिटवाळा, बदलापूर, अंबरनाथ, ठाणे अशा विविध ठिकाणी निघणा-या उत्सवी स्वागतयात्रांची ही माहिती
डोंबिवली : हॅपी मदर्स डे, हॅपी फादर्स डे, हॅपी न्यू इयर अशा सर्व ‘ह’च्या मायाजालात गुरफटून पाश्चिमात्य संस्कृतीच्या स्कार्फमध्ये स्वत:ला गुरफटवून टाकणा-या तरुणाईला भारतीय संस्कृती आणि परंपरांची ओळख लावण्यासाठी बरोब्बर 12 वर्षांपूर्वी चैत्र पाडव्याच्या दिवशी डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रेची गुढी उभारली गेली. पाडव्याच्या दिवशी सर्वाच्याच घरी गुढी उभारली जाते. पण शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेश मंदिराच्या साक्षीने उभारलेली ही गुढी संपूर्ण डोंबिवलीकरांची गुढी होती आणि येथूनच प्रारंभ झाला तो संपूर्ण डोंबिवली नगरीचा गुढी पाडवा उत्सव.31 डिसेंबरला होणा-या नववर्षाच्या स्वागताला पर्याय देत चैत्र पाडव्यापासून सुरू होणा-या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे तितकेच भन्नाट स्वागत होणार का? याबद्दल सर्वानाच कुतूहल निमाण झाले होते. पण शहरात काही तरी वेगळं घडतंय, असं प्रत्येक डोंबिवलीकराला वाटत होतं हेही तितकंच खरं. त्यामुळे डोंबिवलीची स्वागत यात्रा वर्तमानपत्रांसाठी बातमीचा विषय ठरली. लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येक जण पूर्वसंध्येलाच पाडव्याच्या तयारीत मग्न. सायंकाळी बिनआवाजाची आतषबाजी आणि मग रात्री साडेबारा-दीडपर्यंत चौकाचौकांत संस्कार भारतीच्या रांगोळ्या काढण्यात दंग महिला वर्ग, पहाटे उठल्यावर स्वागतयात्रेला उशीर होऊ नये म्हणून कपडय़ांना इस्त्री करण्यात गर्क असलेला पुरुषवर्ग आणि मग भल्या पहाटे उठून तितक्याच उत्साहाने भागशाळा मैदान गाठणं, हे सर्व एका तपापासून या शहरात सुरू आहे.
महाराष्ट्राच्याच नव्हे; तर देशाच्या सांस्कृतिक नकाशावर डोंबिवलीची नववर्ष स्वागतयात्रा मानबिंदू ठरली आहे. नववर्ष स्वागत यात्रेची मूळ संकल्पना जेष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर यांनी मांडली. या संकल्पनेला मूर्त स्वरूप संस्थानचे तत्कालिन अध्यक्ष आबासाहेब पटवारी यांनी दिलं. दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त शहरात सांस्कृतिक कार्यक्रमांचं उधाण आलेलं असतं. लेझिम, दांडपट्टा, झांजपथकं, तलवार प्रात्यक्षिक, वेगवेगळय़ा संकल्पना साकारलेले चित्ररथ, शहरातील मुख्य रस्त्यांवर काढण्यात आलेल्या रंगेबेरंगी रांगोळ्या, पारंपरिक वेशांमधील सहभागी होणारे पुरुष-महिला, लेझिमवर नाचणारी चिमुरडी, मोटारसायकलवरून सहभागी होणा-या महिला हे शोभा यात्रेतील खास वैशिष्ट्य असतं.डोंबिवलीची आगळीवेगळी संकल्पना आजूबाजूच्या शहरांनाही हवीहवीशी वाटू लागली आणि मग काय कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, ठाणे, मुंबई, पुणे शहरं ओलांडत ही यात्रा महाराष्ट्राची सीमा ओलांडून अन्य राज्यांत पोहोचली. सव्वाशेच्या आसपास शहरांतून सुरू झालेल्या स्वागतयात्रांचा विस्तार बघितला तर हे या एका तपाचं फलित आहे, असं आवर्जून म्हटलं पाहिजे.
स्वागतयात्रेचा मार्ग
गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी 5 वाजता श्रीगणेशाचं पूजन झाल्यानंतर पश्चिमेतील भागशाळा मैदान येथून ढोल -ताशाच्या गजरात शोभा यात्रेस प्रारंभ होईल. फुले रोडने रेल्वे स्टेशन रस्त्यावरील मार्गे, कोपर ओव्हर ब्रीजने ही यात्रा पूर्वेला जाते. आई बंगला कडील रस्त्याने, चाररस्ता, मानपाडा रोड मार्गे, बाजी प्रभू चौक, फडके रोडने, गणेश मंदिराजवळील अप्पा दातार चौकात यात्रेचा समारोप होणार आहे. या स्वागतयात्रेत शहरातील अनेक भागांतून येणा-या उपयात्रा सहभागी होतात.मिरवणुकीतील आकर्षण
पहिल्यांदाच नेहरू मैदानात भव्य रांगोळी साकारण्यात येणार आहे. तसंच कोल्हापूर येथील मुला-मुलींची दांडपट्टा, लाठी, तलवार प्रात्यक्षिकं, शीख समाज मंडळाच्या कवायती, मल्लखांब झांज पथक, राम कस्तुरे यांचं सुलेखन सादरीकरण, संजय लोकरे यांचं रॅपलिंगचं प्रात्यक्षिक हे यंदाच्या वर्षातील मिरवणुकीतील आकर्षण ठरणार आहे.आता हवी समस्यापूर्तीची गुढी
तपपूर्तीनिमित्त गणेश मंदिर संस्थानने मे महिन्यात जलपरिषदेचं आयोजन केलं आहे. शहरातील सर्व सोसायटय़ा, संकुलांच्या अध्यक्षांना या परिषदेसाठी आमंत्रित करून ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’बद्दल जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाची अमलबजावणी गणेश मंदिर संस्थान स्वत:पासून करणार आहे. संस्थानच्या नवीन वास्तूत कायमस्वरूपी अभ्यासिका, विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी नवीन शैक्षणिक वर्षापासून शाळा- शाळांमध्ये समुपदेशन, शालेय विद्यार्थ्यांसाठी लाठी प्रशिक्षण, असे अनेक सेवाभावी प्रकल्प राबवण्याचा संस्थानचा मानस आहे.हे सर्व उपक्रम स्तुत्य असले तरी स्वागत यात्रांचे संस्थापक या नात्याने पर्यावरणाची वाढती समस्या, पाणीटंचाई, प्रदूषण यासारख्या जनसामान्यांशी निगडित प्रश्नांचा मागोवा घेऊन सर्व स्वागत यात्रा आयोजक संस्थांची परिषद घेऊन त्या माध्यमातून हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. स्वागत यात्रांच्या निमित्ताने उपलब्ध झालेला हा भव्य रंगमंच केवळ गुढीपाडव्याच्याच दिवशी खुला न करता संपूर्ण वर्षभर या माध्यमातून औद्योगिक प्रगती, शेतकरी आत्महत्या आणि सामाजिक प्रश्नांवर ऊहापोह झाला पाहिजे. या संकल्पनांचं आणि लोकांच्या व्यथांचं प्रभावी सादरीकरण जर या स्वागतयात्रांच्या माध्यमातून झालं तर ख-या अर्थाने समस्यापूर्तीची गुढी उभी राहील यात शंका नाही. ठाण्यात स्वागतयात्रेच्या पूर्वसंध्येला जलसंगीत मैफल मराठी नववर्ष आणि ठाणे नगरी यांचं नातं अतूट आहे. दरवर्षी निघणाऱ्या स्वागतयात्रेतून ते अधिकच घट्ट होत चाललंय. रस्त्यारस्त्यांवर काढलेल्या सुबक रांगोळय़ा, पारंपरिक पेहरावातील मोटारसायकलस्वार तरुण, भरजरी साडय़ा, शालू परिधान केलेल्या स्त्रिया, विविध सामाजिक विषयांचे चित्ररथ, लेझिम पथकं, ढोल-ताशांचा गजर आणि एक सळसळता उत्साह असा नयनरम्य ‘सोहळा’ गेल्या 8 वर्षापासून ठाण्यात सुरू आहे. पण याव्यतिरिक्त ठाणेकरांना यंदा नववर्षाच्या पूर्वसंध्येला मासुंदा तलावामध्ये तरंगत्या मंचावरील एका संगीत मैफलीचाही अनुभव घेता येणार आहे. यंदा स्वागतयात्रेच्या माध्यमातून पाणी वाचवण्याविषयीही जनजागरण करण्यात येणार आहे.
गुढीपाडव्याची चाहूल घेत सध्या मासुंदा तलाव परिसर व शहरातील इतर अनेक ठिकाणी रोषणाई करण्यात येत आहे. या रोषणाईबरोबरच रांगोळ्या, फुलं, गुढ्या इत्यादीने चौक, रस्ते, मंदिरं, गृहसंकुलं येत्या मंगळवारी सुशोभित दिसतील. आवाजरहित फटाक्यांची आकाशातील आतिषबाजी हे यंदाही या कार्यक्रमाचं एक आकर्षण असेल. सोमवार 15 मार्चला सायंकाळी तलावपाळीच्या कठडय़ावर पणत्या लावून या आनंददायी सोहळ्याची सुरुवात होईल. त्यानंतर आकाशभर आवाजविरहित फटाक्यांची नयनरम्य फुलं उधळली जातील. त्यानंतर कौपिनेश्वर न्यासातर्फे मासुंदा तलावामध्ये तरंगत्या रंगमंचावर भक्ती संगीत, भावगीतं अशी एक तासाची अनोखी मैफल साजरी होणार आहे. दोन होडय़ा एकमेकांना जोडून तयार केलेल्या मंचावर बसूनच वादक, गायक आपली कला सादर करणार आहेत. नौकाविहारपासून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आणि परत नौकाविहार या कालावधीत मैफिलीचे सूर निनादणार आहेत. तळय़ाच्या काठावर उभे असलेले नागरिक या संगीत मैफिलीचा आस्वाद घेऊ शकतील. काही मान्यवरांसाठी, रसिकांसाठी व न्यासाच्या पदधिका-यांसाठी दोन स्वतंत्र होड्या असतील.
दरवर्षी कौपिनेश्वर न्यासाची शहरातून मुख्य स्वागतयात्रा निघते. तसेच कळवा, ब्रह्मांड येथेही उपयात्रा निघतात. यंदा प्रथमच वागळे इस्टेटमधूनही नव्याने उपस्वागतयात्रा निघणार असल्याची माहिती कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे अध्यक्ष मा. य. गोखले यांनी दिली.
16 मार्चला सकाळी 7 वाजता ठाणे शहराचं आराध्य दैवत असलेल्या श्री कौपिनेश्वर मंदिरापासून यात्रेला सुरुवात होणार असून अनेक छोटे-मोठे सजवलेले रथ, त्यातून होणारी पुष्पवृष्टी, पारंपरिक देखावे, यात्रेसमोर हरित लेझिम खेळणा-या स्त्रिया, पारंपरिक वेषातील पुरुष-महिला दुचाकी स्वार पथकं असा सारा मंगलमय माहौल ठाणेकरांना अनुभवता येणार आहे. ठाणे शहरातील प्रमुख रस्त्यावरून फिरून, सकाळी 11 वाजता या यात्रेची कौपिनेश्वर मंदिरात सांगता होईल. गतवर्षीच्या शोभायात्रेला सुमारे 50 हजार रहिवाशी विविध सामाजिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक विषयांचे चित्ररथ घेऊन या यात्रेत सहभागी झाले होते. यंदाच्या यात्रेत ‘पाणी’ हा विषय निवडण्यात आला आहे. त्या अनुषंगाने विविध चित्ररथ पाण्याच्या समस्येवर संदेश देतील, अशी माहिती मा. य. गोखले यांनी दिली. महारांगोळ्या त्रिमिती रांगोळ्यांचं आकर्षणस्वागतयात्रेत दुतर्फा रांगोळ्यांचा पडणारा सडा हा दरवर्षी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. ‘संस्कार भारती’ संस्था ही रांगोळय़ांची नजाकत पेश करत असते. यंदा संस्थेतर्फे कळवा येथील गावदेवी मैदानात हिंदू शुभचिन्हांसह पोट्रेट आणि त्रिमितीय स्वरूपाच्या वैशिष्टय़पूर्ण रांगोळय़ांचा एकत्रित संयोग पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. गावदेवी मैदानात 50 बाय 50 फुटांची रांगोळी काढली जाणार आहे. शिवाजी महाराजांची अश्वारूढ प्रतिमा यात दाखवली जाणार आहे. विशेष म्हणजे ही रांगोळी खडेमिठातून साकारली जाणार असून 100 किलो खडेमीठ वापरलं जाणार आहे. ‘रंगवल्ली परिवार’ ही संस्थाही नववर्षाला विविध ठिकाणी रांगोळी रेखाटते. यंदा ठाण्याच्या गावदेवी मैदानात संस्थेकडून 21 हजार चौरस फुटांची महारांगोळी रेखाटली जाणार आहे. १०० कलाकार मिळून पारंपरिक चिन्ह आणि बोधचिन्हांच्या आधारे ही अतिभव्य रांगोळी साकारणार आहेत. 14 तारखेला संध्याकाळी रांगोळीचं उद्घाटन होणार आहे.



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा