बेस्टच्या वीज ग्राहकांना खुशखबर
चहूबाजूंनी महागाईच्या लाथाबुक्क्या पडत असताना बेस्टने आपल्या वीज ग्राहकांसाठी मात्र खुशखबर आणली आहे. वीज वितरण कंपन्या विविध आकारांच्या नावाखाली सातत्याने दरवाढ पदरात पाडून घेत असताना बेस्टने मात्र 2010-11 या आर्थिक वर्षासाठी दरवाढ नको असल्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे दिला आहे.
मुंबई- चहूबाजूंनी महागाईच्या लाथाबुक्क्या पडत असताना बेस्टने आपल्या वीज ग्राहकांसाठी मात्र खुशखबर आणली आहे. वीज वितरण कंपन्या विविध आकारांच्या नावाखाली सातत्याने दरवाढ पदरात पाडून घेत असताना बेस्टने मात्र 2010-11 या आर्थिक वर्षासाठी दरवाढ नको असल्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे दिला आहे. घरगुती, तसेच खालच्या पातळीवरील वाणिज्य ग्राहक (कमी वीजवापर असलेले) आणि उच्च दाबाचे औद्योगिक ग्राहक यांच्यासाठी कोणतीही दरवाढ न सुचवणा-या या प्रस्तावात रस्त्यावरच्या जाहिरातींसाठी सर्वाधिक 12 टक्के वाढ सुचवण्यात आली आहे.
बेस्टने 2010-11 या आर्थिक वर्षासाठी अपेक्षित असणारे उत्पन्न आणि येणारा खर्च यांचा अहवाल (एआरआर) वीज नियामक आयोगाला सादर केला आहे. त्यात 2010-11 या वर्षात बेस्टला खर्चापेक्षा उत्पन्न अधिक मिळणार असले तरी गेल्या वर्षी (2009-10) आलेली तूट तसेच, कर्मचा-यांचा भविष्य निर्वाह निधी व प्रशासकीय खर्चाबाबत आयोगाने मध्यंतरी दिलेल्या निवाड्याचा होणारा परिणाम लक्षात घेता बेस्टला एआरआरमध्ये 85.85 कोटी रुपयांची तूट अपेक्षित आहे. ती भरून काढण्यासाठी सरासरी 3.07 टक्के दरवाढ करण्याची गरज असल्याचे एआरआरमध्ये म्हटले आहे.
बेस्टने घरगुती ग्राहकांसाठी कोणतीही दरवाढ न सुचवून मोठाच दिलासा दिला आहे. उपनगरांत रिलायन्सच्या चढ्या वीज दरांना कंटाळून अनेक ग्राहक टाटा पॉवरकडे जात आहेत. बेस्टचे ग्राहकही टाटांकडे जाऊ शकतात, असा निर्वाळा अलिकडेच आयोगाने दिला आहे. त्यानुसार, सध्या बेस्टच्या काही वाणिज्य ग्राहकांनी टाटा पॉवरकडे वीजजोडणी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे विजेचा कमी वापर असलेल्या वाणिज्य ग्राहकांनाही बेस्टने पुढील वर्षीच्या दरवाढ प्रस्तावात दिलासा देत त्यांच्यासाठी कोणतीही दरवाढ सुचवलेली नाही. अनिवासी किंवा वाणिज्य श्रेणीसाठी पहिल्या 300 युनिटपर्यंत दरवाढ प्रस्तावित नाही. 301 ते 500 युनिटसाठी 6.80 रुपयांवरून 7.15 रुपये (5%), 501 ते 1000 युनिटसाठी 7.90 रुपयांवरून 8.50 रुपये (8%), 1000 युनिटपेक्षा अधिक वापर असलेल्या ग्राहकांसाठी 8.30 रुपयांवरून 9.20 रुपये (11%), 20 किलोवॉट ते 50 किलोवॉटचा लोड वापरणा-या वाणिज्य ग्राहकांसाठी 8.90 रुपयांवरून 9.50 रुपये (7%), कमी दाबाच्या औद्योगिक श्रेणीतील 20 कि.वॉपेक्षा कमी लोड वापरणा-या आणि 1000 युनिटपेक्षा अधिक वापर असलेल्या ग्राहकांसाठी 7.50 रुपयांवरून 8.35 रुपये (11%), 20 ते 100 किलोवॉटचा लोड वापरणा-या औद्योगिक ग्राहकांसाठी 7.19 रुपयांवरून 8 रुपये (11%), तर जाहिरात, होर्डिग्ज, फ्लडलाइट्स आणि निऑन साइन्ससाठी 12.92 रुपयांवरून 14.50 रुपये (12%) अशी दरवाढ सुचवलेली आहे.



del.icio.us
Digg
Facebook
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा