वाहनतळांच्या कंत्राटांत बचतगटांना आरक्षण
महापालिकेच्या सशुल्क वाहनतळ (पे अॅण्ड पार्क) कंत्राटांमध्ये 50 टक्के राखीव जागा महिला बचत गट व महिला संस्थांना देण्याचा निर्णय गुरुवारी महापालिका प्रशासनाने महापौर श्रद्धा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीमध्ये घेतला.
मुंबई- महापालिकेच्या सशुल्क वाहनतळ (पे अॅण्ड पार्क) कंत्राटांमध्ये 50 टक्के राखीव जागा महिला बचत गट व महिला संस्थांना देण्याचा निर्णय गुरुवारी महापालिका प्रशासनाने महापौर श्रद्धा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीमध्ये घेतला. याबरोबरच 25 टक्के जागांवर बेरोजगारांना उपलब्ध करून देण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी दिले आहे. याबाबतचा ठराव शुक्रवारी होणा-या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे प्रशासन मंजुरीसाठी ठेवणार आहे.
मुंबईतील सशुल्क वाहनतळांचे कंत्राट अनेक वर्षापासून काही ठराविक कंत्राटदारांकडेच आहे. या शुल्कामध्ये वाढही करण्यात आली नव्हती. त्यामुळे शुल्कात वाढ करत महापालिका प्रशासनाने नव्याने कंत्राटे मागवली आहेत. महापालिकेने 14 पैकी 7 वॉर्डामध्ये कंत्राट देण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होत असल्याने यापूर्वी शुल्कवाढीच्या प्रस्तावादरम्यान विधी समिती, सुधार समिती तसेच महापालिकेच्या सर्वसाधारण सभांमध्ये वाहनतळाच्या कंत्राटामध्ये 50 टक्के राखीव जागा महिला बचत गट व महिला संस्थांना द्याव्यात, अशी मागणी करत एकमुखी ठराव करण्यात आला होता. मात्र महापालिकेच्या तब्बल तीन सर्वसाधारण सभा या विषयासाठी तहकूब झाल्या होत्या.
गुरुवारीही याच मुद्द्यावरून सभागृहाचे कामकाज तहकूब केल्यानंतर महापौरांच्या दालनामध्ये सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये प्रशासनाने 7 वॉर्डामध्ये महिला बचत गटांसाठी 25 टक्के व बेरोजगारांसाठी 25 टक्के असे एकूण 50 टक्के राखीव ठेवण्याची तयारी दर्शवली. मात्र प्रशासनाच्या या प्रस्तावाला विरोधी पक्षनेते राजहंस सिंह यांनी जोरदार विरोध करून महिला बचत गटांना 50 टक्के तसेच बेरोजगारांना 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात याव्यात, अशी मागणी केली. उर्वरीत 25 टक्के जागा खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवाव्यात, असे त्यांनी सांगितले. या उपसूचनेला सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला.
त्यानंतर महापालिका आयुक्तांनी ही उपसूचना मान्य केली. त्यानंतर महापौरांनी आदेशानुसार तातडीचे कामकाज म्हणून शुक्रवारी हा प्रस्ताव मंजूरीला ठेवण्याची तयारी आयुक्तांनी दर्शवली.
महिलांच्या प्रश्नी महापौर उदासीन
महापालिकेच्या स-शुल्क वाहनतळामध्ये महिला बचत गटांना 50 टक्के जागा राखीव ठेवण्यात महापौरच उदासिन असल्याचे गुरूवारी दिसून आले. महापालिका मुख्यालयात महापौरांच्या अध्यक्षतेखाली दुपारी एक वाजता बैठक बोलावली असताना खुद्द महिला महापौर असलेल्या श्रद्धा जाधव चक्क तीन वाजता कार्यालयात पोहोचल्या. त्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली. परंतु महापौरांचा अपराध झाकून प्रशासनालाच टार्गेट करत सत्ताधा-यांनी झटपट सभा तहकूब करायला भाग पाडली. त्यानंतर सर्वपक्षिय गटनेत्यांनी प्रशासनाकडून ही मागणी मान्य करून घेतली असली तरी महापौरांच्या उशिरा येण्यामुळेच हा निर्णय शुक्रवारपर्यत लांबणीवर पडला आहे.
‘दलित व ओबीसींसाठी काही जागा राखीव ठेवा’
महापालिकेच्या सशुल्क वाहनतळामध्ये महिला बचत गट व त्यांच्या संस्थांना 50 टक्के राखीव ठेवण्याच्या मागणीलाही भाजपने पाठिंबा दिला एवढेच नव्हे तर या 50 टक्के जागांमध्ये दलित व ओबीसींसाठी काही जागा राखीव ठेवण्याची आग्रही मागणी भाजपचे गटनेते अॅड आशीष शेलार यांनी करत दलित व ओबीसींची मते आपल्याकडे वळवण्याचा केविलवाणा प्रयत्न गुरुवारी केला. राष्ट्रवादीचे नियाज वणू यानी महापालिकेच्या 24 वॉर्डामधील वाहनतळ कंत्राटात महिलांना 50 टक्के जागा राखीव मिळायलाच हव्यात, अशी मागणी केली. मनसेचे नगरसेवक, आमदार मंगेश सांगळे यांनी सर्वच घटकांतील महिलांसाठी आरक्षण असावे, अशी मागणी केली.


प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा