पहिले पान | महामुंबई | शोर मच गया शोर...

शोर मच गया शोर...

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
image

दरवर्षीप्रमाणेच यंदाही प्रत्येक दहीहंडीच्या ठिकाणी थरांचा थरार अनुभवण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. मुंबई-ठाण्यातील मानाच्या आणि लाखाच्या हंडय़ा गुरुवारी सायंकाळपर्यंत फुटल्या नव्हत्या. मात्र गल्लोगल्ली, चौकाचौकात लावलेल्या हंडय़ा फोडण्यासाठी जमलेल्या गोविंदांच्या ‘शोर’ने शहरात दिवसभर जल्लोषाचे वातावरण होते.

मुंबई : मच गया शोर सारी नगरी रे, आया बिरजका बांका संभाल तेरी गगरी रेऽऽऽ..च्या तालात एकावर एक थर रचत, कोसळत आणि पुन्हा वर चढून हंडी फोडत गोविंदांनी मुंबई-ठाणेकरांसह टीव्हीवरून हा थरार पाहणा-या देशभरातील जनतेच्या डोळय़ांचे पारणे फेडले. विश्वास, एकाग्रता, एकता, आत्मविश्वास यांच्या जोरावर विजयाचा शेवटचा थर रचत दहीहंडी फोडल्यानंतर होणा-या जल्लोषात सारेच सहभागी होत होते. दरवर्षीप्रमाणेच यंदाही प्रत्येक दहीहंडीच्या ठिकाणी थरांचा थरार अनुभवण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. मुंबई-ठाण्यातील मानाच्या आणि लाखाच्या हंडय़ा गुरुवारी सायंकाळपर्यंत फुटल्या नव्हत्या. मात्र गल्लोगल्ली, चौकाचौकात लावलेल्या हंडय़ा फोडण्यासाठी जमलेल्या गोविंदांच्या शोरने शहरात दिवसभर जल्लोषाचे वातावरण होते.

 मोठमोठय़ा बक्षिसांच्या आणि उंचच उंच दहीहंडय़ा फोडण्यासाठी गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सराव करणारी गोविंदा पथके गुरुवारी जय्यत तयारीनिशीच बाहेर पडली. भरगच्च भरलेली वाहने, सोबत दुचाकींचा ताफा, ढोलताशांचा दणदणाट आणि त्याला गोविंदा रेऽऽऽ गोपाळाची साथ यामुळे संपूर्ण माहोलच गोविंदामय झाला होता.  दादरमध्ये आयडीएलसमोरील श्रीदत्त क्रीडा मंडळाने सेलिबेट्रीज, महिला व मोठय़ा थरांची दहीहंडी बांधली होती. महिलांसाठी असलेली दादरमधील ही दहीहंडी विक्रोळी क्रीडा मंडळाच्या महिला गोविंदांनी फोडली. पाच थरांची ही दहीहंडी फोडण्यासाठी या पथकाचा पहिला प्रयत्न हंडी लावेपर्यंत पोहोचू शकल्याने त्यांना आणखी एक संधी देण्यात आली होती. त्यानंतर दुस-या प्रयत्नात या मंडळाने ही हंडी फोडली. पाचव्या थरावरील बारा वर्षीय शुभम प्रवीण सावंत याने ही हंडी फोडण्यासाठी प्रथम हाताने आणि त्यानंतर डोक्याने हंडी फोडल्यानंतर टाळय़ांचा एकच कडकडाट करून उपस्थित रसिकांनी दाद दिली. त्यानंतर दुसरी महिलांची हंडी गिरगावच्या महिला गोविंदांनी फोडली. ही हंडी पाहण्यासाठी खुद्द पर्यावरण सचिव वल्सा नायर-सिंह यांनी हजेरी लावली होती. दादरमधील श्रीदत्तकृपा मंडळाची दुसरी हंडी फोडण्यासाठी ताडवाडीच्या दत्त क्रीडा मंडळाचा प्रयत्न असफल ठरला. दादरमधील मानाची हंडी समजली जाणारी जीवा देवशी निवासची 22,220 रुपयांची हंडी सात थर रचत ताडदेवच्या शिव मंदिर मंडळाने फोडण्याचा मान मिळवला. दादर रानडे रोडवर तसेच आयडीएल गल्लीमध्ये दहीहंडी बांधल्या गेल्याने या दोन्ही गल्ल्या गर्दीने फूलून गेल्या होत्या.

याबरोबरच परळमधील सदाकांत ढवण मैदान, वरळीतील संकल्प, घाटकोपरमधील राम कदम मित्र मंडळ, कांदिवली गावातील स्वाभिमानच्यावतीने बांधण्यात आलेली दहीहंडी, अंधेरी रेल्वे स्थानकाबाहेरील हंडी ही ठिकाणे रसिकांचे आकर्षण केंद्र बनली होती. या दहीहंडी फोडण्यासाठी अनेक मंडळांनी प्रयत्न केला. परंतु दुपापर्यंत या दहीहंडी फोडण्यास त्यांना यश न आल्याने सलामी देत अनेक गोविंदांनी उत्तेजनार्थ बक्षिसांची लयलूट केली.

  • कल्याण-डोंबिवलीत गोविंदांचे ठाणे

कल्याण : हंडीत लाखमोलाचे दही नसले तरी कल्याण, डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर, अंबरनाथच्या गल्लोगल्लीत शोर करत छोटय़ा गोविंदा पथकांनी हंडीवर हात मारला. कल्याणमधील सोसायटय़ा, चाळींमध्ये छोटय़ा मंडळांनी आयोजित केलेल्या सुमारे 200 दहीहंडय़ा फोडल्या.

 

डोंबिवली पश्चिमेकडील गायकवाडवाडी, नवतरुण मित्र मंडळ, महात्मा फुले रोडवरील मथुरा निवास येथील रस्त्यारस्त्यांवर उभारलेल्या हंडय़ा फोडून बाळगोविंदांनी आनंदोत्सव साजरा केला. काळजाचे ठोके वाढवणारा डीजे, पारंपरिक गोविंदाच्या गीतावर ठेका धरत झुंडीने आलेल्या गोविदांनी ठाणे स्टेशन परिसर, पाचपाखाडी, कोपरी येथील रस्तोरस्ती थरांवर थर रचून हंडय़ा फोडण्याचा आनंद लुटला.

 

डोंबिवलीच्या पाथर्ली परिसरात अरुंद असलेल्या गल्लीत गोंधळ घालत बाळगोविंदांनी दहीहंडी उत्सव साजरा केला. यशोदामाईचा चिमुरडा कान्हाअशा वेशभूषेत असलेले बाळगोपाळ डोंबिवलीकरांचे विशेष आकर्षण ठरत होते. डोंबिवली पश्चिमेकडील उमेशनगर येथे उमेशनगर मित्र मंडळाने आयोजित केलेली हंडी या वेळी फोडण्यात आली.

 डोंबिवली पूर्वेकडील पी अँड टी कॉलनीपरिसरातील महावैष्णव मारुती मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली हंडी फोडून याच परिसरातील गोपिकांनी जल्लोष केला. कल्याणच्या कुंभारवाडा येथील बच्चेकंपनी थरांचा इमला उभारून येथील मानाची हंडी फोडली. शहरातील अनेक सोसायटी, चाळ पसिरातील रहिवाशांनी सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवत एकत्र भोजनाचा आस्वाद घेतला. 
  • एकोपा जपणारा उत्सव 
मुंबई-  सलग सहा वर्षापासून पारंपरिकता व सामाजिक एकोपा जपणाऱ्या कांजूरगावातील छत्रपती नगर गोविंदा पथकाने सालाबादप्रमाणे यंदाही  कृष्णजन्मोत्सवानिमित्त पालखी सोहळय़ाचे आयोजन केले होते. बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास कांजूर बाजारपेठेतून वाजतगाजत निघालेल्या या पालखी सोहळय़ात कांजूर, भांडुप परिसरातील शेकडो भक्तगण सामील झाले होते. संस्कृती सामाजिक एकोपा जपण्यासाठी दरवर्षी पालखीचे आयोजन केले जात असल्याचे मंडळाचे अध्यक्ष नयन शेट्टे, गोविंद परब, राजेश कर्पे, अनिल कर्पे, अमित पेडणेकर, विघ्नेश पेडणेकर सांगतात.
 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0