PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: फ्लीट टॅक्सी योजना तूर्तास बस्त्यात फ्लीट टॅक्सी योजना तूर्तास बस्त्यात ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 03 September, 2010 02:10:00 AM मुंबई- परिवहन विभागाने मोठा गाजावाजा करीत शहरातील लब्धप्रतिष्ठितांसाठी फ्लीट टॅक्सींची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी परिवहन विभागाने तातडीने चार हजार टॅक्सी परवानेही मंजूर करत इच्छुक कंपन्यांकडून निविदा अर्ज मागवण्यात आले. पण, निविदा उघडण्याच्या दिवशी म्हणजे 26 ऑगस्टला इच्छुक 20 कंपन्यांपैकी ‘मेरू’ कंपनीव्यतिरिक्त दुस-या कुठल्याही कंपन्यांचे प्रतिनिधी निविदा प्रक्रियेत सहभागी झाले नाहीत. या कंपन्यांच्या अशा अघोषित बहिष्कारामुळे परिवहन विभागाच्या या योजनेला ब्रेक लागला असून ही निविदा प्रक्रिया किमान सहा महिन्यांनी पुढे ढकलली जाण्याची शक्यता असल्याची माहिती परिवहन विभागातील सूत्रांनी दिली. मेरुव्यतिरिक्त इतर कंपन्यांचे प्रतिनिधी नसल्यामुळे 26 ऑगस्टला निविदा उघडण्याच आल्या नाहीत. या योजनेला अपेक्षेइतका प्रतिसाद न मिळाल्याने ती तूर्तास पुढे ढकलण्याचा निर्णय या दिवशी घेण्यात आला होता. आता या प्रक्रियेला आणखी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागेल, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे फ्लीट टॅक्सी मुंबईच्या रस्त्यांवर नेमक्या केव्हा उतरणार, याची माहिती घेण्यासाठी परिवहन सचिव सी. एस. संगीतराव यांना दूरध्वनी केला असता त्यांनी यासंदर्भात लवकरच निर्णय घेईल, असे सांगितले. मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे अध्यक्ष ए. एल. क्वाड्रोस म्हणाले की, या निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी लादण्यात आलेल्या अटी जाचक आहेत. इच्छुक कंपनीला किमान एक हजार परवाने घेण्याचे बंधन असून प्रत्येक परवान्यामागे एक लाख रुपये शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे या कंपन्यांनी आयत्या वेळी माघार घेतली असावी. तसेच, हे परवाने खाजगी कंपन्यांना न देता बेरोजगारांना देण्यात यावेत, या मागणीसाठी आमच्या संघटनेतर्फेही न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे ही योजना न्यायालयीन प्रक्रियेत अडकण्याची भीती या कंपन्यांना वाटली असावी. म्हणूनच निविदा उघडण्याच्या दिवशी उपस्थित राहण्यास या कंपन्यांनी निरुत्साह दाखवला.