पहिले पान | महामुंबई | चेंबूरमध्ये अष्टविनायकची बाजी

चेंबूरमध्ये अष्टविनायकची बाजी

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

गुरुवारी मुंबई आणि उपनगरांत दहीहंडीचा जल्लोष होता. अनेक ठिकाणा लावण्यात आलेल्या मानाच्या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चांगलीच चुरस लागल्याचे चित्र दिसत होते. दहीहंडी फोडण्याच्या नादात जवळपास 270 हून अधिक गोविंदा जखमी झाले असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.

मुंबई-: चेंबूरमध्ये गेल्या आठ वर्षापासून दहीहंडीची संस्कृती जपणा-या घाटला खारदेव नगर येथील अनिल पाटणकर सामाजिक प्रतिष्ठान व भारत सेवक समाज यांच्या संयुक्त विद्यमाने दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रात्री  दहाच्या सुमारास वडाळ्याच्या अष्टविनायक गोविंदा पथकाने आठ थर रचून 1 लाख 11 हजार 111 रु. पटकावले.

  • मनसेची दहीहंडी

चेंबूर नाका येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व प्रशिक सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने 11 लाख 11 हजार 111 रुपयाची दहीहंडी ही चेंबूरमध्ये सर्वात मोठय़ा पारितोषिकाची दहीहंडी होती. ही दहीहंडी बीजीएम गोविंदा पथकाने सात थर लावून फोडली. दरवर्षीपेक्षा यावेळी वेगळा कार्यक्रम घेऊन संस्कृती जपण्याचा आयोजकांनी प्रयत्न केला होता. या दहीहंडीचे कर्णबाळा दुनबळे हे आयोजक होते.

  •  कलाकुंज मंडळाची दहीहंडी बालगोपाळ मित्र मंडळाने फोडली
चेंबूर पांजरापोळ येथील कलाकुंज मित्र मंडळाची 1 लाख 11 हजार 111 रुपयांची दहीहंडी चुनाभट्टी येथील बालगोपाळ मित्र मंडळाने फोडली. पालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.  
  • संकल्पची वरळीतील दहीहंडी प्रभातमंडळाच्या खात्यात
 वरळीच्या जांबोरी मैदानावरील संकल्पची दहीहंडी रात्री उशिरा शीव येथील प्रतीक्षा नगरच्या प्रभात मित्र मंडळाने फोडली. दुपारपासून अनेक मंडळांनी प्रयत्न केल्यानंतरही हंडी फोडण्यात कोणालाही यश आले नाही. त्यानंतर दहीहंडी खाली घेण्यात आल्यानंतर, प्रभात मित्र मंडळाच्या पथकाने पाच थर लावत ही दहीहंडी फोडली. 30 लाखांचे जंगी बक्षीस असलेल्या संकल्पच्या दहीहंडीला दुपारी बारापासूनच गोविंदा पथकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. दुपारी तीनपर्यंत 8 थरांचे मनोरे रचून या मानाच्या हंडीला सलामी देण्यात केवळ चार गोविंदा पथके यशस्वी झाली होती. तर तब्बल 94 पथकांनी सहा थरांचे मनोरे रचून सलामी दिली. तर अष्टविनायक महिला गोविंदा पथकासह चार महिला पथकेही या उत्सवात सहभागी झाली होती. सायंकाळपर्यंत सुमारे अडीचशे पथकांनी संकल्पच्या दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली होती. मागील वर्षी संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीत सुमारे 400 मंडळे सहभागी झाली होती. दूरचित्रवाणीवरील प्रसिद्ध बालिकावधूया कार्यक्रमातील कलाकारांचा परफॉर्मन्स संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीचे वैशिष्टय़ ठरले. तसेच, ‘इंडियाज् गॉट टॅलेन्टच्या कलाकारांनीही उत्सवात रंगत आणली. त्यांनी देशभक्तीपर गीतांवर समूहनृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. गायक सुखविंदरने स्लमडॉग मिल्यनेयरचित्रपटातील जय होगाणे सादर करून प्रेक्षकांच्या टाळ्या वसूल केल्या. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता, बॉलिवूडचा अभिनेता सुनील शेट्टी, अभिनेत्री करिश्मा कपूर, आमदार रमेश शेंडगे, नितीन सरदेसाई आदींनी या उत्सवाला हजेरी लावली होती.   
  • जखमी गोविंदांची संख्या 273 वर40 रुग्णालयात

 थरांचा थरथराटअनुभवत मुंबईकरांनी गोकुळाष्टमी साजरी केली असली तरी यानिमित्ताने दहीहंडी फोडणा-यांची डोकीही फुटली. अनेक ठिकाणी किरकोळ तर काही गंभीर जखमींची नोंद झाली. संध्याकाळी महापालिका अखत्यारीत असणा-या रुग्णालयात तब्बल 273 गोविंदांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी 233 गोविंदांवर औषधोपचार झाले तर 40 जण गंभीर जखमी झाले. दोघे अत्यवस्थ आहेत. प्रामुख्याने हात, पाय, मान आणि डोक्याला मार लागून जखमी झालेल्यांचे प्रमाण मोठे होते. अनेक हंडी रात्री उशिरा फोडण्यात येत असल्याने ही आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे.

 परळच्या केईएम रुग्णालयात सर्वाधिक 107 जखमी गोविंदांवर उपचार झाले. यात गंभीर जखमी झालेल्या 13 जणांना विशेष उपचार कक्षात दाखल करून घेण्यात आले. काही जणांवर शस्र्क्रिया करण्यात आली तर अनेकांच्या मोडलेल्या हाडांसाठी फ्रॅक्चर घालावे लागले. केईएम रुग्णालयात जखमी गोविंदांसाठी 50 बेडचा विशेष कक्ष स्थापन करण्यात आला होता. शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात 40 जखमी गोविंदा उपचारासाठी दाखल झाले. त्यांच्यापैकी 10 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे नियंत्रण कक्षाने सांगितले. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयातही 16 जणांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी चौघा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. मुलुंड येथील एम. टी. अगरवाल रुग्णालयात 13 जणांवर उपचार झाले. बोरिवलीच्या भगवती रुग्णालयात 15 रुग्ण गोविंदा दाखल झाले त्यांच्यापैकी एक जण मानेला झालेल्या अपघातामुळे गंभीर जखमी झाला. जुहूच्या कूपर रुग्णालयातही 16 गोविंदांवर इलाज करण्यात आले. तिथे पाठीला मार लागलेल्या एका रुग्णावर शस्र्क्रिया करण्यात आली तर दुस-या रुग्णावर उपचार सुरू आहेत. वांद्रे येथील भाभा रुग्णालयात पाच जणांवर उपचार करण्यात आले.   
  • गोविंदांच्या नगरीत गोपिकांची धूम 
गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिज बाला..म्हणत शहरभर हंडी फोडण्यास निघालेल्या गोविंदांबरोबर मटकीसांभाळणा-या बालांनीही मुंबई, ठाण्यातील हंडय़ा फोडण्याचा आनंद यथेच्छ लुटला. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील लेडीज स्पेशलदहीहंडय़ांना लक्ष्यकरत फिरणा-या या गोपिकांमध्ये पुरुष गोविंदाइतकाच उत्साह दिसून येत होता. या उत्साहाला लयबद्धता आणि अचूक तोल यांची जोड लाभल्याने महिला गोविंदांच्या थराराला सा-यांचीच दाद मिळत होती. दरवर्षी महिला गोविंदा पथकांत दिसणारी कबड्डी-खोखोतील खेळाडूंची मक्तेदारी यंदा मोडीत निघाल्याचेच दिसत होते. एअरहोस्टेस, कॉन्स्टेबल, शिक्षिकांपासून बँकेत काम करणाऱ्यांपर्यंत विविध क्षेत्रातील मुली, महिला आपली परंपरागत ओळख बाजूला ठेवून अगदी बिनधास्त दहीकाला उत्सवात सहभागी झाल्या होत्या. बोल बोल बोल बजरंग बली की जयअशी आरोळी ठोकत एकेक करत मैदानात उतरणाऱ्या गोपिका, क्षणार्धात एकेका थरावर चढणारे थर, मधेच तोल जाऊन सर्रकन खाली येणारे थर.. पाहताना उपस्थितांच्या हृदयाचा ठोकाही चुकत होता. त्यांच्या या मर्दानीरूपाला प्रोत्साहन देण्यासाठी आपसूकच त्यांचे हात उंचावले जात होते. अवघा परिसर अवाक होऊनच हा थरार अनुभवत होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे चेंबूर, वांद्रे, घाटकोपर येथे लेडीज स्पेशलहंडय़ा लावण्यात आल्या होत्या. घाटकोपरमधील ठक्करबाप्पा कॉलनी, कुल्र्यामध्ये एक तर चुनाभट्टीमध्ये चार हंडय़ा महिलांसाठीच होत्या. दादरमधील साई दत्त मंडळाची मानाची हंडी फोडण्याचा मान विक्रोळी क्रीडा केंद्राच्या महिला  पथकाने मिळवला. या पथकाने पाच थर लावले. तर दुसरी हंडी गिरगाव महिला पथकाने फोडली. दादर येथील हंडी फोडून झाल्यानंतर विक्रोळी क्रीडा मंदिरच्या पथकाने प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभादेवी, संकल्प (वरळी), चेंबूर, टागोरनगर, कन्नमवारनगर, ऐरोली, मुलुंड येथील प्रत्येकी तीन हंडय़ा फोडल्या. वरळी येथील जांभोरी मैदानातील संकल्प प्रतिष्ठानच्या महोत्सवात 10 महिला गोविंदा पथकांनी सलामी दिली. ठाण्यातील संकल्प महिला गोविंदा पथकाने महेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली संकल्प (ठाणे) येथील हंडी फोडून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आयोजित केलेल्या संघर्षच्या हंडीला सलामी दिली. येथे या पथकाने सहा थर लावले होते. वर्तक नगर येथील संकल्प युवा प्रतिष्ठान महोत्सवात या पथकाने सात थर लावण्याचा केलेला प्रयत्न फसला.  
  • कडेकोट सुरक्षा
दहीहंडी महोत्सवात घातपात होऊ नये, यासाठी मुंबईचे पोलिस आयुक्त संजीव दयाळ यांनी एक बैठक घेऊन सुरक्षिततेच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दादर, वरळी, चेंबूर, वांद्रे या भागात सर्वात उंच तसेच मोठय़ा रकमेच्या दहीहंडय़ा उभारल्या आहेत. या ठिकाणी गोविंदा पथक तसेच गर्दी होणार हे लक्षात घेऊन पोलिसांनी महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. महिला गोविंदा पथकाच्या आसपास महिला पोलिस तैनात करण्यात आले होते. पोलिस अतिरिक्त आयुक्त विनीत अगरवाल यांनी सुरक्षाव्यवस्था योग्य काम करते की नाही, हे पाहण्यासाठी पोलिस निरीक्षकांना तैनात केले होते. त्याचबरोबर सशस्त्र बल, होमगार्ड यांचीही मदत घेण्यात आली होती.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0