PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: रस्ते दुरुस्तीसाठी पुन्हा 60 कोटींची उधळपट्टी रस्ते दुरुस्तीसाठी पुन्हा 60 कोटींची उधळपट्टी ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 03 September, 2010 12:07:00 PM मुंबई- रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी 60 कोटी रुपयांची तरतूद केली असताना बुधवारी स्थायी समितीने आणखी 60 कोटी रुपये रस्त्यांच्या कामासाठी मंजूर केले आहे. शहर, पूर्व व पश्चिम अशा तीन विभागांसाठी प्रत्येकी 20 कोटी रुपयांच्या कामाला ही मंजुरी दिली असून या या निधीतून एमएमआरडीएच्या ताब्यातून महापालिकेने हाती घेतलेल्या 12 रस्त्यांवर हा पैसा खर्च केला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. एमएमआरडीएने अर्धवट सोडलेल्या रस्त्यांची कामे स्वतंत्रपणे हाती घेणे आवश्यक असताना खड्डे दुरुस्त करणा-या कंत्राटदारांना पुन्हा कमावण्याची संधी देण्यात आली आहे. मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुंबईतील 18 रस्त्यांचा विकास करण्यासाठी हे रस्ते स्वत:च्या ताब्यात घेतले होते. मात्र या रस्त्यांच्या विकासाचे काम हाती घेतल्यानंतर या कामांमध्ये येणा-या अनेक अडचणींमुळे एमएमआरडीएने 18 पैकी 12 रस्ते महापालिकेच्या ताब्यात परत दिले. एस. व्ही. रोड, लालबहादूर शास्त्री मार्ग, गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता, ना. सी. फडके मार्ग, शीव-धारावी जोडरस्ता, साकी विहार रस्ता, मरोळ-मरोशी, महाकाली गुंफा, बी. डी. सावंत मार्ग, सहार रस्ता, अंधेरी-कुर्ला जोडरस्ता आदींसह 12 अर्धवट कामे झालेल्या रस्त्यांची जबाबदारी महापालिकेने एमएमआरडीएकडून स्वत:च्या खांद्यावर घेतली. एमएमआरडीएने अर्धवट सोडलेल्या रस्त्यांच्या कामासाठी जास्त खर्च येणार असल्याने त्या रस्त्यांची कामे त्वरित हाती घेता येणार नाहीत, असे महापालिकेच्या रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता ए. व्ही. राळकर यांनी स्पष्ट केले होते.