PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: डोंबिवली स्थानकात भाजपचे रेल रोको डोंबिवली स्थानकात भाजपचे रेल रोको ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 03 September, 2010 12:35:00 PM डोंबिवली- भारतीय जनता पक्षाच्यावतीने शुक्रवारी डोंबिवली स्थानकात दुपारी 12 वाजल्यापासून रेल रोको आंदोलन करण्यात येत आहे. या रेल रोको आंदोलनामुळे छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाकडे जाणा-या सर्व लोकल गाड्यांची वाहतूक ठप्प झाली आहे. कल्याण-डोंबिवली येथील रेल्वे स्थानकांच्या समस्या दूर करण्यात यावा, कल्याण-डोंबिवली दरम्यान समांतर रस्ता बांधण्यात यावा, ठाकुर्ली येथे उड्डाणपूल बांधण्यात यावा अशा विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांची पूर्तता करण्यात यावी या मागणीसाठी भाजपतर्फे हे आंदोलन करण्यात येत आहे. कल्याण-डोंबिवलीहून प्रवास करणा-या रेल्वे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कल्याण-डोंबिवली समांतर मार्ग बांधण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याशिवाय ठाकुर्ली येथे रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात यावा, तसेच ठाकुर्ली- महिला समिती शाळेसमोर बायपास रस्ता बांधण्यात यावा यासारख्या अनेक मागण्यांसाठी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही त्याकडे रेल्वे प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. रेल्वे प्रशासनाच्या या आडमुठ्या भूमिकेविरोधात भारतीय जनता पक्षाचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी डोंबिवली स्थानकात रेले रोको आंदोलन करण्यात येत आहे. डोंबिवली स्थानकातून 11 वाजून 59 मिनिटांनी सुटणारी डोंबिवली लोकल भाजपच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे ट्रॅकमध्ये उतरून अडवली आणि त्यानंतर सीएसटीकडे जाणा-या सर्व लोकल गाड्या अडवण्यात आल्या आहेत. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. या आंदोलनाची दखल रेल्वे प्रशासनाने गंभीरपणे घेतली नाही तर रेल्वेच्या सहा स्थानकांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येणारा पाणीपुरवठा बंद करण्यात येईल असा इशारा आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे.