PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: 34 उड्डाणपूल ‘डेंजर झोन’मध्ये 34 उड्डाणपूल ‘डेंजर झोन’मध्ये ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 07 September, 2010 10:20:00 AM मुंबई : मुंबई महापालिकेच्या हद्दीतील 34 उड्डाणपूल अत्यंत धोकादायक अवस्थेत असून मिराणी यांच्या अध्यक्षतेखाली स्टॅक समितीच्या शिफारशीनंतर तब्बल तीन वर्षानी पालिका प्रशासनाने धोकादायक उड्डाणपुलांच्या तपासणीसाठी सल्लागार कंपन्यांची निवड केली आहे. या तपासणीमध्ये 16 प्रकारच्या चाचण्या करून या कंपन्या उड्डाणपुलांच्या दुरुस्तीबाबत अहवाल देणार आहेत. मुंबईत रेल्वेवरील पूल, उड्डाणपूल तसेच पादचारी पूल असे एकूण 253 पूल आहेत. यामध्ये नदी-नाल्यांवर 102, 14 उड्डाणपूल, रेल्वेवरील 41, 22 रेल्वेवरील पादचारी पूल, 48 पादचारी पूल, 10 पादचारी, 13 भुयारी मार्ग अशा 253 पुलांची पाहणी करण्यासाठी निवृत्ती प्रधान सचिव एन. व्ही. मिराणी यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी तांत्रिक सल्लागार समितीची (स्टॅक) नियुक्ती करण्यात आली होती. या समितीमधील तज्ज्ञ अभियंत्यांनी पुलांची पाहणी करून यापैकी 58 पुलांची दुरुस्ती आवश्यक असल्याची शिफारस केली होती. या 58 उड्डाणपुलांपैकी 22 पूल हे रेल्वे व एमएमआरडीएच्या अधिपत्याखाली असल्याने ती त्यांच्यातर्फे दुरुस्त करण्यात येणार आहेत. त्यामुळे उर्वरीत दोन पूल वगळता 34 पुलांच्या सखोल तपासणीसाठी इन्फ्रा कन्सल्टन्स, टेक्नाजेम कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड आणि स्ट्रक्ट रिहॅब या तीन सल्लागार कंपन्यांना प्रत्येकी दोन गटांचे काम सोपवले आहे. प्रत्येक गटाला कमीत कमी 10 लाख रुपये तर, जास्तीत जास्त 15 लाख रुपये खर्च करण्यास प्रशासनाने मान्यता दिली असून, हा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीपुढे मंजुरीसाठी येत आहे. धोकादायक पूल शहर : पी. डिमेलो रोड, डॉकयार्ड रोड स्टेशन, प्रिन्सेंस स्ट्रीट, फ्रेंच (ऑपेरा हाऊस), रे रोड स्टेशन, करोल (एलफिन्स्टन), हाजी अली भुयारी मार्ग, केम्स कॉर्नर, टिळक पूल, गिरगाव पादचारी पूल. पश्चिम उपनगर : मढ व्हिलेज, एस. व्ही. रोड, कांदिवली गावदेवी रोड, फॅक्टरी लेन. पूर्व उपनगर : सीएसटी रोड कुर्ला, सॅलियन नगर कुर्ला, ए. एच वाडीया कुर्ला, न्यू मिल रोड कुर्ला, क्रांतीनगर कुर्ला, सीएमसी फॅक्टरी गोवंडी, रफिक नगर गोवंडी, जीएमएलआरआयओसी कॉलनी, जीएमएलआर पीएमजीपी कॉलनी, पंचनल टाटा नगर, लोखंडे मार्ग(एनजी स्कूल), देवनार कॉलनी नगर, मैत्री पार्क, जीएएलआर बेस्ट डेपोजवळ, जीएएलआर, टेंबेपाडा भांडुप, एलसी नं 20 मुलुंड, तानसा मेन रमाबाई, विणानगर, रमाबाई पाडा.