मुंबईतील गणेशोत्सवाला ‘इको’ प्रतिसाद..
गिरगावातील कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेश मूर्तीचे विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आहे. मूर्तीचे विसर्जन न करणारे मुंबईतले हे पहिलेच मंडळ ठरणार आहे.
मुंबई- गिरगावातील कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेश मूर्तीचे विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आहे. मूर्तीचे विसर्जन न करणारे मुंबईतले हे पहिलेच मंडळ ठरणार असून त्यांनी फायबरची गणेश मूर्ती तयार केली आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्याचा पर्यावरण विभाग तसेच विविध संस्थांमार्फत दरवर्षी पर्यावरणस्नेही मूर्ती वापरण्याबाबत व त्या मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावांत करण्याचे आवाहन केले जाते. गणेशभक्तांच्या भावनांचा प्रश्न उपस्थित करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हा पर्याय स्वीकारताना दिसत नाहीत. परंतु गेली 83 वर्षे गणेशोत्सव साजरा करणा-या कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेश मूर्तीचे विसर्जन न करण्याचा निर्णय घेऊन नवा पायंडा घालून दिला आहे.
याबाबत मंडळाचे सचिव अवधूत गवाणकर यांनी सांगितले की, गेली दोन वर्षे आम्ही पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नेमके काय करता येईल, याबाबत विचार करत होतो. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभागाने दोन महिन्यांपूर्वी घेतलेल्या बैठकीनंतर या वर्षी आपण इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेश मूर्तीचे विसर्जन करायचे नाही, यावर शिक्कामोर्तब झाले. मंडळाने मूर्तिकार विजय खातू यांच्याकडून आठ फूटी फायबरची मूर्ती बनवून घेतली असून मूर्तीच्या रंगकामासाठीही नैसर्गिक रंग वापरले आहेत. विसर्जनादिवशी या मूर्तीला चौपाटीवर नेण्यात येईल. तेथे मूर्तीची पूजा करून पावलांवर पाणी घालून पुन्हा ती मूर्ती मंडपात आणली जाणार आहे. मंडपही खास फायबरचाच बनवण्यात आला आहे. तेथेच ही मूर्ती ठेवली जाईल. शिवाय दर संकष्टीला मूर्तीची यथासांग पूजा केली जाणार असून माघी गणेशोत्सवही साजरा केला जाणार आहे.
गणेशोत्सवासाठी मुंबापुरी सज्ज
अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी मुंबापुरी सज्ज झाली आहे. गणपतीसाठी लागणारे कंठी, माळ, हार, मखर, सजावटीचे साहित्य आदींनी बाजार फुलून गेले आहेत. काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मूर्ती मंडपात नेऊन स्थानापन्नदेखील केली आहे.
इको-फेंड्रली गणेशमूर्तीबाबत लोकांमध्ये हळूहळू जागृती वाढत असल्याने यंदा अशा मूर्तीना जास्त मागणी आहे. घरगुती गणेशोत्सवासाठीही लोकांचा कल कागदी इको-फ्रेंडली मखरे घेण्याकडे आहे. या मखरांचे भाव हजार रुपयांपासून पुढे आहेत. खेतवाडी 11 वी गल्ली, 10 वी गल्ली, कुल्र्याचा राजा, परेल धरती गल्ली गणेशोत्सव मंडळ आदी मंडळांनी गणेशमूर्ती नेल्या आहेत. उपनगरात दूरवर राहणा-या लोकांनी घरगुती गणपती शनिवारची गर्दी टाळण्यासाठी आधीच घरी नेणे पसंत केले आहे. परदेशात जाणा-यी मूर्तीही रवाना झाल्या आहेत.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा