PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: टीएमटीतील 63 कर्मचारी बडतर्फ टीएमटीतील 63 कर्मचारी बडतर्फ ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 07 September, 2010 10:38:00 AM ठाणे- डबघाईला आलेल्या ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) भ्रष्ट वाहतूक अधिका-यासह तब्बल 63 कर्मचा-यांच्या बडतर्फीवर सोमवारी आयुक्त आर. ए. राजीव यांनी शिक्कामोर्तब केले. तसेच इतर दोन भ्रष्ट अधिका-यांची पदावनती करून त्यांना आयुक्तांनी सूचक इशारा देत टीएमटीचा रुतलेला गाडा रुळावर आणण्याच्या कामाची नांदी केली आहे. टीएमटी सेवेच्या कामात दांडय़ा मारणा-या कर्मचा-यांनी 48 तासांत हजर व्हावे; अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त राजीव यांनी काही दिवसांपूर्वी परिवहन संदर्भात बोलावलेल्या विशेष सभेत दिला होता. या कर्मचा-यांना 31 ऑगस्टपर्यंतची कामावर हजर राहाण्याची मुदत देण्यात आली असतानाही गैरहजर असणा-या 141 कर्मचा-यांपैकी केवळ 27 कर्मचारीच हजर झाले होते. अखेर सोमवारी आयुक्तांनी दीर्घकालीन रजेवर असणा-या 62 कर्मचा-यांना आणि वाहतूक अधीक्षक गुरुनाथ पेडणेकर यांना बडतर्फ केले. बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचा-यांमध्ये वाहक, चालक आणि मॅकेनिक यांचा समावेश आहे. दरम्यान, टीएमटीचे कार्मिक अधिकारी अजित निराळी आणि दामोदर नानकर यांची पदावनती करण्यात आली आहे.