PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: संघटनेत ‘फिक्सिंग’ खपवून घेणार नाही संघटनेत ‘फिक्सिंग’ खपवून घेणार नाही ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 07 September, 2010 10:40:00 AM मुंबई- कामगारांना केंद्रस्थानी ठेऊन महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेची प्रगती आणि वाढ झाली पाहिजे. कामगारहिताचा बळी देऊन कंपनीच्या व्यवस्थापनाशी काही संघटनांचे पुढारी ‘फिक्सिंग’ करतात. ‘समर्थ’मध्ये अशा प्रकारचे ‘फिक्सिंग’ अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा देत संघटना संख्यात्मक नव्हे, तर गुणात्मक पातळीवर मोठी झाली पाहिजे, अशी अपेक्षा राज्याचे महसूलमंत्री व महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचे संस्थापक नारायण राणे यांनी व्यक्त केली. सोमवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात संघटनेचा पाचवा वर्धापनदिन सोहळा पार पडला. त्या वेळी कामगारांना मार्गदर्शन करताना नारायण राणे बोलत होते. या वेळी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सरमळकर, सरचिटणीस व ‘स्वाभिमान’चे अध्यक्ष नितेश राणे, माजी आमदार श्याम सावंत व संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. सरमळकर यांनी आपल्या भाषणात नितेश राणे हे कंपनीकडे कामगारांची बाजू मांडताना चांगली बॅटिंग करतात. आम्ही इतकी चांगली बॅटिंग करू शकत नसलो, तरी फिल्डिंग आणि बॉलिंगची जबाबदारी व्यवस्थित पार पाडतो, असे उद्गार काढले. त्यांना मिश्कील शब्दांत चिमटा घेताना राणे म्हणाले की, संघटनेच्या भल्यासाठी बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग कुणीही केली, तरी त्याला माझी हरकत नाही. पण ‘फिक्सिंग’ अजिबात खपवून घेतली जाणार नाही. पाच वर्षात आपण केलेल्या घोडदौडीचे आत्मपरीक्षण प्रत्येकाने केले पाहिजे. त्यातून पुढील वाटचालीची दिशा आणि ध्येय ठरेल. कामाबद्दल समाधानाची भावना निर्माण झाली की, प्रगती खुंटते. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व संघटनांमध्ये ‘समर्थ’ पहिल्या क्रमांकावर राहील, या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. नुसतीच ‘बंद’ची हाक देऊन भागणार नाही. तर कामगार आणि कारखाना दोन्हीही टिकतील, याची काळजी घ्यायला हवी. संघटनेची विश्वासार्हता टिकली, तर कामगार आपोआप तिच्याकडे येतील. पुढील वर्षीपर्यंत ‘समर्थ’च्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये असलेल्या संघटनांची संख्या १००वरून ५००पर्यंत नेण्याचा निर्धार सरमळकर यांनी बोलून दाखविला. जागतिकीकरणाच्या युगात फोफावलेल्या कंत्राटदारी पद्धतीचा बीमोड करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे उद्गार नितेश राणे यांनी काढले. बाळा कसालकर यांनी सूत्रसंचालन केले.