जल्लोषाचा थरार
तुझ्या घरात नाही पाणी, घागर उताणी रं गोपाळा.. अशा जल्लोषात गोविंदा पथकांनी सात, आठ अगदी नऊ थर रचून दहीहंडीची हुंडी गुरुवारी मुंबई-ठाण्यात वटवली.
मुंबई- गोविंदा रे गोपाळा.. मच गया शोर सारी नगरी रे.. तुझ्या घरात नाही पाणी, घागर उताणी रं गोपाळा.. अशा जल्लोषात गोविंदा पथकांनी सात, आठ अगदी नऊ थर रचून दहीहंडीची हुंडी गुरुवारी मुंबई-ठाण्यात वटवली. मुंबई- ठाण्यातील हंड्यांना ‘लाख’मोलाचा राजकीय आश्रय देणा-या नेत्यांनी गेल्या काही वर्षात सणापेक्षा ‘चढाओढीचा आणि इर्षेचा इव्हेंट’ बनवलेल्या या उत्सवातील जोखीम नजरेआड करणा-या गोविंदांपैकी अनेकजण सहाव्या, सातव्या थरावरून कोसळून गंभीर जखमीही झाले. पण, मानवी मनो-यांमधील थरार आणि हंडीतील ‘लोणी’ मिळवण्यासाठी झपाटलेल्या गोविंदांना त्याची फिकीर नव्हती. ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठान, संघर्ष, संस्कृती या दहीहंड्यांसाठी नावाजलेल्या मंडळांमध्ये जोरदार चुरस होती.
ठाण्यात यंदाही मुंबईच्याच मंडळांनी लाखोंचे लोणी ‘मटका’वले. महिला गोविंदांनीही यंदा ‘हम भी है जोश मे..’ दाखवून देत अनेक बक्षिसे मिळवली. मुंबईत वांद्रे खेरनगरमधील महाराष्ट्र समर्थ कामगार संघटना, घाटकोपरमधील राम कदम मित्रमंडळ, वरळीतील संकल्प प्रतिष्ठान, अंधेरी उत्सव सेवाभावी संस्था, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाण्यात संघर्ष प्रतिष्ठान, टेंभीनाका, संकल्प प्रतिष्ठान, ठाणे, संस्कृती युवा प्रतिष्ठान, साई जलाराम प्रतिष्ठान आणि आनंद चॅरिटेबल ट्रस्ट या लाखमोलाच्या हंड्यांसाठी रात्री उशिरापर्यंतधामधूम सुरू होती. दहाव्या थरापर्यंत कुणीही मजल मारू शकले नाही. यामुळे दिवसभरात अनेक मंडळांच्या गोविंदांनी सात ते नऊ थरांची सलामी दिल्यावर रात्री उशिरा ब-याच हंड्या खाली उतरवण्यात येऊन फोडण्यात आल्या. रात्री उशिरा फोडण्यात आल्या.
प्रचंड गर्दीत आणि जल्लोषात दिवसभर रंगलेल्या या थराराकडे पावसाने पाठ फिरवली असली तरी टँकरमधून पाईपद्वारे पाण्याची फवारणी करत आयोजकांनी गोविंदांच्या उत्साहावर विरजण पडणार नाही याची काळजी घेतली. मुंबई, ठाण्यासह अनेक ठिकाणी राजेश खन्ना, जितेंद्र, अक्षय कुमारसह अनेक हिंदी-मराठी कलाकारांनी उपस्थित राहून या गोविंदांच्या धुमधडाक्यात भर घातली.



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा