जि.प.,पं.स.साठी 65 टक्के मतदान
राज्यातील 27 जिल्हा परिषदा आणि 305 पंचायत समित्यांसाठी सरासरी 65 टक्के मतदान झाले आहे.
नियोजित वेळेप्रमाणे सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात झाली. ग्रामीण भागात थंडीचा कडाका असल्याने सकाळी मतदानाचा वेग अत्यंत मंद होता. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत सरासरी मतदान 8.11 टक्के इतके झाले होते. त्यानंतर मात्र मतदानाला वेग आला. 11.30 वाजता सरासरी 19.74 टक्के तर दुपारी 3.30 पर्यंत 35 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मात्र मतदानाचा वेग वाढला व सायंकाळी 5.30 वाजता राज्यात 65 टक्के मतदान झाले.
वाळवा तालुक्यातील एका मतदान केंद्रावर कोणतेही बटण दाबले तरी त्याचे मत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला जात होते. ते अन्य एका ठिकाणी ज्या उमेदवाराच्या नावासमोरील बटण दाबले आहे, त्याला मत न मिळता दुस-याच उमेदवाराला मत पडत होते. त्याबाबतची तक्रार येताच ते यंत्र बदलण्यात आले. केज तालुक्यात पंचायत समितीसाठी असलेल्या मतदार यंत्राशी जिल्हा परिषदेचा डाटा जोडला होता, तर जिल्हा परिषदेचा डाटा पंचायत समितीसाठी जोडला गेल्याने काही काळ गोंधळ झाला होता. तक्रार येताच तेथे बदल करण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी सांगितले.
दापोलीत बोटाला लावलेली शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी आल्या. राष्ट्रवादीचे उमेदवार पंडितअण्णा मुंडे यांच्याकडे मतदान ओळखपत्र नसल्याने त्यांना मतदान करता आले नाही.
कोणतेही बटण दाबा, मत राष्ट्रवादीलाच!
कोल्हापूर- ‘मतदान यंत्रावरील कोणतेही बटण दाबा, मत राष्ट्रवादीलाच मिळणार!’ ही अजब करामत आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यामधील हसूर खुर्द येथील मतदान केंद्रावरील मतदान यंत्राची. मंगळवारी तब्बल दोन तास याच प्रकारे मतदान होत होते. दुपारी एक वाजता काही मतदारांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रशासकीय अधिका-यांच्या हे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर मतदारांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. मतदाराने कोणतेही बटण दाबले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्हे असलेल्या घडय़ाळालाच मत पडत असल्याचा प्रकार चुकीचा असून, फेरमतदान करावे, अशी मागणी मतदारांनी केली. हसन मुश्रीफ यांचा मुलगा नाविद हा या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभा आहे.
उमेदवाराच्या कार्यालयातून दारू, रोकड जप्त
गडचिरोली- जिल्हा परिषदेच्या अमीर्झा मतदारसंघाचे उमेदवार बंडोपंत मल्लेलवार यांच्या कार्यालयातून पोलिसांनी तब्बल दीड लाख रुपये रोख आणि देशी-विदेशी दारूच्या 52 बाटल्या जप्त केल्या. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मल्लेलवार हे पसार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी त्यांचे साथीदार अमीरअली नाथानी याला अटक केली आहे.
गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा गोळीबार
गडचिरोलीतील धानोरा तालुक्यात छत्तीसगढ सीमेजवळ कामथडा गावात नक्षलवाद्यांनी मतदान केंद्राजवळ गोळीबार केला. त्यात कोणीही जखमी झाले नसून ग्रामस्थांना घाबरवण्यासाठी हा गोळीबार केल्याचे सांगण्यात येते. सोमवारीच नक्षलवाद्यांनी पत्रके वाटून मतदान न करण्याचे आवाहन जिल्ह्यातील रहिवाशांना केले होते. मात्र, या धमक्यांना न जुमानता गडचिरोलीत मतदारांनी भरघोस मतदान केले. जिल्ह्यात 67 टक्के मतदान झाले असून, किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान झाले.





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (1 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा