कोळशाच्या टंचाईने चुकले वीज निर्मितीचे उद्दिष्ट
चालू पंचवार्षिक योजनेत ७८ हजार मेगावॉट आणि प्रस्तावित १३व्या पंचवार्षिक योजनेत त्याहीपेक्षा महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे ठेवण्यात येणार असताना दरवर्षी ऊर्जानिर्मितीचे निश्चित लक्ष्य गाठण्यात भारताला अपयश येत आहे.
मुंबई- चालू पंचवार्षिक योजनेत ७८ हजार मेगावॉट आणि प्रस्तावित १३व्या पंचवार्षिक योजनेत त्याहीपेक्षा महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे ठेवण्यात येणार असताना दरवर्षी ऊर्जानिर्मितीचे निश्चित लक्ष्य गाठण्यात भारताला अपयश येत आहे. चालू आर्थिक वर्षात (२००९-१०) एप्रिल ते जानेवारी या १० महिन्यांच्या काळात उद्दिष्टापेक्षा तब्बल २१ हजार दशलक्ष युनिट कमी विजेची निर्मिती झाली आहे. कोळशाचा अपुरा पुरवठा आणि गेल्या वर्षी पावसाने दिलेली ओढ यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. आर्थिक वर्ष संपायला दोनच महिने उरले असून पाण्याची टंचाई आता अधिकच भासू लागल्यामुळे जलविद्युत प्रकल्पांप्रमाणेच औष्णिक विद्युत प्रकल्पांनाही त्याचा फटका बसणार असून उद्दिष्ट गाठणे अशक्य होणार आहे.
एप्रिल ते जानेवारी या कालावधीत सहा लाख ५८ हजार ९३६ दशलक्ष युनिट वीज निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र, सहा लाख ३८ हजार १४२ दशलक्ष युनिट विजेचीच निर्मिती साध्य झाली आहे. गतवर्षीच्या याच कालावधीतील तुलनेत वीजनिर्मितीत ६.११ टक्के वाढ झाली असली तरी कोळसा आणि पाण्याच्या अभावामुळे या वाढीला खीळ बसली आहे. जानेवारी २०१० या एका महिन्यात उद्दिष्टाच्या ९५ टक्के (उद्दिष्ट - ६७ हजार ५७० दशलक्ष युनिट, प्रत्यक्ष - ६४ हजार ८५४ दशलक्ष युनिट) वीज निर्मिती करणे शक्य झाले आहे. गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत यात सुमारे साडेपाच टक्के वाढ झाली असली तरी कोळशाची आयात ठरल्याप्रमाणे झाली असती आणि एनटीपीसीच्या देशभरातील प्रकल्पांतून ठरल्याप्रमाणे वीजनिर्मिती झाली असती तर ही वाढ सहा टक्क्यांवर गेली असती, असे देशाच्या ऊर्जा क्षेत्रातील घडामोडींवर देखरेख ठेवणा-या केंद्र सरकारच्या केंद्रीय ऊर्जा प्राधिकरणाच्या ताज्या अहवालात म्हटले आहे.
या अहवालातील ठळक बाब म्हणजे वायूवर आधारित प्रकल्पांतून वाढलेली वीजनिर्मिती. के.जी. बसिन (डी ६) मधून वायू पुरवठ्याचे प्रमाण वाढल्यामुळे वायूवर आधारित वीजनिर्मितीला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली आहे. येथून मिळणा-या वायूत एकट्या जानेवारी महिन्यात तब्बल ३९.४५ टक्क्यांची तर एप्रिल ते जानेवारी या कालावधीत ३२.०३ टक्के वाढ झाली आहे. या कालावधीत औष्णिक प्रकल्पांतून होणा-या वीज निर्मितीत झालेली ८.६८ टक्क्यांची वाढ ही संपूर्णत: वायूवर आधारित प्रकल्पांच्या उंचावलेल्या कामगिरीमुळे आहे. वायूआधारित वीज प्रकल्पांनी तर या कालावधीत उद्दिष्टापेक्षा अधिक वीजनिर्मिती केली आहे. कोळशावर आधारित प्रकल्पांतील वीजनिर्मितीत मात्र या काळात अवघी २.१६ टक्के वाढ झाली आहे.



del.icio.us
Digg
Facebook
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा