PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत संमत महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत संमत ================================================================================ एजन्सी on 09 March, 2010 07:05:00 PM नवी दिल्ली- महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये 33 टक्के आरक्षण देण्यासाठीचे विधेयक मंगळवारी राज्यसभेत मंजूर झाले. 186 विरुद्ध 01 अशा फरकाने महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत मंजूर झाले. राज्यसभेत गोंधळ घालणा-या सात खासदारांवर मंगळवारी राज्यसभा अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी निलंबनाची कारवाई केली. महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यासाठीचे घटनादुरुस्ती विधेयक अध्यक्षांनी राज्यसभेत आवाजी मतदानासाठी मांडले. मात्र विधेयकाच्या बाजूने असलेल्या भाजप आणि डाव्या पक्षांनीही चर्चेशिवाय मतदान घेण्यास विरोध केल्यामुळे विधेयकावर चर्चा सुरू झाली. चर्चा पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान घेण्यात आले. महिला आरक्षण विधेयक सोमवारीच राज्यसभेत मांडले गेले होते मात्र राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष आणि लोक जनशक्ती पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेत गोंधळ घातल्यामुळे विधेयकावर चर्चा होऊ शकली नव्हती. दरम्यान, यूपीएचा घटक पक्ष तृणमूल काँग्रेसने या विधेयकावर मतदान करण्यास नकार दिला आहे. या विधेयकावरील मतदानाबाबत कोणतीही पूर्वसूचना मिळाली नसल्यामुळे पक्षाचे दोन खासदार मंगळवारी राज्यसभेत उपस्थित नव्हते. राज्यसभेत लोकशाही मूल्यांची बूज न राखता मतदान घेण्यात आल्याने लोकसभेत तृणमूल काँग्रेस लोक मतदान करणार नाही, असे पक्षाचे लोकसभेतील मुख्य प्रतोद सुदीप बंधोपाध्याय यांनी सांगितले.