PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: मोदींना एसआयटीपुढे हजर राहण्याचे आदेश मोदींना एसआयटीपुढे हजर राहण्याचे आदेश ================================================================================ पीटीआय on 11 March, 2010 06:10:00 PM अहमदाबाद- गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या भीषण जातीय दंगलींचा तपास करणा-या विशेष तपास पथकाने (एसआयटी) मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना 21 मार्च रोजी चौकशीसाठी पाचारण केले आहे. एसआयटीचे प्रमुख आर के राघवन यांनी गुरुवारी ही माहिती दिली. अहमदाबादमधील गुलबर्ग सोसायटीत झालेल्या दंगलीत मृत्युमुखी पडलेले काँग्रेस खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी झाकिया यांनी दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात मोदी यांना चौकशीसाठी पाचारण केल्याचे राघवन यांनी स्पष्ट केले. एसआयटीने मोदी यांना पाचारण केले असून आत्तापर्यंत गोळा झालेल्या पुराव्यांच्या आधारावर त्यांना प्रश्न विचारले जातील, असे राघवन म्हणाले. यासाठी मोदी यांना समन्स पाठवण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.