प्रसारमाध्यमांनी संयम बाळगावा-संरक्षणमंत्री
लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांच्या जन्मतारखेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाबाबत तसेच या मुद्दय़ावरून पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी झालेल्या चर्चेसंदर्भात काहीही माहिती देण्यास संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी शनिवारी नकार दिला.
कोची/कोलकाता- लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांच्या जन्मतारखेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाबाबत तसेच या मुद्दय़ावरून पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी झालेल्या चर्चेसंदर्भात काहीही माहिती देण्यास संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी शनिवारी नकार दिला. तुम्ही थोडा संयम बाळगा, थोडा धीर धरा, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे काही काळ वाट पाहा, असे आवाहन त्यांनी प्रसारमाध्यमांना केले. एका कार्यक्रमावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी याबाबत अँटनी यांना प्रश्न विचारला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे लष्करप्रमुखांचे पारडे जड झाले आहे. न्यायालयाने पुढील सुनावणी 10 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. 10 मे 1951 ही आपली जन्मतारीख असल्याचे सिंग यांचे म्हणणे आहे तर संरक्षण खात्याकडील नोंदीवरून सिंग यांची जन्मतारीख 10 मे 1950 आहे. त्यामुळे सिंग मे 2012 मध्ये निवृत्त होत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. आपली जन्मतारीख मे1951 असल्याने मे 2013 मध्ये निवृत्त होत असल्याचे सिंग यांचे म्हणणे आहे. दोन्ही पक्ष आपापल्या म्हणण्यावर ठाम होते. त्यामुळे लष्करप्रमुखांनी सरकारला सर्वोच्च न्यायालयात खेचले. लष्करप्रमुखांनी सरकारला न्यायालयात खेचण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे.
केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी गुरुवारी संध्याकाळी लष्करप्रमुखांबरोबर झालेल्या चर्चेबाबत माहिती देण्यास नकार दिला आहे. लष्करप्रमुख या नात्याने जनरल व्ही. के. सिंग यांनी गुरुवारी आपली भेट घेतली. मात्र, त्या भेटीत झालेल्या चर्चेबाबत आपल्याला प्रसारमाध्यमांशी बोलायचे नसल्याचे मुखर्जी यांनी स्पष्ट केले.




Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा