PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: अपहृत पोलिसाची हत्या? अपहृत पोलिसाची हत्या? ================================================================================ पीटीआय on 02 September, 2010 06:50:00 PM पटणा- माओवाद्यांनी अपहृत केलेल्या चार पोलिस कर्मचा-यांपैकी एकाची हत्या करण्यात आल्याचा दावा केला असून इतरांच्या सुटकेसाठी शुक्रवारी सकाळपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र पोलिस कर्मचा-याला ठार मारल्याच्या वृत्ताला अद्याप अधिकृतपणे दुजोरा मिळालेला नाही. माओवाद्यांचा प्रवक्ता अविनाश याने पीटीआय वृत्तसंस्थेच्या कार्यालयात दूरध्वनी करून पोलिस कर्मचा-याला मारल्याची माहिती दिली. तसेच आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि अन्य कर्मचा-यांच्या मुक्ततेसाठी शुक्रवार सकाळपर्यंतची वेळ राज्य सरकारला दिली आहे. माओवादी आणि पोलिसांमध्ये लखीसराय जिल्ह्यात रविवारी झालेल्या चकमकीनंतर फौजदार रुपेशकुमार, अभय प्रसाद यादव, एहतेशाम खान, लुकास टेटे या चार पोलिसांचे अपहरण करण्यात आले. या कर्मचा-यांच्या सुटकेच्या बदल्या आपल्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी माओवाद्यांनी केली. मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवारी सकाळपर्यंत मुदत दिली होती. मात्र बिहार सरकारने त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नसल्याने संतप्त माओवाद्यांनी एका पोलिस कर्मचा-याची हत्या केल्याचे वृत्त आहे. अपहरण करण्यात आलेल्या एका पोलिस कर्मचा-याला ठार मारल्याचे वृत्त अधिकृतपणे आले नसल्याचे बिहारचे पोलिस महासंचालक नीलमणी यांनी सांगितले. अपहरण करण्यात आलेल्या पोलिसांच्या सुखरुप मुक्ततेसाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, गुरुवारी सकाळी अपहरण करण्यात आलेल्या कर्मचा-यांच्या मुक्ततेसाठी बिहार सरकार माओवाद्यांबरोबर वाटाघाटी करत असून लवकरच या सर्वांची सुटका केली जाईल केंद्रीय गृहसचिव गोपाळ के. पिल्लई यांनी सांगितले होते.