PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू ================================================================================ पीटीआय on 09 March, 2010 04:50:00 PM नवी दिल्ली- महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये 33 टक्के आरक्षण देणा-या विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू आहे. महिला आरक्षण विधेयक सोमवारीच राज्यसभेत मांडले गेले होते. मात्र राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष आणि लोक जनशक्ती पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेत गोंधळ घातल्यामुळे विधेयकावर चर्चा होऊ शकली नव्हती. राज्यसभेत गोंधळ घालणा-या सात खासदारांवर मंगळवारी राज्यसभा अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर महिला आरक्षण विधेयकावर आवाजी मतदान घेण्यात आले. मात्र त्यानंतर दुपारी तीन वाजता विधेयकावर चर्चा सुरू झाली. दरम्यान, सप आणि राजदने खासदारांचे निलंबन मागे घेण्यासाठी घोषणाबाजी सुरूच ठेवली. निलंबित खासदारांना सुरक्षा कर्मचा-यांनी सभागृहाबाहेर काढल्यानंतर शांतता प्रस्थापित झाली. महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यासाठीचे घटनादुरुस्ती विधेयक अध्यक्षांनी राज्यसभेत आवाजी मतदानासाठी मांडले. मात्र विधेयकाच्या बाजूने असलेल्या भाजप आणि डाव्या पक्षांनीही चर्चेशिवाय मतदान घेण्यास विरोध केल्यामुळे विधेयकावर चर्चा सुरू झाली.