चिदंबरम यांच्याविरोधातील याचिका फेटाळली
टू-जी स्पेक्ट्रमप्रकरणी तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सहआरोपी करावे, अशा आशयाची याचिका दिल्ली विशेष न्यायालयाने शनिवारी फेटाळून लावली.
नवी दिल्ली- टू-जी स्पेक्ट्रमप्रकरणी तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सहआरोपी करावे, अशा आशयाची याचिका दिल्ली विशेष न्यायालयाने शनिवारी फेटाळून लावली. माजी दूरसंपर्कमंत्री ए. राजा यांच्याइतकेच स्पेक्ट्रम प्रकरणातील घोटाळय़ाला चिदंबरम जबाबदार असल्याचा आरोप करत जनता दलाचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी यांनी ही याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या निकालामुळे केंद्र सरकार आणि गृहमंत्री पी. चिदंबरम यांना तुर्तास दिला मिळाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने माजी दूरसंपर्कमंत्री ए. राजा यांच्या कार्यकाळातील 122 परवाने शुक्रवारी रद्द केल्यामुळे विशेष न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वाचे लक्ष लागले होते. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी हा निर्णय दिला. तसेच स्वामी यांनी दाखल केलेल्या याचिकेत माजी दूरसंपर्कमंत्री ए. राजा यांच्याविरोधातही आरोप केले होते. त्यावरील खटल्याची सुनावणी 17 मार्चपासून होणार आहे. मात्र, या खटल्यात चिदंबरम यांना सहआरोपी करण्यात येणार नाही, असेही सैनी यांनी स्पष्ट केले. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आश्चर्य व्यक्त करत त्या विरोधात अपील करणार असल्याचे स्वामी यांनी म्हटले आहे. या आधीही सर्वोच्च न्यायालयाने चिदंबरम यांना सहआरोपी करू नये, असे आदेश सीबीआयला देत त्याबाबतचा अंतिम निर्णय विशेष न्यायालय घेईल, असे स्पष्ट केले होते. चिंदबरम यांचा टू-जी प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप करत विरोधकांनी संसदेत गोंधळ घालत हिवाळी अधिवेशनाचा अर्ध्यापेक्षा जास्त कालावधी वाया घालवला होता.निकाल प्रक्रियेतील नाट्य
- चिदंबरम यांना टू-जी प्रकरणात सहआरोपी बवण्यात यावे या सुब्रमण्यम स्वामी यांच्या याचिकेवरील निर्णय सीबीआयच्या विशेष न्यायालय दुपारी सव्वाबाराला होणार होता .
- सुरुवातील न्यायालयाने सुब्रमण्यम स्वामी यांना न्यायालयातील कोर्टरुममध्ये बोलावले.
- पत्रकार आणि वकिलांना कोर्टाबाहेर थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
- त्यानंतर स्वामी यांची पत्नी तसेच दोन वकिलांनाही बोलावण्यात आले.
- न्यायमूर्ती सैनी आणि स्वामी यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली.
- बाहेर आल्यावर कोर्ट रूममध्ये तासभर काय झाले असे स्वामी यांना पत्रकारांनी विचारले असता ‘मी झापलो होतो’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
- चिदंबरम सहआरोपी का होऊ शकत नाहीत?
- विशेष न्यायालयाचा निर्णय
- चिदंबरम यांनी दोन निर्णय पक्षांतर्गत घेतले किंवा सरकारच्या धोरणाचा भाग म्हणून घेतले.
- पहिला निर्णय - स्पेक्ट्रमची किंमत 2001 ला घेतलेल्या निर्णयाप्रमाणे ठेवणे
- दुसरा निर्णय - दोन कंपन्यांच्या समभागांच्या किमती कमी करणे
- या दोन्ही निर्णयात चिदंबरम यांनी कोणताही लाभ उठवला आहे त्याचबरोबर ते कोणत्याही प्रकारच्या कटात सहभागी नव्हते, असे स्पष्ट होते. त्यामुळे त्यांना दोषी ठरवून सहआरोपी करता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
- आश्चर्यकारक निर्णय
न्यायालयाचा हा निर्णय अत्यंत आश्चर्यकारक आहे. मात्र, हा निकाल सर्वस्वी बरोबर आहे, असे आताच ठरवू नये. माझ्याकडे या खटल्याबाबत अधिक सबळ पुरावे असून त्या पुराव्यांच्या आधारे मी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. त्याचबरोबर विशेष न्यायालयाच्या या निर्णयाला स्थगिती मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.सुब्रमण्यम स्वामी, जनता दल अध्यक्ष
- या निर्णयामुळे सरकारची प्रतिमा मात्र बदलत नाही
या निर्णयामुळे केंद्र सरकारची भ्रष्ट प्रतिमा बदलत नाही. त्याचबरोबर भ्रष्टाचारविरोधात भाजपने उघडलेल्या मोहिमेची तीव्रताही कमी होणार नाही. निर्णय चिदंबरम यांच्या बाजूने लागूनही चिदंबरम यांच्या राजकीय उत्तरदायीत्वाचा प्रश्न उरतोच. त्यामुळे चिदंबरम यांच्या राजकीय उत्तरदायीत्वाचा प्रश्न या पुढे आम्ही लावून धरणार आहोत. लोकांसमोर हा प्रश्न मांडणार असून त्यावर लोकच आपले उत्तर देतील.- रविशंकर प्रसाद, भाजप प्रवक्ते
- चिदंबरम प्रकरणावर पडदा टाकावा
टू-जी प्रकरणात भाजपने चिदंबरम यांची बदनामी केली. त्यांच्यावर नाही-नाही ते आरोप केले. मात्र, आता या प्रकरणावर पडदा टाकावा. भाजपने चिदंबरम यांच्याविरोधात चालवलेल्या बदनामकारक मोहिमेबाबत संपूर्ण देशाची माफी मागावी. टू-जी प्रकरणात सरकारचा हात नव्हता आणि त्याचबरोबर त्या संदर्भात कोणतीही लांछनास्पद अशी गोष्ट सरकारने केली नव्हती. त्यामुळे नैतिक जबाबदारी घेण्याचा प्रश्नच येत नाही.- मनीष तिवारी, काँग्रेस प्रवक्ते
- सरकारच्या सामूहिक कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
चिदंबरम यांना विशेष न्यायालयाने जरी दिलासा दिला असला तरी या आधी सर्वोच्च न्यायालयाने टू-जीप्रकरणी सरकारने दिलेले 122 परवाने रद्द केले आहेत. परवाने रद्द करण्याच्या निर्णयामुळे सरकारच्या सामूहिक कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, हे नाकारता येणार नाही. त्यामुळे या पुढे चिदंबरम यांच्या नैतिक जबाबदारीबाबतही प्रश्न उपस्थित राहू शकतात.- डी. राजा, माकप, सरचिटणीस





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा