नाट्यसंमेलनाची मुहुर्तमेढ

सांगली : मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे यांनी 1843 साली सांगलीच्या राजवाडय़ात पहिले नाटक सादर केले. आजच्यासारखे ते परिपूर्ण नसून पौराणिक घटनांवर आधारीत आख्यान होते. रामायणातील ‘सीता-स्वयंवर’ आख्यानाचा तो प्रयोग होता. सांगलीचे राजे पटवर्धन यांच्या प्रोत्साहनाने त्यानंतर गावोगावी नाटक करण्यास सुरुवात केली. जनतेचाही चांगला प्रतिसाद मिळत असे. भावे यांच्यापासून प्रेरणा घेऊन राज्यभर अनेक नाटक मंडळे स्थापन झाली. अण्णासाहेब किर्लोस्करांनी 1880 साली ‘शाकुंतल’ नाटकाचा प्रयोग करून मराठी रंगभूमीवर संगीत नाटकांचे युग अवतरले. त्यानंतर संगीत नाटकांची व नाटक मंडळीची छाप महाराष्ट्रात आली. किर्लोस्करांचे संगीत सौभद्र, शाकुंतल या नाटकांनी रंगभूमीवर इतिहास निर्माण केला. त्यानंतर भाऊराव कोल्हटकर, गणपतराव बोडस, नानासाहेब जोगळेकर, मास्टर आविनाश, दीनानाथ मंगेशकर, केशवराव भोसले असे नावाजलेले गायक, नट मराठी रंगभूमीवर अवतरले. मिरजेच्या रंगभूमीवर 1905 साली बालगंर्धवांनी अभिनयाचे पहिले पाऊल टाकले आणि रंगभूमीवर गंधर्व युगाची सुरुवात झाली. आपल्या गायन व अभिनयाने बालगंधर्वानी मराठी रंगभूमीला वैभवशाली सुवर्णकाळ दाखवला. गायक अभिनेत्यांबरोबरच रंगभूमीवर प्रतिभासंपन्न नाटककारांचे योगदानही मोलाचे आहे. नाटय़ाचार्य गोविंद बल्लाळ देवल, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, वासुदेव शास्त्री खरे, अच्युत बळवंत कोल्हटकर, राम गणेश गडकरी यांनी अनेक चिरस्मरणीय नाटय़कृती निर्माण केल्या.

नाटय़ाचार्य देवल यांना सांगली जवळील हरिपूर गावी पिंपळाच्या पारावर बसले असताना शारदा नाटकाचे कथानक गवसले. जरठ - कुमारी विवाह हा विषय घेऊन देवलांनी हे सामाजिक नाटक लिहून रंगभूमीवर सामाजिक क्रांती घडवून आणली. या नाटकातील शारदेची पहिली भूमिका सांगलीजवळीक बेडग या खेडेगावातील रामा डवरी या अशिक्षित मुलाने साकारली होती. सांगलीचे सुपुत्र कृ.प्र. खाडिलकर यांनी आपल्या कीचकवध सारख्या नाटकातून जनतेला क्रांतीचा संदेश दिला होता. मिरजेचा वासुदेव शास्त्री खरे यांनी ‘शिवसंभव’ हे ऐतिहासिक नाटक लिहिले. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा प्रारंभ खरे शास्त्री यांच्या ‘शिवसंभव’ या नाटकाच्या प्रयोगाने झाला आहे. नाटय़कलेचा विस्तार जसा होऊ लागला तसा नाटक मंडळींसमोर फार अडचणी प्रश्न उभे राहिले. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी नाटक मंडळीचे संमेलन भरवावे अशी कल्पना अनंत वामन बर्वे यांनी सुचवली. त्यांच्या प्रेरणेतूनच 28 ऑगस्ट 1905 साली मुंबईत ‘‘मराठी नाटक मंडळींचे संमेलन’’ झाले. ते पहिले नाटय़संमेलन. गणेश श्रीकृष्ण तथा दादासाहेब खापर्डे संमेलनाध्यक्ष होते. राजापूरकर नाटक मंडळींनी संमेलनाचे यजमानपद भूषवले होते. त्यावेळी किर्लोस्कर, नाटय़कला प्रवर्तक मंडळी, महालक्ष्मी प्रासादिक मंडळी, पाटणकर नाटक मंडळ आदी सहभागी झाले होते. दुसरे संमेलन साहित्यसम्राट न. चि. केळकर यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे झाले होते. त्यानंतर संमेलनाचा प्रघात सुरू झाला.

विकास सावंत

सध्या सांगलीमध्ये चाललेल्या 92व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीकांत मोघे यांचे अध्यक्षीय भाषण...