रस्ते थोडे; वाहनं अपार!
मुंबापुरीत सुमारे दीड कोटी लोक राहतात. जेमतेम ४६८ चौरस किलोमीटरच्या परिसरावरच एवढ्या प्रचंड लोकसंख्येचा बोजा पडला आहे. जमिनीचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्येचे प्रमाण यांचे गुणोत्तर व्यस्त असल्याने पायाभूत सुविधांचा बोजवारा उडालेला आहे.
मुंबापुरीत सुमारे दीड कोटी लोक राहतात. जेमतेम ४६८ चौरस किलोमीटरच्या परिसरावरच एवढ्या प्रचंड लोकसंख्येचा बोजा पडला आहे. जमिनीचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्येचे प्रमाण यांचे गुणोत्तर व्यस्त असल्याने पायाभूत सुविधांचा बोजवारा उडालेला आहे. रस्ते वाहतूकही त्याला अपवाद नाही. या शहरातील रस्त्यांवर दर महिन्याला सुमारे नऊ हजार गाडय़ा धूर ओकीत दाखल होतात. सत्तर टक्के मुंबईकर जनता उपनगरी रेल्वे आणि ‘बेस्ट’च्या बसगाड्यांवर अवलंबून आहे. देशातील इतर शहरांच्या तुलनेत इथल्या लोकल आणि बसगाड्यांची वारंवारिता जास्त आहे, हे खरे असले तरी या कौतुकापाठीमागे मुंबईकरांची अगतिकता आणि अपरिहार्यताच जास्त असल्याचे जाणवते. कारण हा प्रवास कमीत कमी तापदायक असावा, अशीच प्रार्थना सर्वसामान्य मुंबईकर करीत असतो.
उपनगरी वाहतुकीची अशी अवस्था असली, तरी कमी खर्च आणि वाचणारा वेळ यामुळे हा भयंकर त्रासदायक प्रवासही ते सहनशीलतेने करतात. रेल्वेतून पडून होणारे अपघात ही नित्याची बाब आहे. पण रस्त्यांवरुन प्रवास करतानाही जिवाची जोखीम सध्या कितीतरी वाढलेली आहे. वाहनांची वाढती संख्या हे त्यामागील प्रमुख कारण आहे. सत्तरच्या दशकात सुमारे तीन लाख वाहने मुंबईतील रस्त्यांवरुन ये-जा करीत. शहर वाढले, वाहने वाढली, पण रस्त्यांचा आकार काही त्याप्रमाणात वाढू शकला नाही. २००५मध्ये वाहनांचे प्रमाण एक कोटीच्या जवळ जाऊन पोहोचले. दोनच वर्षामध्ये या संख्येत सुमारे बावीस लाखांनी वाढ झाली. सध्या शहराची लोकसंख्या १.८ टक्क्यांनी वाढत असताना चारचाकी आणि दुचाकी वाहने मात्र अनुक्रमे ५.५ आणि १८ टक्के इतक्या प्रचंड वेगाने वाढत आहेत. एका स्वयंसेवी संस्थेच्या अभ्यासानुसार, पेडर रोड, मलबार हिलसारख्या उच्चभ्रू भागामध्ये प्रत्येक कुटुंबामागे किमान दोन चारचाकी आहेत. मुंबईच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ नऊ टक्के जनता चारचाकींचा वापर करते. मात्र रस्त्यांचा बहुतांशी भाग याच नऊ टक्के वाल्यांनी व्यापलेला असतो. मुंबईत दिवसागणीक होणाऱ्या अपघातांना वाहनचालकांच्या निष्काळजीपणाबरोबरच वाहनांची तुडुंब गर्दीदेखील तितकीच जबाबदार आहे.
एकूणच प्रवासाचे अग्निदिव्य सुसह्य व्हावे आणि प्रदूषणाची पातळी कमी व्हावी, यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्याचा आग्रह धरीत आहेत. पण सध्याची परिस्थिती पाहता, ‘बेस्ट’सारख्या कार्यक्षम उपक्रमाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे आणि रेल्वेला फे-यांची संख्या वाढवण्यात बऱ्याच अडचणी भेडसावत आहेत. मुंबई महानगर परिवहन प्रकल्पाचा दुसरा आणि तिसरा टप्पा पूर्णपणे कार्यान्वित होण्यास आणखी किमान दहा वर्षे लागतील, अशी परिस्थिती आहे. मेट्रो रेल्वेचे काम म्हणावे तितक्या अपेक्षित गतीने होत नाही. त्यामुळे सध्याच्या वाहतुकीच्या दैन्यावस्थेवर तोडगा काढणे संबंधित व्यवस्थापनांच्याच हाती आहे. खाजगी वाहनांच्या वाढत्या संख्येला लगाम घालण्याकरिता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा हाच रामबाण उपाय आहे.



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा