PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: तोंडातलं पाणी पळतंय का? तोंडातलं पाणी पळतंय का? ================================================================================ राजेश दाभोळकर on 08 December, 2009 03:30:00 PM हल्ली सगळाच गोंधळ उडालेला दिसतोय. कुणाला कधी पाणी पाजलं जाईल, याचा काही नेम नाही. टाटाने घराघरात शुद्ध पाणी पोहोचवण्याचा विडा उचलला आहे. तर म्हाडाच्या नव्या सोडतीत घरांना पाणी मिळेलच, असा दावा म्हाडा अध्यक्षांनी केलाय खरा, पण तोपर्यंत त्या घरात विसावणा-या जीवांना पाणी कुठून चोरायचं हा प्रश्न सतावणार आहे. खरं तर मुंबई, उपनगरांमध्ये आठवडय़ात एक दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतल्याने मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अर्थात मुंबईकरांच्या नशिबी हे आजच होतंय असं नाहीय. त्यांना अ‍ॅडजेस्ट करायची जणू सवय लागली आहे. लोकलच्या प्रवासात फोर्थ सीटवर बसणा-या मुंबईकराला जागेची टंचाई काय असते, हे चांगलं ठावूक असतं. त्यामुळेच येथे येणारा प्रत्येक माणूस मुंबईकराचा यथेच्छ फायदा उठवतो. झोपडपट्टीवाल्यांना वीज-पाणी पुरवतो कोण? त्यांच्याकडून महसूल (?) गोळा करतंय कोण? याची अनेक वेळा उघड चर्चा होऊनही मूळ प्रश्नांना बगल देण्याचे राजकीय डावपेच सक्सेस झालेयत. सध्या हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे. तिथेही पाण्याला आग लावणारी राजकीय नेतेमंडळी बाह्या सरसावून बसली आहेत. त्यांच्या टेबलावर बिसलेरीच्या बाटल्या ठाण मांडून बसलेल्या असतात. त्यातला एकेक घोट रिचवत ते पाणी प्रश्न विधानसभेत मांडणारच. सत्ताधारी पक्षापेक्षा नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे काय काय प्रश्न पेटवतात, याकडे तमाम जनतेचं लक्ष लागलं आहे. तशी जनता आभाळाकडे दररोज पाहत असते. कारण हवामानाचा अंदाज वेधशाळेने कितीही वर्तवला तरी त्यातही फिक्सिंग होत असल्याचं आपण अनुभवलं आहे. तर म्हणायचं असं आहे की, पाणी.. पाणी करणारे आपण पाण्याबद्दल किती गांभीर्याने विचार करतो आहोत? सगळेच राजकीय नेते आश्वासन देऊन तोंडाला पाने पुसतात. पण म्हणून काय आपण आपलं तोंड रुमालाने पुसायचं नाही का? पाण्याच्या गोष्टीची सुरुवात झालीय खरी, तुम्ही मात्र उत्तम आरोग्यासाठी पाणी भरपूर प्या.. काय?