PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: ‘गि-हाईक’ नव्हे ‘ग्राहक’ ‘गि-हाईक’ नव्हे ‘ग्राहक’ ================================================================================ वसुंधरा देवधर on 15 February, 2010 10:45:00 AM आज व्हॅलेंटाइन डे आजच्या मुहूर्तावर पिवळ्या धम्मक गुलाब पुष्पांचा एक छानसा गुच्छ आपल्यासाठी आणला आहे. सर्वसामान्यपणे १४ फेब्रुवारी म्हटलं की हा ‘तरुणांचा दिवस’, आरक्त पुष्पांचा दिवस, प्रेमिकांचा दिवस असेच वाटते; पण तो ‘केवळ’ लाल गुलाबांचा दिवस नाही, तर शुभ्र पांढ-या, गुलाबी आणि पिवळ्या गुलाबांचासुद्धा आहे! यातला पिवळा गुलाब म्हणतो ‘आय केअर अँड शेअर’. मलासुद्धा असंच सांगायचंय. तमाम ग्राहक वर्गाविषयी काहीतरी वाटतं, त्यांच्यासाठी काही करावंसं वाटतं, त्यांना अधिक सजग आणि कृतिप्रवण होताना पाहावंसं वाटतं आणि म्हणून हा लेखन प्रपंच. ‘मुंबई ग्राहक पंचायती’बरोबर गेली अनेक वर्षे स्वयंसेवी वृत्तीने काम करताना आलेले अनुभव, गोळा केलेली माहिती, गिरवलेले धडे, सगळं तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे; कारण आपण सगळे ग्राहक ! आज जगाच्या पाठीवरची प्रत्येक व्यक्ती ग्राहक आहे. तिचा देश तिचा वेश, तिच्या निष्ठा, तिचे रूप कोणतेही असो कसेही असो, ‘जन्माला आला की ग्राहक झाला’, अशी मनुष्यप्राण्याची अवस्था आहे. पोटातलं ते इवलंसं रूपसुद्धा ‘ग्राहक’ ठरतं. त्यामुळेच प्रत्येकाची ही जबाबदारी ठरते, की आपण चांगला ग्राहक व्हायचं आणि स्वत:ला ‘गि-हाईक’ बनू नाही द्यायचं. आता ‘गि-हाईक’ बनवायला तर दुनिया तयारच आहे, पण आपल्याजवळ आपल्याला असणा-या ‘हक्कां’ची माहिती असेल, ‘कर्तव्याची जाणीव’ असेल आणि त्यानुसार निर्णय घेण्याची, ते अमलात आणण्याची क्षमता असेल, तर कोणाला शक्य होईल का तुम्हाला ‘गि-हाईक’ बनवणं? म्हणूनच आपण समजून घेऊ, कोणी कसा मार्ग काढला आणि न्याय मिळवला. तो काही केवळ न्यायालयात, म्हणजे ‘ग्राहक मंचा’तच मिळतो असं नाही. आता विविध सेवा जसे डॉक्टर, एल. आय.सी., टेलिफोन, रेल्वे, वीज इ. इ.साठी त्यांचे अंतर्गत तक्रार निवारण कक्ष आहेत. प्रत्येक उत्पादकाला ग्राहक तक्रारीची दखल घेण्याचे बंधन आहे. तक्रार कशी-कुठे करावी याचे मार्गदर्शन करण्यासाठी, मुंबई ग्राहक पंचायत, सी.जी.एस.आय., अखिल भारतीय ग्राहक पंचायत या आणि इतर अनेक ग्राहक हितैषी संस्था आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक ‘गि-हाईके’ आता सजग ग्राहक बनली आहेत. आपली तक्रार आपण सोडवू शकतो, आपले व आपल्या पैशांचे व आरोग्याचे रक्षण आपण स्वत: करू शकतो, इतकेच नव्हे तर इतरांनाही सांगू शकतो, असा विश्वास सर्वदूर निर्माण व्हायला हवा. त्यासाठी विविध घटना, अनुभवांची शिदोरी आपल्यासाठी येते आहे. जेणेकरून आपण सगळेच म्हणाल, ‘ग्राहक तितुका मेळवावा, ग्राहक धर्म वाढवावा’ त्यामध्ये क्लासच्या प्रवेशापासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत, विविध वस्तूंच्या तक्रारींपासून थेट विमानसेवेपर्यंत, बँकांपासून ते हॉस्पिटलपर्यंत अनेकानेक समस्यांची उकल कशी केली, त्यातून ग्राहक संरक्षण व हितरक्षण कसे झाले हे आपणास समजेल.