संधिकाली या अशा..
महापालिकेचे दरवाजे सर्वसामान्यांना संध्याकाळी पाच वाजले की बंद होतात. मात्र जेव्हा सर्वसामान्यांसाठी बंद होतात, त्याचवेळी धनदांडगे विकासक आणि वास्तूविशारदांसाठी खुले होतात. म
महापालिकेचे दरवाजे सर्वसामान्यांना संध्याकाळी पाच वाजले की बंद होतात. मात्र जेव्हा सर्वसामान्यांसाठी बंद होतात, त्याचवेळी धनदांडगे विकासक आणि वास्तूविशारदांसाठी खुले होतात. सर्वसामान्यांच्या कामासाठी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी घड्याळाकडे बोट दाखवत दुस-या दिवशी येण्याची भाषा करतात. मात्र मर्सिडीज कारमधून किंवा चकाचक गाड्यांमधून येणा-यांसाठी त्यांचा घडय़ाळाचा काटा पुढे सरकत नाही. विकास नियोजन व इमारत प्रस्ताव (डीपी व बीपी) विभागातली ही परिस्थिती आहे. महापालिका कार्यालय सकाळी साडेदहा ते साडेपाच वाजेपर्यंत उघडे ठेवणे बंधनकारक आहे. या कालावधीतच अधिका-यांनी जनतेच्या समस्यांचे निवारण करून त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. या ठरवलेल्या कालावधीत कार्यालय तर उघडे असते, पण तक्रारी तसेच समस्या मांडण्यासाठी येणा-या लोकांना अधिकारी जागेवर भेटत नाहीत.
महापालिका मुख्यालय, भायखळ्यातील ‘ई’ महापालिका कार्यालय, वांद्रे, कांदिवली तसेच घाटकोपर येथील बीपी व डीपीच्या कार्यालयांमध्ये संध्याकाळी सहानंतर विकासक तसेच वास्तूविशारदांची वर्दळ सुरू होते. इमारतींच्या बांधकामासाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी),सीसी, तसेच ओसी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ही मंडळी येतात असे सर्वसाधारणपणे बोलले जाते. पण त्यांना संध्याकाळी तोंड लपवून येण्याची गरज काय? ही कामे दिवसा का करून घेता येत नाहीत ? मुळातच इमारतीच्या बांधकामाची मंजूरी घेताना नियमाप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता केली जात नाही. त्यामुळे काही काम बेकायदेशीर करण्यासाठी तसेच अधिकाऱ्यांना विश्वासात घेण्यासाठी जाणीवपूर्वक ही बडी धेंडे संध्याकाळची वेळ निवडतात. कागदपत्रे नसली तर त्यावर ठेवलेल्या वजनापुढे त्रुटीचांही अधिकाऱ्यांना विसर पडतो. मुळातच बांधकामासाठी लागणाऱ्या मंजुरीची कामे महापालिकेच्या कार्यालयीन वेळेत पूर्ण करणे अपेक्षित आहे. इमारत बांधकामाच्या फाईल्सवर स्वाक्षरी घेण्यासाठी स्वत: विकासक किंवा वास्तूविशारदांना कार्यालयात येण्याची गरज काय? फाईल्समध्ये काही त्रुटी असल्यास या खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांनी शेरा मारून हाताखालच्या अभियंत्याकडून त्याची पूर्तता करायला भाग पाडायला हवे. परंतु या लक्ष्मीपुत्रांसाठी सारे माफ. या कार्यकारी अभियंता किंवा उपकार्यकारी अभियंत्याला भेटायचे झाल्यास सर्वसामान्यांना तासन तास प्रतीक्षा करावी लागते.
लक्ष्मीपुत्रांना आणि त्यांच्या सेवेकऱ्यांना दालनात थेट प्रवेश. कार्यालयीन वेळ संपल्यावर साहेब थांबतात म्हणून हाताखालचे अधिकारी, कर्मचारी, लिपिक, शिपाई सगळा लवाजमा थांबतो. पुन्हा थांबून थांबतात ते वरच्या कमाईसाठी आणि वर महापालिकेकडून ओव्हरटाईम घेतात. अशीच कार्यतत्परता सामान्य माणसांच्याबाबतीत दाखवल्यास त्यांच्या असल्या धंद्यांबाबत कुणी तक्रारही करणार नाही. या अतिरिक्त सेवेसाठी सुरक्षा रक्षकही तैनात असतात. उद्या अशाच गाडीमधून येवून कोणी सुरक्षा रक्षकाच्या हातावर दक्षिणा ठेवून महापालिकेत प्रवेश मिळवून घातपात घडवला तर फार आश्चर्य वाटायला नको. एवढे महापालिकेचे सुरक्षा रक्षक सहानंतर येणाऱ्या सुटाबुटातल्या व्यक्तिंवर भाळतात.
महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर यांच्याकडे असणाऱ्या बैठका नाहीतर न्यायालयीन सुनावणीला उपस्थित राहण्यात वेळ जात असल्याने काम करायला वेळच मिळत नाही, त्यामुळे उशिरापर्यंत बसायला लागते, असा सूर अधिकारी आळवतात. बांधकाम व्यवसायिकही, दिवसा अधिकारी जागेवर नसतात म्हणून बाहेरची कामे आटोपून संध्याकाळी निवांत महापालिकेत येतो, असे बोलतील. दोघांचेही म्हणणे रास्त आहे. पण सायंकाळी सहानंतर फक्त धनदांडग्यांची कामे होतात, त्यातला काही वेळ सर्वसामान्यांसाठी सत्कारणी लावला तर कुणाचीच तक्रारच उरणार नाही.



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा