PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: सक्षम ग्राहक व्हायचे सक्षम ग्राहक व्हायचे ================================================================================ वसुंधरा देवधर on 07 March, 2010 09:10:00 AM उद्या ‘जागतिक महिला दिन’. अशा प्रकारे वर्षभरात आपणास विविध ‘दिन’ साजरे होताना दिसतात. त्यावेळी मनात येते की, कशासाठी आणि काय कारणाने सुरू झाला असेल हा विशिष्ट ‘दिन’? महिला दिनाविषयी आपणास माहीतच आहे की, त्याचा हेतू जगभरात, विविध संस्कृतींमधील महिलांचे सक्षमीकरण करणे असा आहे. भारतात आज विविध क्षेत्रांमध्ये महिला वर्ग कर्तृत्व सिद्ध करीत आहे. जिथे महिलांना खास आरक्षित पदे आहेत, तिथे ही संधी मिळताच महिला अतिशय कष्टाने, सेवाभावाने आपली कर्तव्ये पूर्ण करीत आहेत. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार तक्रार निवारणार्थ जिल्हामंच, राज्य आयोग व राष्ट्रीय आयोग यांचे गठन करण्यात येते. इथे तक्रारदार ग्राहक आपल्या समस्येचे निवारण करून घेऊ शकतो. या तीनही स्तरांवर जे मंचसदस्य व आयोग सदस्य नेमावायचे, त्यामध्ये एक ‘महिला सदस्य’ असली पाहिजे, असे बंधन आहे. त्यासाठी महिलेची किमान पात्रता निर्धारित करण्यात आली आहे. आज देशभरात जिल्हापातळीपासून थेट दिल्लीपर्यंत अनेक महिला ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्याचे हे काम करीत आहेत. मात्र, हे लक्षात घ्यायला हवे की, या सरकारी यंत्रणेकडे जाण्यापूर्वी आपली अडचण आपणच निवारण्याचे प्रयत्न करणेही अत्यंत आवश्यक आहे. त्या कामातही अर्थात महिला मागे नाहीत. हा अनुभव मुंबई ग्राहक पंचयातीच्या तक्रार मार्गदर्शन केंद्रातील स्वयंसेवी कार्यकर्त्यांना नेहमीच येतो. योग्य पद्धतीने हाताळलेली समस्या ग्राहक व संस्था पातळीवर सुटल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यापैकीच एक असे - भावाचे लग्न ठरले आणि बहिणाबाई फारच खुषीत आल्या. लग्नात काय-काय करायचे याबरोबरच कसे-कसे मिरवायचे, याचेही बेत सुरू झाले. आजच्या काळात खास जवळची अशी कार्य अगदी नेमकीच होतात. त्यामुळे भावाकडून छानशी साडी मिळणार असली, तरी बहिणाबाईंनी हे निमित्त साधून आणखी बरीच खरेदी स्वत:सकट पती व मुलांसाठीसुद्धा केली. यामध्ये अर्थात खास होती ती सुप्रसिद्ध दुकानातून खरेदी केलेली १३ हजार रुपयांची साडी. दुकान नावाजलेले असल्याने अर्थात रीतसर पावतीही तिला मिळाली. ती तिने नीट जपून ठेवली. लग्नाचा स्वागतसमारंभ झाला एका मोठ्या लॉजवर. रोषणाई व सजावटीने खुलणा-या त्या वातावरणात करवलीची १३ हजाराची साडी सगळ्यांच्या कौतुकाचा विषय ठरली. दिवस अर्थात चैत्र वैशाखाचे आणि मुंबईकरांसाठी घाम येणे काही नवीन नाही. बरीच लग्न ही अशी घामाघूम करणारीच (वाच्यार्थाने) असतात, नाही का?पण झालं असं की, घामामुळे त्या साडीचा रंग उतरला आणि करवलीच्या पाठीवर, घामाचे रंगीत ठिपके, कधी रंगीत ओघळ उतरू लागले. वाऽट लागली. लग्नाचं सूप वाजताच ती दुकानात धावली. दुकानाने शांतपणे व ठामपणे तक्रार नकारली आणि साडी परत घेण्यास नकार दिला. मग मुंबई ग्राहक पंचायतीकडे येऊन तिने मार्गदर्शन घेतले. दुकानाला पत्र दिले. त्यावर दुकानदाराने फोन करून तिला बोलावले; कारण पत्र कुरियने आले, महिलेकडे पुरावा तयार झाला. दुकानात गेल्यावर तिने ही कोणताही आरडा-ओरडा न करता साडी परत घ्या व पैसे द्या, असा ठाम आग्रह धरला. कारण आता तिला माहीत होते की, ‘सदोष वस्तू’ म्हणजे काय ते. दुकानदाराने दुस-या साडय़ा घेण्याची केलेली विनंती तिने साफ धुडकावून लावली. ‘माझा आता तुमच्याकडील साडय़ांवर मुळीच विश्वास नाही. मी परत फसणार नाही. मला पैसेच हवेत.’ हा आग्रह तिने धरला. तिचा निग्रह आणि तिला असलेले मुंबई ग्राहक पंचायतीसारख्या २५००० पेक्षा अधिक सदस्य संख्यावाल्या संस्थेचे पाठबळ जाणून दुकानदार नमला. सगळे पैसे परत घेऊनच दुनाकातून ती निघाली. त्यानंतर संस्थेचे आभार मानायलाही विसरली नाही. ‘अशी सक्षम ग्राहक व्हायचे’ आपण नक्कीच ठरवायला हवे, नाही का?