PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: खोल खोल पाणी.. खोल खोल पाणी.. ================================================================================ सचिन धानजी on 02 May, 2010 08:50:00 AM मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, तुळसी, विहार व भातसा या सहा तलावांमधून पाण्याचा पुरवठा होतो. आज या सहापैकी केवळ दोनच तलावांमधून पाण्याचा पुरवठा केला जातो, ही वस्तुस्थिती आहे. अप्पर वैतरणा आणि विहार तलावांनी किमान पातळी गाठली आहे तर तानसा व तुळसी तलावांमध्ये पाण्याचा साठा असला तरी प्रशासनाने भविष्यातील गरज ओळखून त्यातील पाणी पुरवठा तूर्तास बंद केला आहे. त्यामुळे सध्या खरी मदार आहे ती मोडक सागर व भातसा तलावांवर. मुंबईत पाणी टंचाईची झळ आता मोठ्याप्रमाणात जाणवू लागणार आहे. उन्हाचा पारा वाढल्याने पाण्याची मागणीही वाढू लागली आहे. मात्र मुंबईला पाणी पुरवठा करणा-या तलावांची पातळी दिवसेंदिवसे घटत चालली आहे. त्यातच पाण्याची वाढती मागणी ही चिंतेची बाब आहे. तरीही मुंबई महापालिकेने येत्या 15 जुलैपर्यंत मुंबईकरांना कशाप्रकारे पुरेसा पाणी पुरवठा होईल याचे नियोजन केले आहे. त्यामुळे 15 जुलैपर्यत मुंबईकरांना चिंता करण्याची गरज नाही,असा दिलासा जरी दिला असला तरी पुढे काय ? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. ना प्रशासनाकडे याचे उत्तर आहे ना सत्ताधा-यांकडे. जुलै महिन्यात पावसाचा जोर असतोच, हे जरी आपण मान्य केले, तरी मागील वर्षाचा अनुभव पाहता, पावसाने दडी मारली तर मुंबईकरांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार आहे, या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. त्यामुळे मुंबईकरांनो तलाव ओसंडून वाहीपर्यत पाण्याचा प्रत्येक थेंब न थेंब जपून वापरण्याचा प्रयत्न करायला हवा. मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, तुळसी, विहार व भातसा या सहा तलावांमधून पाण्याचा पुरवठा होतो, आज या सहापैकी केवळ दोनच तलावांमधून पाण्याचा पुरवठा केला जातो, ही वस्तुस्थिती आहे. अप्पर वैतरणा आणि विहार तलावांनी किमान पातळी गाठली आहे तर तानसा व तुळसी तलावांमध्ये पाण्याचा साठा असला तरी प्रशासनाने भविष्यातील गरज ओळखून त्यातील पाणी पुरवठा तूर्तास बंद केला आहे. त्यामुळे सध्या खरी मदार आहे ती मोडक सागर व भातसा तलावांवर. दोनच दिवसांपूर्वी महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यांनी तलावातील पाण्याची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी पाहणी दौरा केला. यावेळी तलावामधील पाणी आटलेले दिसून आले. मोडकसागर, तानसा तलावाचे काठ दिसू लागले आहेत. ही स्थिती भयावह आहे. मुंबईकरांना किती दिवस पाणी पुरवठा करता येईल याची गणिते महापालिकेचे अधिकारी मांडू लागले असले तरी त्यांची आकडेमोड किती खरी ठरते,हाही प्रश्न आहे. आज तलावांमध्ये पाणी दिसत असले तरी किमान पातळीपेक्षा खाली असणारे पाणी हे महापालिकेला घेता येत नाही. राज्य सरकारने या राखीव कोट्यातूनच पाणी उचलण्यास परवानगी दिल्याने महापालिकेला 15 जुलैपर्यंत ताणता येवू शकते. एरव्ही पाणी येत नाही म्हणून प्रशासनातील अधिका-यांना धारेवर धरणा-या नगरसेवकांना या अभ्यास दौ-यात सहभागी होण्याची इच्छा झाली नाही. ज्या स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी हा दौरा आयोजित केला, त्यामध्ये त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकांनी उपस्थिती लावून पाणी समस्या जाणून घेण्याचे मोठेपण दाखवता आले नाही, यापेक्षा दुर्दैव ते काय? ही काही सहल नव्हती. नेहमी महापालिका प्रशासन पत्रकारांना पावसाळ्यात सर्व तलाव भरुन वाहू लागल्यानंतर त्याठिकाणी घेऊन जातात. परंतु यावेळी प्रथमच महापालिकेने विशेषत: स्थायी समिती अध्यक्षांनी तलावांची स्थिती सर्व नगरसेवकांना ज्ञात व्हावी या हेतूने हा दौरा आयोजित केला होता. जर या नगरसेवकांची तलावांतील पाण्याची तसेच वितरण व्यवस्थेची माहिती जाणून घेण्याची इच्छा नसेल तर त्यांना मुंबईतील पाणी समस्येवर बोलण्याचा अधिकार काय? विभागात पाणी आले नाही,तर जशी चिंता वाटते, तशीच चिंता हे पाणी देण्यासाठी दिवसरात्र एक करणा-या कर्मचारी-अधिका-यांबाबत दाखवल्यास त्यांचे मनोबल वाढेल. नेहमीच शिव्याशाप देण्यापेक्षा कधीतर कौतुकाची साधी थाप जरी जलखात्याच्या कर्मचा-यांच्या पाठीवर मारल्यास त्यांचा उत्साह अधिकच वाढेल. मुंबईत येत्या काही दिवसांमध्ये पाणी टंचाईची भीषण समस्या उद्भवणार यात वादच नाही. लोकांच्या नळाला पाणी येईल का याची शाश्वती नाही. शेवटाला वसलेल्या चाळी, इमारतींमध्ये तरी टंचाई नक्कीच जाणवेल. त्यामुळे येणारा काळ हा महापालिका आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, अतिरिक्त आयुक्त अनिल डिग्गीकर व जलखात्याचा कसोटीचा काळ असेल. आज पावसामुळे निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या परिस्थितीचा सामना करताना विहीर व कूपनलिका यांच्याव्यतिरिक्त पाण्याचे अधिक स्त्रोत महापालिकेकडे उपलब्ध नाहीत. मात्र भविष्यातील उपाययोजना म्हणून स्त्रोत वाढवण्याचा प्रयत्न जरुर करायला हवा. आज तानसा तलावामध्ये 10 टक्के गाळ असल्याचा अहवाल ‘मिरी’ या संस्थेने दिला आहे. मात्र हा संपूर्ण गाळ काढणे शक्य नाही. या संस्थेने काय अहवाल दिला यापेक्षा जे दिसते अणि ते सहज करता येण्यासारखे आहे, त्यासाठी कुणाच्या अहवालाची गरज नाही. तलाव क्षेत्रात जे दगडांचे उंचवटे तयार झाले, ते काढून तलाव क्षेत्राची खोली वाढवता येणे सहज शक्य आहे. पाणी आटल्याने या टेकडय़ांचे दर्शन घडते. आजवर या टेकडय़ा हटवण्याचा विचारही कधी महापालिकेने केला नाही. सध्या निर्माण झालेलय पाणी टंचाईमुळे जास्तीत जास्त पाणी कसे जमवता येईल याचा विचार प्रशासन करत आहे. तानसातील या टेकड्या तलावातील पाणी आटल्याने आता सहज काढता येवू शकतात, ज्या पावसाळ्यात तलाव भरल्यानंतर काढणे अवघड होणार आहे. या टेकडय़ा हटवून तानसातून होणा-या पुरवठ्याच्या 35 दिवसांचा साठा वाढत असेल तर यासाठी खर्च करण्यास काही हरकत नाही. त्यामुळे कायमस्वरुपी पाण्याचा साठा वाढेल. नाहीतरी विहीर व कुपनलिकांसाठी 45 कोटी रुपये खर्च करुन आपण काय साधले याचे चित्र दिसतेच आहे. दहिसर वगळता कुठल्याही भागात विहिरींमधील पाण्याचा वापर होताना दिसत नाही. तिथे तलावातील खोली वाढवण्याचा प्रयत्न झाल्यास तो नक्कीच फायदेशीर ठरणारा असेल.