पहिले पान | प्रहार ब्लॉग | महापौर मुंबईच्या की शिवसेनेच्या?

महापौर मुंबईच्या की शिवसेनेच्या?

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

महापौर श्रद्धा जाधव यांनी एका साध्या प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो प्रकार केला तो लाजिरवाणाच होता. मुंबईच्या प्रथम नागरिक जर स्वत:च्या पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी हातचलाखी आणि हातसफाईचा करिष्मा करत असतील तर मुंबईतील जनतेने कोणाचे अवलोकन करावे? मुंबईच्या महापौरपदी विराजमान झालेल्या पूर्वीच्या महापौरांवर नजर टाकली तर त्यांनी पक्षापेक्षा मुंबईचे हित लक्षात घेऊनच काम केले आहे. श्रद्धा जाधव यांच्यात ही परिपक्वता केव्हा येईल, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे..

मुंबई महापालिकेच्या प्रथा, परंपरा आणि नियमांना बगल देत महापालिकेचा गाडा सत्ताधारी शिवसेना-भाजप युती हाकत आहे. महापौरपद हे जबाबदारीचे आहे. त्यावर विराजमान झाल्यानंतर आपण कोणत्या एका पक्षाचे आहोत हे बाजूला ठेवत आपण या संपूर्ण मुंबईचे आहोत अशी भावना असायला हवी. परंतु मुंबईच्या महापौर श्रद्धा जाधव यांनी एका साध्या प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो प्रकार केला तो पाहून मुंबईकरांनाच शरम वाटली असेल. मुंबईच्या प्रथम नागरिक जर स्वत:च्या पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी हातचलाखी आणि हातसफाईचा करिष्मा करत असतील तर मुंबईतील जनतेने कोणाचे अवलोकन करावे? तब्बल चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या या महापौरांनी असे वर्तन करून शिवसेनेच्या खऱ्या कार्यकर्त्यांचे दर्शन घडवले! 

महापौर श्रद्धा जाधव यांनी महापालिकेची सूत्रे हाती घेतल्यापासून त्यांचे जे काही वर्तन सुरू आहे, ते पाहता त्या मुंबईच्या महापौर आहेत की शिवसेनेच्या असा प्रश्न निर्माण होतो. महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्या पक्षाने त्यांना महापौरपदावर बसवले, हे जरी मान्य असले तरी त्या पक्षासाठीच महापालिकेचा कारभार चालवायचा असा कोणताही नियम नाही. महापौरांचा पक्षनिष्ठा दाखवण्याचा हा प्रयत्न आहे.

एफ-उत्तर व एफ-दक्षिण या प्रभाग समिती निवडणुकीत घडलेला प्रकार हा याच पक्षनिष्ठेतूनच झाला असावा. या प्रभाग समितीमध्ये शिवसेना-भाजप युतीचे तसेच विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची मते समसमान झाल्याने विजयी उमेदवार घोषित करण्यासाठी चिठ्ठी टाकण्याचा निर्णय घेतला. या चिठ्ठय़ा महापौरांनी टाकल्यामुळे काँग्रेसच्या नगरसेविका प्रेसिला कदम यांनी त्यांना हरकत घेतली. या चिठ्ठय़ा महापौरांनी पेटीत टाकल्यामुळे त्यांनी त्या शिवसेनेतील कोणा अन्य नगरसेवकांनी काढाव्यात अशी मागणी केली. या चिठ्ठी काढण्यावरूनच ४० मिनिटे गदारोळ सुरू होतो. मात्र महापौरांची दादागिरी ती किती? दुस-या नगरसेवकांनी चिठ्ठी काढावी असा कोणताही नियम नाही, असे सांगत महापौरांनी त्यातून चिठ्ठी काढली. या चिठ्ठीतील नावाची घोषणा सुरू असताना प्रेसिला कदम यांनी महापौरांनी जो काही गैरप्रकार केला तो उघडकीस आणला, एवढेच नव्हे तर दुसरी चिठ्ठी दाखवून एका चिठ्ठीचा कोपरा कसा दुमडला हे दाखवून दिले. ही लबाडी शिवसेनेच्या नगरसेविका म्हणून केली की महापौर म्हणून केली याचा खुलासा श्रद्धा जाधव यांनी करायला हवा. महापौर म्हणून जर त्यांनी हे कृत्य केले असेल तर त्यांनी मुंबईकरांशी अप्रामाणिकपणा दाखवला आहे, हे मान्य करायला हवे. जर त्या अजूनही नगरसेविका म्हणूनच शिवसेनेशीच एकनिष्ठता जोपासण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना महापौरपदावर बसण्याचा अधिकार नाही, असे सर्वाचेच मत असेल.

पदभार स्वीकारल्यापासून मागील सहा महिन्यांत महापौर म्हणून कोणते ठोस निर्णय घेतले, हे सांगण्यासाठी त्यांना मेंदूला ताण द्यावा लागणार आहे. शिवाजी पार्कच्या प्रवेशद्वाराजवळ शिवराज्यभिषेकाचे भित्तीचित्र लावण्यासाठी जो वाद झाला त्याला राजकीय वळण लागले हा भाग वेगळा. परंतु शिवाजीपार्कचे सुशोभीकरण हे मुंबईतील करदात्यांच्या पैशातून केले जात असताना त्यांनी या भित्तीचित्राचे बांधकाम फक्त शिवसेना स्वखर्चातून करत आहे, असा आव आणण्याचा प्रयत्न केला. महापौरांनी इथे सारी प्रतिष्ठा पणाला लावली. महापौरांना यावेळी हे काम महापालिकेचे असून सर्व पक्षाच्या गटनेत्यांना विश्वासात घेऊन करायला हवे, असे वाटले नाही. कारण महापौरांनी कधी मुंबईच्या महापौर म्हणून स्वत:ला मानले नाही. त्या स्वत:ला अजूनही शिवसेनेच्या महापौर मानत आहेत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे दालनही करदात्यांच्या पैशातून बांधले गेले, तरीही जणू शिवसेनेनेच बांधले असे वातावरण तयार केले जात आहे. मुंबईच्या महापौरपदी विराजमान झालेल्या पूर्वीच्या महापौरांवर नजर टाकली तर त्यांनी पक्षापेक्षा मुंबईचे हित लक्षात घेऊनच काम केले आहे. मात्र श्रद्धा जाधव यांच्यात ही परिपक्वता केव्हा येईल असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

या महिन्यात महापालिकेच्या किमान चार तरी सर्वसाधारण सभा व्हायला हव्यात. परंतु त्याही पूर्ण करण्यात त्यांना स्वारस्य नाही. मुख्य म्हणजे सभागृहात अध्यक्ष म्हणून बसलेल्या श्रद्धा जाधव यांना प्रत्येक विषयांमध्ये आपल्याच पक्षाच्या नगरसेवकांनी बोलायला पाहिजे याकडे कल असतो. यासाठी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना कधी बोलण्याची संधी दिली जात नाही. शिवाजी पार्कच्या भित्तीचित्राच्या बांधकामावरील स्थगिती न्यायालयाने उठवली म्हणून आनंदाने पेढे वाढण्याची परवानगी महापौर म्हणून श्रद्धा जाधव यांनी सभागृहनेते सुनील प्रभू यांना दिली. मात्र याच मुद्दय़ावर काही माहिती मागवून बोलण्याचा प्रयत्न करणारे मनसेचे गटनेते मंगेश सांगळे यांना वारंवार विनंती करूनही बोलण्याची संधी दिली गेली नाही. त्यामुळे सभात्याग करून त्यांनी महापौरांच्या मनमानी कारभाराचा निषेध व्यक्त केला. सभागृहात कोणाला बोलू द्यायचे याचा अधिकार हा अध्यक्ष म्हणून महापौरांना असला तरी लोकांनी आपले प्रश्न मांडण्यासाठी ज्या नगरसेवकांना निवडून दिले त्यांनाच जर महापौर बोलू देत नसतील जनतेच्या प्रश्नांना न्याय कोण देणार?     

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0