पहिले पान | प्रहार ब्लॉग | हॉटेल पार्किंगमधील मोटार व्यवस्थापनाची जबाबदारी

हॉटेल पार्किंगमधील मोटार व्यवस्थापनाची जबाबदारी

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

बरेच जण जिथे व्हॅलेट पार्किंगची सोय असेल असे हॉटेल पसंत करतात. पण तिथूनही मोटार चक्क नाहीशी झाली, चोरीला गेली, तर?

सुट्टय़ांचे दिवस सुरू आहेत. जशी योजनाबद्ध प्रवास करणारी मंडळी असतात, त्याप्रमाणे आयत्या वेळी स्वत:चे वाहन काढून निघणारी मंडळीसुद्धा असतात. वीक-एंडसाठी किंवा अनेक वेळा अशा प्रकारे बेत करून मित्र, मैत्रिणी, कुटुंबीय बाहेर पडतात. अशा प्रवासात किंवा इतर वेळीसुद्धा आपणास खाण्या-पिण्यासाठी हॉटेलात जायचे असते, तेव्हा आपले वाहन सुरक्षितपणे पार्क केलेले असले, म्हणजे हॉटेलातल्या जेवण्याखाण्याचा आस्वादही निश्चितपणे घेता येतो. त्यामुळे बरेच जण जिथे व्हॅलेट पार्किंगची सोय असेल असे हॉटेल पसंत करतात. पण तिथूनही मोटार चक्क नाहीशी झाली, चोरीला गेली, तर? अतुल वीरमणींचे असेच झाले.

अतुल डेहराडूनहून दिल्लीला आले त्यांच्या मारुती जिप्सीतून. तारीख होती १८ सप्टेंबर १९९६. दोन लाख शहाऐंशी हजार रुपये किमतीच्या त्या मोटारीत पन्नास हजारांच्या इतर सुखसोयीसुद्धा (उदा. टेप, डेक) होत्या. रात्री सव्वाअकराच्या सुमारास अतुल हयात रिजन्सी हॉटेल मध्ये गेले. तिथे नऊशे रुपये भरून त्यांनी डिस्को थेकचे प्रवेशपत्र घेतले. त्या वेळेस हॉटेलच्या गणवेशधारी नोकराने पार्किंगसाठी त्यांच्या गाडीच्या चाव्या मागितल्या. चांगल्या हॉटेलच्या चांगल्या सेवेची खात्री व स्वतंत्र पार्किंग लॉट आणि गणवेशधारी कर्मचारी. अतुल यांनी चाव्या त्याच्या हवाली केल्या व त्याने दिलेले डॉकेट (टोकन) घेऊन ते निर्धास्तपणे डिस्को थेकमध्ये शिरले. डॉकेट दाखवून कार घेऊन परतण्यासाठी ते हॉटेलमधून बाहेर आले, त्यावेळी रात्रीचा एक वाजून चाळीस मिनिटे झाली होती आणि..

त्यांचे डॉकेट घेऊन जवळजवळ अर्धा तास गायब झालेल्या हॉटेल कर्मचाऱ्याने येऊन सांगितले की, पार्किंग लॉटमध्ये तुमची मोटार दिसतच नाहीये. आमच्या नोंदीप्रमाणे १२.२० ते १२.४०च्या दरम्यान ती बाहेर गेली. अतुल यांना क्षणभर काही कळेचना. मात्र लगेच स्वत:ला सावरून त्यांनी कर्मचाऱ्याला खडसावून विचारले, डॉकेट माझ्या ताब्यात असताना मोटारच्या किल्ल्या इतर कुणाला तू दिल्यासच कशा? यावर त्याच्याकडे काहीच उत्तर नव्हते. अखेरीस हॉटेलने पोलिसांत तक्रार करून एफआयआर बनवून घेतला. पण अतुल यांना कोणतीही नुकसानभरपाई देण्यास हॉटेल राजी झाले नाही. मोटारीच्या विम्यामध्ये चोरीचा अंतर्भाव नसल्याने, तिकडूनही काही आशा नव्हती.

अतुल यांनी हॉटेलच्या व्यवस्थापनाविरुद्ध दिल्ली राज्य आयोगाकडे तक्रार दाखल केली. सेवेतील त्रुटी व निष्काळजीपणा यामुळे मोटार चोरीला गेली, म्हणून नुकसानभरपाई मागितली. हॉटेल व्यवस्थापनाने आपली जबाबदारी झटकून टाकली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे :

१) पार्किंग सेवा ही फुकट आहे; कारण पार्किंग फी घेतली जात नाही. सबब अतुल ग्राहक ठरत नाहीत.

२) प्रत्येक डॉकेटच्या मागे छापलेले आहे की, भेट देणाऱ्या प्रत्येकाने स्वत:च्या जबाबदारीवर वाहन पार्क करवे. अशा वाहनाचे नुकसान/ चोरीसाठी व्यवस्थापन जबाबदार नाही.

मात्र राज्य आयोगाने हा युक्तिवाद नाकारला. हॉटेलकडून सेवेमध्ये त्रुटी झाली, असे सिद्ध होत आहे, म्हणून तक्रारदारास दोन लाख रुपये नुकसानभरपाई, त्यावर १० टक्के व्याज आणि खर्चापोटी पाच हजार रुपये द्यावेत, असा निर्णय दिला. त्यावर हॉटेल व्यवस्थापनाने राष्ट्रीय आयोगाकडे अपील केले.

या अपिलावर निर्णय देताना राष्ट्रीय आयोगाने हयात हॉटेलच्या व्यवस्थापनाच्या वृत्तीवर ताशेरे ओढले. आंतरराष्ट्रीय साखळी असणारे हे हॉटेल आहे. त्याचे व सर्व पंचतारांकित हॉटेलांचे इतर दरच इतके चढे आहेत की, तथाकथित फुकट सेवांचे पैसे अगोदरच वसूल होतात. अतुल यांनी भरलेल्या नऊशे रुपयांत पार्किंगसुद्धा अंतर्भूत आहे. सबब, ही सेवा फुकट होती, असे मानण्यास आयोगाने नकार दिला. गणवेशधारी कर्मचारी किल्ल्या मागतो, त्या वेळेस ग्राहकास विश्वास वाटणारच. डॉकेटमागे अटी छापून जबाबदारी झटकणे हयातसारख्या हॉटेलला तर मुळीच शोभत नाही, असेही नमूद केले. अखेरीस, जर मोटारची जबाबदारी घेता येत नसेल, तर हॉटेलच्या दारातच तसा स्पष्ट बोर्ड लावावा, असे सांगून, राष्ट्रीय आयोगाने, राज्य आयोगाचा निर्णयच कायम केला. हॉटेलची जबाबदारी केली. हा ग्राहकांना दिलासा होय.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0