पहिले पान | प्रहार ब्लॉग | रस्ते खड्ड्यातच!

रस्ते खड्ड्यातच!

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

मुंबईत 434 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे जाळे पसरलेले आहे. पूर्वी डांबराचे रस्ते होते आता ब-याचशा रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहेत. मुळात खड्ड्यांची खरी समस्या निर्माण होते ती जुलै महिन्यांत. सखल भागात पाणी तुंबत असल्याने तसेच पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यांची झीज होऊन डांबराचा थर वाहून जात असल्याने खड्डे पडतात.

पावसाळा आला की नालेसफाईवरून मुंबईचे वातावरण तापते, त्याचप्रमाणे आणखी एक प्रश्न ऐरणीवर येतो तो म्हणजे रस्त्यांवरील खड्ड्यांचा. पावसाळ्यात खड्डे पडल्याने महापालिका प्रशासन या खड्ड्यांच्या राजकारणाशी झुंजत राहते. परंतु मूळ प्रश्न मात्र कायम राहतो. त्यामुळे लोक संतापतात. राजकीय नेते याचे राजकारण करतात. पण मूळ समस्या काही सुटत नाही. मुंबईतील खड्डे बुजवण्यासाठी अनेकदा नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. या तंत्रज्ञानामुळे खर्चात वाढ होत असली तरी ही समस्या आजही संपूर्णत: सोडवण्यात यश आलेले नाही.

 

मुंबईतील रस्त्यांवर निर्माण होणा-या खड्ड्यांवर मलमपट्टी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने यावर्षी 40 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मोठ्या प्रमुख रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी लवकरच निविदा मागवण्यात येणार असून पावसाळ्यापूर्वी 25 टक्के रकमेतून खड्डे बुजवण्याचे काम विद्यमान कंत्राटदारांकडून करून घेतले जाणार आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही पावसाळयात खड्ड्यातल्या कंबरतोडप्रवासापासून मुंबईकरांची सुटका झालेली नाही. मागील वर्षी खड्ड्यांसाठी 33 कोटी रुपये खर्च केले होते. तत्कालीन अतिरिक्त आयुक्त आर.ए. राजीव यांनी खड्डेमुक्त रस्ते बनवा आणि दुप्पट वेतनवाढ मिळवा, अशी योजना अभियंत्यांसाठी जाहीर केली होती. त्यामुळे अभियंत्यांनी काम केले असेलही. पण रस्ते विभागाने काटेकोरपणे काम केले म्हणून खड्ड्यांचा त्रास झाला नाही, असे जर प्रशासनाचे म्हणणे असेल तर ते चुकीचे ठरेल. मुळातच मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस पडला होता, हे विसरून चालणार नाही. मात्र यावर्षी मोठा पाऊस झाल्यास महापालिकेला तोंड लपवायला खड्ड्यातही जागा मिळणार नाही.

 

मुंबईत मेट्रो, मोनो रेल तसेच स्काय वॉक व उड्डाणपुलाच्या कामासाठी रस्ते खोदून ठेवले आहेत. एमएमआरडीएची ही कामे वर्षभर सुरू राहणार आहेत. मात्र अन्य कंपन्यांना खोदून ठेवलेले रस्ते पूर्ववत करण्यासाठी 30 मे ची डेडलाइन दिली होती. आता ती वाढवून पाच जून केली आहे. या कंपन्या रस्ते मोकळे करून देतील. पण वर्षभर सुरू राहणा-या एमएमआरडीएच्या कामांचे काय? ही विकासाची कामे म्हणून ती सुरू ठेवली जाणार आहेत. महापालिकेच्या नियमानुसार खोदलेल्या कामांभोवती संरक्षक कुंपणही घातले जाईल. पण या खोदलेल्या कामांमुळे रस्त्यांवर पावसामुळे साचल्या जाणा-या पाण्याचे काय? या साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात खड्डे निर्माण होतात, हेसुद्धा लक्षात घ्यायला हवे.

 

मुंबईत 437 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे जाळे पसरलेले आहे. पूर्वी डांबराचे रस्ते होते आता ब-याचशा रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहेत. मुळात खड्ड्यांची खरी समस्या निर्माण होते ती जुलै महिन्यांत. सखल भागात पाणी तुंबत असल्याने तसेच पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यांची झीज होऊन डांबराचा थर वाहून जात असल्याने खड्डे पडतात. त्यामुळे पावसाच्या आधी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला तरी खड्ड्यांचा शोध अधिका-यांना लावता येणार नाही. त्यामुळे प्रशासनाने खड्डे बुजवण्यासाठी अधिक तरतूद करणे ठीक आहे. पण पावसाआधीच खड्डे बुजवले जात नाहीत, अशी ओरड करणे योग्य ठरणार नाही. पावसानंतर खड्डे पडत असल्याच्या ठिकाणांचा जरून विचार व्हायला हवा.

 

पावसाळ्यामध्ये खड्डे दुरुस्त करतानाच त्याचे रेकॉर्ड पालिकेकडे असते. या रेकॉर्डच्या आधारे खड्डय़ांची दुरुस्ती करता येणे शक्य आहे. पावसाळा सोडल्यास इतर आठ महिन्यात रस्त्यांची मूलभूत बांधणी करता येऊ शकते. पालिकेने खरं म्हणजे प्रत्येक रस्त्याच्या देखभालीचा अहवाल तयार करणे आवश्यक आहे.

त्याच्यानुसार त्या कामांकरता राखीव पैशाची सोय पालिका सहजच करू शकते. अशा तऱ्हेने सर्व रस्त्यांचे नियोजन केल्यास पावसाळ्यातील खड्ड्यांचे प्रमाण निश्चितच कमी होईल.

 

मुंबईतील रस्त्यांवर वारंवार पडणा-या खड्ड्यांवर कायमस्वरूपी मलमपट्टी करण्यासाठी महापालिका प्रशासन सल्लागार नियुक्त करून त्यांच्यावर कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी करते. यापेक्षा महापालिकेच्या रस्ते खात्याचे अभियंते यासाठी सक्षम आहे. वर्षानुवर्षे आलेल्या अनुभवांवरून ते काम करत असतात. त्यांना कोणत्याही सल्लागारांची तसेच सनदी अधिका-यांच्या देखरेखीची गरज नाही. उलट अशा आगंतुक उपाययोजना केल्यामुळे कामे रखडली जातात, हेच निदर्शनास आले आहे. मुंबईतील खड्डे पावसाळ्यात दुम्रुस्त करणे हे जिकिरीचे काम आहे. वेळोवेळी येणारा पाऊस, वाहतुकीची कोंडी, ‘अस्फाल्ट मिक्सतयार न होण्याची प्रक्रिया, सामान्य जनतेचा संताप, वाहतुक पोलिसांचे अडेलतट्ट धोरण, अशा ब-याच कारणांमुळे खड्डे बुजवताना अभियंत्यांना तारेवरची कसरत करावी लागते. यावर उपाय एकच असून तो म्हणजे खड्डे पडू न देणे. बहुतेक वेळेला खड्डे खोदणा-या यंत्रणांवर रस्ता खराब केल्याचे खापर फोडले जाते. पण या खड्डे खोदणा-या संस्थांना खड्डे खोदायची परवानगी वेळेवरच दिली जाईल, याची काळजी पालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी घ्यायला हवी. असे केल्यास काम सहजिकच वेळेतच संपेल. परंतु रस्ते खोदणा-या संस्थांचे काम वेळेत म्हणजे ऑक्टोबर महिन्यात सुरू होत नाही, हे आजवरच्या मे महिना उलटत आला तरी सुरू असलेल्या खोदकांमावरून दिसून येते. अर्थात याला पालिका प्रशासन व वाहतूक पोलिस जबाबदार आहेत. यांच्याकडून या संस्थांना खोदकाम करण्यासाठी वेळेवर परवानगी दिली जात नाही. अशावेळी खोदकाम करत असलेल्या संस्था एप्रिलपूर्वी आपली कामे संपवतील,अशी अपेक्षा बाळगणे हे मुर्खपणाचे आहे.

 

खड्डे बुजवण्यासाठी कार्बन कॉरसारख्या जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा खटाटोप महापालिकेकडून सुरू आहे. ही प्रक्रिया प्रचंड खर्चिक आहे. पण खड्डे बुजवण्यासाठी जास्त पैसा खर्च करण्याची मुळीच गरज नाही. पावसाने थोडीशी उघडीप दिल्यानंतर रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवर किंवा खड्डा व लगतच्या भागावर अस्फाल्ट मिक्सने मलमपट्टी केली जाऊ शकते. आजवर ही प्रक्रिया केली जात आहे. या कामासाठी कुठल्याही प्रकारे खर्चिक तंत्रज्ञान वापरण्याची गरज नाही. डागडुजी ही तात्पुरती स्वरूपाची असल्याने त्यावर जास्त खर्च करणे व दाखवणे हे म्हणजे मुंबईकरांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासारखे आहे. खड्ड्यांच्या नावाने ओरड करून लोकप्रतिनिधी आणि प्रशासन खड्डय़ांचा खर्च वाढवून घेऊन जनतेचा पैसा खड्ड्यात घालतात. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी खड्डे दुरुस्तीचा खर्च सात कोटी रुपयांनी वाढलेला आहे. खरे तर रस्त्यांची कामे जिथे सुरू आहेत त्याठिकाणी प्रशासनाने जागरूकता दाखवल्यास कुठेही निकृष्ट दर्जाचे काम होऊ शकत नाही. शेवटी खड्डे पडू न देणे ही पालिकेचे पहिले काम आहे. त्याकरीता लागणारी सर्व साधने पालिकेच्या अखत्यारीत आहेत. वेळेवर काम पूर्ण होण्यासाठी वाहतूक पोलिसांबरोबर करावयास लागणा-या समन्वयाकडे आयुक्तांनी स्वत: जातीने लक्ष घातल्यास सर्व कामे वेळेवर होतील आणि मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त झालेले पाहायला मिळतील.

 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0