PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: का रे भुलतोसी जाहिरातीच्या रंगा का रे भुलतोसी जाहिरातीच्या रंगा ================================================================================ वसुंधरा देवधर on 30 May, 2010 10:35:00 AM प्रत्येक भाषेमधल्या म्हणी म्हणजे अनुभवाचं सार असतं. गोळीबंद म्हणावा तसा नेमका आणि थेट उपदेश असतो. या म्हणी पिढ्यान् पिढ्या चालतात तशाचा नव्या - नव्या म्हणी तयार होतात. चोखामेळ्याच्या अभंगातील ‘का रे भुललासी वरलिया रंगा’ या पंक्ती अशाच मराठी संस्कृतीचा भाग झाल्या आहेत, म्हणीसारख्या वापरल्या जात आहेत. संतवाङ्मयाची ही मोठी देणगी आहे. तरीही आपण सर्वसामान्य ग्राहक वरवरच्या रूपाला आणि त्याचबरोबर वरवरच्या माहितीला भुलतो. हे वरवरचं रूप असतं ते वस्तूच्या आकर्षक मांडणीचं, वेष्टणाचं, वेष्टणावरच्या खुणावणा-या रंगसंगतीचं आणि मॉडेल कलाकाराचं. वरवरची माहिती कुठे मिळते? वस्तूच्या नावातून, रूपातून आणि मुख्य म्हणजे जाहिरातीतून. जाहिरातीच्या सर्व दिशांनी होणा-या मा-यापासून शहरातल्याच काय, गावाकडचा ग्राहकही पळून जाऊ शकत नाही. वर्तमानपत्रे, मासिके, रेडियो, टी.व्ही., रस्त्यावरची मोठाली होर्डिग, विविध कार्यक्रमांचे आणि उत्सवांचे प्रायोजक.. या व अशा सर्व प्रकारांमधून आक्रमकपणे आपल्या सेवा (बँक, विमा, हॉटेल्स, सहल आयोजन, शिक्षण इ.इ.) आणि वस्तू (यांची यादी अनंत आहे) विकण्यास सर्व उत्पादक सज्ज आहेत. ग्राहक म्हणून, मुख्य म्हणजे चिकित्सक आणि सुजाण ग्राहक म्हणून आपली जबाबदारी अशी की, वस्तूचे वेष्टन आणि जाहिरात याबद्दल सारासार विचार करून, थोडाफार अभ्यास करून, माहिती मिळवून मगच खरेदीचा निर्णय घ्यायचा. खासकरून जाहिरातींवर विसंबून तर खरेदी करूच नये. काय करतात या जाहिराती? आपल्या उत्पादनाची माहिती देतात? होय. त्यापासून होणारे फायदे किंवा त्याची उपयुक्तता सांगतात? होय. त्याच्या वापराविषयी सूचना करतात? होय. कधी - कधी त्याही करतात. म्हणजे ग्राहकाला जी वस्तू व सेवा यांच्या माहितीची गरज असते ती त्या पुरवतात. मग त्यांच्यावर का बरे विसंबू नये, असा प्रश्न कोणी विचारू शकतात. प्रथमत: एक लक्षात घ्यावे की, जाहिरात ही उत्पादकाने त्याचे उत्पादन जास्तीत जास्त ग्राहकांच्या गळी उतरवण्यासाठी किंवा माथी मारण्यासाठी योजलेला उपाय आहे. त्यामुळे ती आकर्षक करण्याचे सर्व प्रयत्न केले जातात. त्यामध्ये वस्तूच्या उपयुक्ततेची माहिती असते. (पण जी उत्पादककाला सोयीची असेल तीच सर्व नाही.) टी.व्ही. वरील जाहिराती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतात आणि दृश्यात्मक परिणाम साधतात. त्यामुळे ती जाहिरात अधिक परिणाकारक ठरते; पण आता असा विचार करा की, आंघोळ करताना साबण लावायचा तो शरीर स्वच्छ करण्यासाठी की, येणा-या - जाणा-याला भुलविण्यासाठी? अशा अनेक जाहिराती असतात ज्यांमध्ये अशा प्रकारे असंबद्ध वाटाव्यात अशा घटना दाखवतात. त्याचप्रमाणे अविश्वसनीय वाटाव्या अशाही गोष्टी/ घटना जाहिरातीमधून सातत्याने दाखवतात. एक मैत्रीण एका क्रीमची जाहिरात पाहून म्हणाली, पंचवीस-तीस वर्षापूर्वी हे नवीन आलं तेव्हा मी आवर्जून वापरायला लागले; पण गोरी सोड, उजळसुद्धा झाले नाही. आतासुद्धा ते वापरते; पण ते सवय म्हणून!! हा एकच अनुभव बोलका आहे. याला विक्रीतंत्राच्या भाषेत ‘ब्रँड लॉयल्टी’ म्हणतात. एका विशिष्ट वयात तुम्ही एखाद्या नावाचे/ कंपनीचे उत्पादन काही वर्षे वापरलेत की ग्राहकाला त्याची जणू सवय होते. म्हणजेच त्या उत्पादनाशी तो बांधला जातो, विचार करणे सोडूनच देतो. जाहिरातींमधलं कौटुंबिक जीवन आकर्षक, समृद्ध, आदर्श आणि हवंहवंसं वाटणारं असतं. आपल्या देशातल्या बहुसंख्य ग्राहकांना ते स्वप्नवत व अप्राप्य असतं. त्यामुळे थोडा पैसा हातात आला की कधी- कधी भूल पडल्यागत खरेदी केली जाते. आवश्यकता, गुणवत्ता, प्राथमिकता हे सगळे विचार बाजूला पडतात. ‘हौसेला मोल नाही,’ यासारख्या म्हणीचा आधार घेत अशा खरेदीची योग्यायोग्यता ठरवली जाते. त्यामुळे फायदा फक्त उत्पादकांचा होतो. कधी अशी वस्तू अडगळही ठरते. नेहमी लक्षात ठेवायचं ते हे की, ग्राहकांचा पैसा, त्यांचे आरोग्य, त्यांचे कौटुंबिक सुख, त्यांच्या मुलांची प्रगती इ. कशाशीही जाहिरातदाराला काही देणं-घेणं नाही. त्याला कमवायचा असतो फक्त नफा आणि हा नफा मिळविण्यासाठी या ज्या जाहिराती केल्या जातात त्याचा पैसाही सामान्य ग्राहकाच्या खिशातूनच जात असतो. वस्तूच्या किमतीत हा खर्च ही धरलेलाच असतो. अशा परिस्थितीत जाहिरातींना भुलणे सोडूनच दिले पाहिजे. विशेषत: लहान आणि वाढत्या वयाच्या मुलांसाठी जी उत्पादने असतात, जसे खेळणी, व्हिडिओ गेम्स किंवा शक्यतो, युक्ती, उंची इ. वाढवणारे पूरक अन्न यांच्याबाबतीत तर जाहिरातदार अतिशय कल्पक असतात. या पासष्टाव्या कलेसाठी इतर अनेक कलांचा एकमेळ साधला जातो. दहा-पंधरा सेकंदात अतिशय परिणामकारक पद्धतीने उत्पादनाची सोयीस्कर तेवढी माहिती (कन्व्हेनिअंट ट्रथ) ग्राहकांपुढे ठेवली जाते. हे करीत असताना ज्या ग्राहकांसाठी म्हणून केले जाते त्यांच्या श्रद्धा, अंधश्रद्धा, संस्कृती, हळवे क्षण, भावनिक व वैचारिक जडणघडण यांचा अतिशय कुशलतेने उपयोग केला जातो. म्हणून तर सामान्य ग्राहक अशा जाहिरातींना बळी पडतो. त्याचे प्रबोधन करण्यासाठी आणि अयोग्य जाहिरातींना आळा घालण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायती अंतर्गत अ‍ॅ-वॉच-क्लब’ कार्यरत आहे. त्याच्या विद्यमाने शाळा, महाविद्यालये, महिला मंडळे, क्लब्ज इ. ठिकाणी जाहिरातीविषयी सखोल माहिती दिली जाते. त्यासाठी संस्थेकडे संपर्क साधण्यास हरकत नाही. अ‍ॅड-वॉच-क्लब, मुंबई ग्राहक पंचायत, ग्राहक भवन, जे.व्ही.पी.डी., विलेपार्ले (प.)- 400056. फोन : 26281832, 26288624.