PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: मलेरियाचे राजकारण मलेरियाचे राजकारण ================================================================================ सचिन धानजी on 01 August, 2010 11:30:00 AM मलेरियाने मुंबईत एवढे थैमान घातले आहे की, सरकारलासुद्धा त्यामध्ये हस्तक्षेप करण्याची वेळ आली. देशाची आर्थिक राजधानी समजली जाणारी ही मुंबई सध्या मलेरियाच्या तापाची राजधानी बनली आहे. मागील पाच वर्षातील मलेरियाच्या रुग्णांची आकडेवारी पाहिली तर या वर्षामध्ये जुलैपर्यंतच 20 हजार 418 रुग्ण आढळून आले. यामध्ये मृतांची संख्या 41 पर्यंत पोहोचली आहे. मागील वर्षी मलेरियाचे रुग्ण साडेसतरा हजार होते. त्या वेळी या आजाराने मृत्यू पावलेल्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे 198 होती. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असली मृत्यूचा आकडा कमी करण्यात प्रशासन यशस्वी ठरले आहे. अर्थात, जनजागृतीमुळे तसेच घरोघरी घेतल्या जात असलेल्या आरोग्य शिबिरांमुळे हे शक्य झालं आहे. एकटय़ा जुलै महिन्यामध्ये मलेरियाच्या रुग्णांमध्ये दुप्पट वाढ होत 12 हजार झाली आहे. वाढती बांधकामे जर या डासांचे अड्डे बनत असतील तर त्या बांधकामांबाबत ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे. मुंबईत 2 हजार 438 ठिकाणी विविध प्रकल्पांची बांधकामे सुरू आहेत. डिसेंबर 2009पर्यंत कंत्राटी कामगारांकडून त्या ठिकाणी मलेरियाविरोधी उपाययोजना राबवण्यात येत होत्या. त्यानंतर महापालिकेने स्वत:च विकासकांना मलेरियाविरोधी उपाययोजना राबवण्याबाबत नोटिसा बजावल्या, परंतु विकासकांकडून या उपाययोजना योग्यरीत्या राबवल्या जाणार नसल्याची तक्रार नगरसेवकांनी करताच त्यांच्याकडून काही निधी आगाऊ वसूल करत त्यातून ही उपाययोजना राबवली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. महापौर श्रद्धा जाधव आणि स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्यात ताळमेळ नसल्यामुळे ते प्रशासनाकडून कशाप्रकारे काम करून घेतील? कोणताही डास हा फवारणी करण्यात येणा-या धुराच्या अथवा औषधाच्या सहा ते सात मिनिटे संपर्कात राहिला तरच मरतो. त्यामुळे डासांना मारण्यासाठी करण्यात येणारी धूम्रफवारणी ही एकाच जागेवर उभे राहून सहा ते सात मिनिटे व्हायला हवी. परंतु धूम्रफवारणी करणारा कर्मचारी चालत चालतच पुढे निघून जातो. परिणामी या औषधाचा परिणाम त्या डासांवर न झाल्याने ते जिवंतच राहतात. दुसरं असं की डास हे शुद्ध पाण्यामध्ये अंडी घालतात. त्यामुळे प्रत्येक इमारतीमध्ये असलेल्या टाक्या, आसपास असलेले मोठे तलाव, नाले आदींमध्ये गप्पी मासे सोडल्यास ते त्या डासांची अंडी खावून त्यांची उत्पत्तीच नष्ट करतील. शिवसेनेचे उपनेते नगरसेवक राजा चौगुले यांनी सभागृहामध्ये वारंवार हे मुद्दे मांडून महापौरांनी याची दखल घेत प्रशासनाला ही उपाययोजना राबवण्यास प्रेरित केले नाही, की मलेरियासाठी पुढाकार घेणाऱ्या शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनाही या सूचनेचा अमल करण्याचे आदेश देता आले नाहीत. जर एका बाजूला मलेरियामुक्त करण्यासाठी शाखा शाखांमधून कार्यक्रम घेणाऱ्याचे आव्हान करायचे आणि शक्य आहे त्याकडे दुर्लक्ष करायचे. याला काय म्हणायचं? मलेरियाचे राजकारण केले जात असल्याचा आरोप महापौर श्रद्धा जाधव यांनी केला. मलेरियाचे राजकारण हे सत्ताधारी शिवसेनेपासून सुरू झालेलं आहे, हे त्यांनी विसरू नये. महापालिकेच्या वतीने घरोघरी राबवण्यात येणा-या आरोग्य शिबिरांच्या ठिकाणी भगवे झेंडे कशाला हवेत. शिवसेनेचे कार्यकर्ते प्रत्येक आरोग्य शिबिर हायजॅक करत हा महापाािलकेचा हा कार्यक्रम आपण केला असल्याचे छातीठोकपणे सांगताना त्याठिकाणी त्यांची नेतेमंडळी तळ ठोकून उभी राहतात. हे राजकारण कोण करतं? याला राजकारण म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? मलेरियाच्या विरोधी उपाययोजना राबवण्यासाठी शिवसेना भवनमध्ये उद्धव ठाकरे यांनी नगरसेवक, शाखाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. त्यांच्या त्या व्यासपीठावर केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय ओक, महापालिकेचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. गौरीष आंबे, कीटकनाशक विभागाचे प्रमुख डॉ. अरुण बामणे उपस्थित होते. संजय ओक हे प्रत्येक वेळी उद्धव ठाकरेंच्या मागून एवढे घुटमळत असतात, हे पाहून ते डॉक्टर आहेत शिवसेनेचे कार्यकर्ते असा प्रश्न पडतो. उद्धव ठाकरेंनी महापालिकेच्या अधिका-यांना दावणीला बांधले आहे. महापौर आणि सभागृहनेते सत्तेचा गैरवापर पक्षासाठी करत आहे. महापौर निवासावर जर अशी बैठक झाली तर ती समजण्यासारखे होते. पण जेव्हा महापालिकेच्या अधिका-यांना पक्षकार्यालयातच बोलावून त्यांना आदेश दिले जात असतील तर ही गंभीर बाब आहे.