पहिले पान | प्रहार ब्लॉग | डॉक्टर आणि जाहिराती

डॉक्टर आणि जाहिराती

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

रोग्यांना आपल्याकडे, आपल्या गटाकडे अगर संस्थेकडे आकृष्ट करणे, कोणत्याही प्रकारच्या माध्यमातून जाहिरात करणे, त्यात वैयक्तिक माहिती, वैशिष्ट्ये, कौशल्ये इ. चे वर्णन करणे. या व यासारख्या इतर अनेक गोष्टींना मज्जाव करण्यात आला आहे. दवाखान्यात अगर दवाखान्याबाहेरच्या बोर्डावर डॉक्टर स्वत:चा फोटो लावू शकत नाही, असेही त्या नियमात म्हटले आहे.

विविध वर्तमानपत्रे, त्याचप्रमाणे टीव्हीवर निरनिराळ्या हॉस्पिटल्सच्या जाहिराती दिसतात. त्यांचे प्रमाणही वाढते आहे. वर्तमानपत्रातील जाहिराती, बरेच वेळा बातमीसारख्या भासतील, अशा प्रकारेही केलेल्या असतात.

 

अजय गौतम या तरुणाने अशीच एक जाहिरात पाहिली. अमर उजाला नामक प्रसिद्ध वर्तमानपत्रात ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती. अमृतसर आय क्लिनिकमध्ये आलेल्या नवीन लेसर मशिनच्या साहाय्याने निष्णात डॉक्टर दिनेश शर्मा डोळ्यांचा नंबर कमी करू शकतात. इतकेच नव्हे; तर चष्मा पूर्णपणे जाऊही शकतो. अशा प्रकारचे वर्णन त्या जाहिरातीत केलेले होते. ते वाचून अजय गौतम या तरुणाला मोठाच आनंद झाला. त्याला चष्मा होता आणि त्याच्या दृष्टिदोषावर आतापर्यंत कोणताच इलाज सापडला नव्हता. सतत चष्मा लावण्यास पर्यायच नव्हता. यामुळे इंजिनीयर झाल्यावर, त्याला मनासारखी नोकरी मिळू शकत नव्हती. दृष्टी निर्दोष नाही या कारणाने अनेक ठिकाणी तर तो स्पर्धा परीक्षेलाही बसू शकत नव्हता. त्यामुळे अमृतसर आय क्लिनिक अँड 6/6 क्लासिक लेझर सेंटरची ती जाहिरात पाहून त्याच्या मनात आशा जागी झाली.

 

जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर जाऊन त्याने डॉ. दिनेश शर्मा यांची भेट घेतली. अजयच्या डोळ्यांची तपासणी करून, डॉक्टर शर्मा यांनी त्याला जणू खात्रीच दिली की पी.आर.के. सर्जरी केल्यावर तुझा दृष्टिदोष दूर होईल. तुझ्या नजरेवर विपरित परिणाम होणार नाही व परत परत त्रासही होणार नाही. हे ऐकून 21 ऑक्टोबर 2010 रोजी अजयने सहा हाजार रुपये दिले व 23-10 रोजी डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. शस्त्रक्रिया झाली, पण ज्या डाव्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली, त्याचा चष्मा काही गेला नाही. दष्टी मात्र सुधारली, पण त्यालाही काही महिन्यांचा अवधी जावा लागला. औषधोपचार घ्यावे लागले. जवळ जवळ 16 महिने त्रास सहन करूनही डोळा पूर्ण सुधारला नाहीच. त्यामुळे अजयने दुस-या डॉक्टरांचे मत घेतले. त्यांनी स्पष्ट सांगितले की, अजयचा दृष्टिदोष पूर्णपणे बरा होणे शक्य नाही. हे ऐकून अजयला आपण फसवले गेलो, असे वाटले. त्याने अमृतसर आय क्लिनिक व तिथल्या डॉक्टरांविरुद्ध राज्य आयोगाकडे तक्रार दाखल केली.

 

राज्य आयोगाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. त्या वेळी डॉ. शर्मा यांनी स्पष्ट केले की, शस्त्रक्रियेदरम्यान कोणतीही हलगर्जी अगर दुर्लक्ष झालेले नाही. (मेडिकल निगलिजन्स) ‘100 टक्के निर्दोष दृष्टी मिळणार असे आश्वासन आम्ही अजयला दिलेले नाही. कारण पीआरके या शस्त्रक्रियेच्या मर्यादा आम्ही जाणतो. या संदर्भात कोणी तिसरी तज्ज्ञ व्यक्ती अगर तज्ज्ञ डॉक्टरांच्या गटाची नेमणूक करून, त्यांचे मत मागवावे, असे ठरले. त्यानुसार राज्य आयोगाने पीआरके सर्जरी व अजयचा मूळ दृष्टिदोष याबाबत नेमके प्रश्न विचारून तज्ज्ञांची उत्तरे मागवली. त्यातून असे निष्पन्न झाले की, डॉक्टरांनी हलगर्जीपणा केलेला नाही.

(तांत्रिक/शास्त्रीय तपशील वगळला आहे.)

 

या निर्णयामुळे राज्य आयोगाने अजय गौतमची तक्रार फेटाळली. त्यानंतर अजय याने राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे अपील केले. राष्ट्रीय आयोगाने राज्य आयोगाकडून प्राप्त झालेली कागदपत्रे आणि दोन्ही पक्षांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला. या वेळी त्यांनी शस्त्रक्रियेदरम्यान दुर्लक्ष अगर निष्काळजीपणा झाला नाही. तसेच शस्त्रक्रियेनंतरच औषधोपचार योग्य होते, हे मान्य केले. मात्र हात घातला तो मूळ प्रश्नाला.

 

मुळात अजय गौतम अमृतसर आय क्लिनिकमध्ये गेला, तो त्यांची अमर उजाला या दैनिकामधली जाहिरात वाचून. त्या जाहिरातीत काय म्हटले आहे, कोणते दावे केले आहेत, ती ग्राहकाला भुलवणारी, रोग्याला अवाजवी आशा लावणारी आहे का, या मुद्दयांकडे राष्ट्रीय आयोगाने लक्ष दिले. मुळातली जाहिरात पाहिली. त्यामधून त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की, डॉक्टर अगर हॉस्पिटलसारखी संस्था यांनी अशी जाहिरात करणे योग्य आहे काय? या प्रश्नाच्या उत्तरासाठी त्यांनी इंडियन मेडिकल कौन्सिलच्या 6.1 अंतर्गत जे नियम डॉक्टरांसाठी बनवलेले आहेत, त्यांचा संदर्भ घेतला. त्यात डॉक्टरांनी कोणत्या गोष्टी करणे वज्र्य आहे किंवा व्यावसायिक नीतिमत्तेमध्ये न बसणारे आहे, याविषयी स्पष्ट नियम दिले आहेत. जाहिरात करणे हे या नियमानुसार अयोग्य आहे.

 

रोग्यांना आपल्याकडे, अगर आपल्या गटाकडे अगर संस्थेकडे आकृष्ट करणे, कोणत्याही प्रकारच्या माध्यमातून जाहिरात करणे, त्यात वैयक्तिक माहिती, वैशिष्ट्ये, कौशल्ये इ. चे वर्णन करणे. या व यासारख्या इतर अनेक गोष्टींना मज्जाव करण्यात आला आहे. दवाखान्यात अगर दवाखान्याबाहेरच्या बोर्डावर डॉक्टर स्वत:चा फोटो लावू शकत नाही, असेही त्या नियमात म्हटले आहे.

 

या पार्श्वभूमीवर अमृसर आय क्लिनिकची जाहिरात नियमांचे उल्लंघन करणारी ठरते, असा अभिप्राय राष्ट्रीय आयोगाने दिला. इतकेच नव्हे; तर जाहिरातीतील मजकूरसुद्धा ग्राहकांची/रोग्यांची दिशाभूल करणारा आहे. ती जाहिरात वाचून दृष्टिदोष पूर्ण बरा होईल व 6/6 अशी निर्दोष दृष्टी मिळेल, असा ग्रह होऊ शकतो. तज्ज्ञ समितीच्या मतामध्येही त्यांनी स्पष्ट केले आहे की, अशाप्रकारे खात्री देता येणार नाही. त्यामुळे अशी जाहिरात प्रसिद्ध करून निराश रोग्यांना भुलवणे योग्य नव्हे, असे मत राष्ट्रीय आयोगाने व्यक्त केले. त्यामुळे हलगर्जीपणा नाही, तरी अनुचित व्यापारी प्रथा या ग्राहक संरक्षण कायद्यामधील कलम 2(आय)(व्ही)अंतर्गत मात्र सदर हॉस्पिटल व डॉक्टर दोषी ठरू शकतात. तसेच त्यांनी इंडियन मेडिकल कौन्सिलच्या नियमांचेही उल्लंघनच केले आहे, असे म्हणून तक्रारदार अजय यांना एक लाख रुपये नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली. ती न दिल्यास, देण्याच्या तारखेपर्यंत 12% दराने व्याजही मंजूर झाले.

 

डॉक्टरी व्यवसायाबाबतची ही माहिती व जाहिरातीबाबतचा राष्ट्रीय आयोगाचा दृष्टिकोन नेहमी मार्गदर्शक ठरेल, यात शंका नाही.

 (अपील क्र. 428/204, निर्णय 26 फेब्रुवारी, 2010)  

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0