पहिले पान | प्रहार ब्लॉग | विभाजनाचे राजकारण

विभाजनाचे राजकारण

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

मुंबई महापालिकेचे विभाजन करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, तसे विभाजन करण्याचा कोणताही विचार सरकारचा नाही, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. तरीही मुंबईही आमचीच. त्याच्या विकासाची चिंता आम्हालाच, असा जो काही आव आणून शिवसेना मुंबईच्या मुद्दयावरून रान उठवतेय यामागे विकासाची चिंता किती व राजकारण किती याचा अंदाज आल्यावाचून राहत नाही. मुंबई महापालिकेचे विभाजन होऊ नये, अशीच लोकभावना आहे. परंतु महापालिकेत गेली 15 वर्षे शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. या पंधरा वर्षात मुंबईच्या किती विकासकामांना युतीने गती दिलीय?

मुंबई महापालिकेचे विभाजन करा, या काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांच्या वक्तव्यावर सध्या प्रचंड रान उठलेय. भाई जगताप यांनी व्यक्तिश: केलेली सूचना हे संपूर्ण काँग्रेस पक्षाचे धोरण मानून शिवसेना-भाजप युतीच्या नेत्यांनी मराठी आणि मुंबईच्या मुद्दय़ावरून कित्येक वर्षापासून म्यान करून ठेवलेल्या तलवारी बाहेर काढल्या. मुंबई आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची घोषणा देत महापालिकेच्या सभागृहातही गोंधळ घातला. मुंबईच्या समस्या जाणून घेण्यासाठी बोलावलेल्या सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत भाई जगताप यांनी मांडलेली ही सूचना मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्याच वेळी धुडकावून लावली. असे असतानाही नुसता दंगा करून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा काँग्रेसचा डाव असल्याचा नेहमीचा कांगावा केला जातोय. हे शिवसेनेच्या वैफल्यग्रस्ततेचे लक्षण आहे. मुंबई महापालिकेचे विभाजन करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, तसे विभाजन करण्याचा कोणताही विचार सरकारचा नाही, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. तरीही मुंबईही आमचीच. त्याच्या विकासाची चिंता आम्हालाच असा जो काही आव आणून शिवसेना मुंबईच्या मुद्दयावरून रान उठवतेय यामागे विकासाची चिंता किती व राजकारण किती याचा अंदाज आल्यावाचून राहत नाही. मुंबई महापालिकेचे विभाजन होऊ नये अशीच लोकभावना आहे. परंतु महापालिकेत गेली 15 वर्षे शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. या पंधरा वर्षात मुंबईच्या किती विकासकामांना युतीने गती दिलीय? समांतर नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएची स्थापना केली म्हणून राज्य सरकारच्या नावाने महापालिकेतील सत्ताधारी बोटे मोडताहेत. पण एमएमआरडीएचे सुरू असलेले विकास प्रकल्प आणि महापालिकेकडून राबवली जाणारी विकासकामे यांची तुलना करता नक्कीच मुंबई महापालिका त्यामध्ये अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट झालेय. मुंबई महापालिकेचे विभाजन म्हणजे काय तर शहर व उपनगराचे दोन भाग करणे. त्यासाठी दोन महापालिका तयार करून दोन्हीसाठी स्वतंत्र महापौर, स्वतंत्र आयुक्त, यासह स्वतंत्र महापालिकेचा कर्मचारीवर्ग अशी स्वतंत्र व्यवस्था करणे भाग आहे. मुळातच महापालिकांचे विभाजन करण्याची संकल्पना भाई जगताप यांच्या डोक्यात कशी शिरली, हा संशोधनाचा विषय आहे. या महापालिकेमध्ये 24 विभाग कार्यालये आहेत. त्यासाठी प्रत्येक एक साहायक आयुक्त नमेलेला आहे. 24 वॉर्डाच्या 16 प्रभाग समित्या स्थापन केल्या असून त्यासाठी प्रभाग समिती अध्यक्ष म्हणून नगरसेवकांना नियुक्त केले आहे. त्यामुळे शहर असो वा उपनगर या दोन्ही ठिकाणी प्रत्येक वॉर्डात साहायक आयुक्तांच्या देखरेखीखाली विकासकामे राबवली जात आहेत. मुंबई महापालिकेचा एकूण अर्थसंकल्प सुमारे 20 हजार कोटी रुपयांचा. देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या महापालिकेमध्ये भ्रष्टाचारच बोकाळला आहे. त्यामुळे विभाजन करून भ्रष्टाचाराला खतपाणी मिळेल. अशा विभाजनामुळे विकासाचा प्रश्न सुटणार नाही, तर मुंबईकरांचे प्रश्न लक्षात घेऊ त्याप्रमाणे विकासकामे राबवायला हवीत, असे स्षष्ट मत स्वाभिमानचे अध्यक्ष नितेश राणे यांनी व्यक्त करून विभाजनाचा मुद्दा मोडीत काढला आहे. स्वाभिमान संघटनेने जेव्हापासून पाणीप्रश्न हाती घेतला तेव्हापासून पाणी परिस्थितीत सुधारणा झाली आहे. ही संघटना मुंबईकरांना काय हवेय, त्यांच्या काय समस्या हे जाणून घेण्यासाठी नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरलेली आहे. ही संघटना मुंबईच्या विकासाचा विचार करत असताना भाई जगताप यांच्यासारख्य ज्येष्ठ नेत्याला मुंबईच्या विकासाचा विसर पडावा, मुंबई महापालिकेचे विभाजन करणे म्हणजे दोन भावांनी आईला स्वत:कडे ठेवण्यासाठी तिच्या शरीराचे भाग वाटून घेण्यासारखे आहे. असे तुकडे करण्याची भाषा करून भाई जगताप यांनी वैयक्तिक मत व्यक्त करत मुंबईचे दोन तुकडे करण्याचे मनसुबे उघड केले आहेत. भाई जगताप हे या महापालिकेतून विधान परिषदेवर निवडून गेले आहेत, याचाही त्यांना विसर पडला. भाई जगताप यांनी उपनगराचा विकास डोळ्यासमोर ठेवून विभाजनाची भाषा केली असेल तर उपनगराचा विकास पाहिजे, त्या तुलनेत होत नसल्याची खंत नगरसेवकही व्यक्त करताना दिसतात. मालाडचे आमदार व नगरसेवक योगेश सागर हे पाणीप्रश्नावरून वारंवार लोकसंख्येच्या आधारे पाण्याचे वाटप करावे, अशी मागणी करत असतात. उपनगरांमध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. पश्चिम उपनगराची लोकसंख्या 60 ते 62 लाखांवर पोहोचलेली आहे. तर पूर्व उपनगराची लोकसंख्या 42 ते 45 लाखांवर पोहोचली आहे. या तुलनेत शहराची लोकसंख्या 32 ते 35 लाख एवढी आहे. या तिन्ही भागांतील लोकसंख्या पाहता उपनगरातील लोकसंख्या अधिक असल्याचे दिसून येते. उपनगरातील वस्ती वाढत असताना या दोन्ही उपनगरांना मिळून एकूण 220 कोटी लिटर व एकट्या शहराला 115 कोटी लिटर एवढा दररोज पाण्याचा पुरवठा होतोय. आज मुंबई महापालिका उपनगरांची पाण्याची तहान भागवू शकलेली नाही. शहर भागांमध्ये महापालिकेची तीन प्रमुख रुग्णालये आहेत. उपनगरात अशा प्रकारे एखादे मोठे महापालिकेचे रुग्णालय बांधले गेले का? शहरामध्ये केवळ नोकरीधंद्यासाठी येणा-या लोकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे निवासीपेक्षा व्यावसायिक वापराचीच संकुले, कार्यालये अधिक आहेत. पण उपनगरात अशा प्रकारे विकास प्रकल्प राबवून तेथील लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न महापालिकेने न केल्यामुळे आज अशा प्रकारे विभाजनाच्या कल्पना सुचवल्या जात आहेत. विभाजन केले तरी उपनगराचा विकास होणार नाही. विभाजन करून सनदी अधिका-यांना अधिक वाव मिळेल. आज महापालिकेमध्ये चार अतिरिक्त आयुक्त आहेत. विभाजनापेक्षा या अतिरिक्त आयुक्तांना पूर्व व पश्चिम उपनगरातील कार्यालयात बसवले तर साहायक आयुक्तांचा तसेच संबंधित अधिका-यांचा मुख्यालयात येण्या-जाण्यास जो वेळ वाया जातो, तो वेळ वाचेल. त्यामुळे त्वरित निर्णय घेण्याची क्षमता अधिका-यांमध्ये येईल. यातून उपनगरांच्या विकासाचे मार्ग खुले होतील. उपनगरांचा विकास करायचा असेल तर वाढत्या लोकसंख्येचे नियोजन करून त्याप्रमाणे नागरी प्रकल्प हाती घेणे गरजेचे आहे. महापालिकेकडे तसे नियोजनच नाही. त्यामुळे उपनगरवासीयांच्या पायाभूत सेवा-सुविधांवर ताण येत आहे. पण महापालिकेला त्यांची चिंता नाही! सत्तेवरील शिवसेना-भाजप युतीच्या नगरसेवकांना राजकारणाशिवाय काहीच सुचत नाही. विकासकामांच्या नावाने ठणठणाट असलेली शिवसेना राजकारण करून स्वत:ची कातडी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. अन्यथा, एका आमदाराने व्यक्तिगतरीत्या केलेल्या विधानावर एवढा गदारोळ करण्याची गरज नव्हती.

 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0