पहिले पान | रिलॅक्स | बाभंची रसदायी कविता

बाभंची रसदायी कविता

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
image चित्रकार सुहास बहुलकर आणि डॉ. घनश्याम बोरकर.(फोटो-विनम्र आचरेकर)

प्रसिद्ध कवी बा.भ. बोरकर यांच्या जन्मशताब्दीचं निमित्त साधून गुरुवार १८ फेब्रुवारी रोजी मुंबईत ‘जिणे गंगौघाचे पाणी ’ हा कार्यक्रम सादर झाला. बोरकरांच्या कवितेचं मोठेपण अधिक ठसठशीत करणा-या या कार्यक्रमाचा हा आस्वाद

एखादी कविता सर्वांगाने कशी भोगायची, ते बाळकृष्ण भगवंत बोरकर ऊर्फ बा.भ. बोरकर ऊर्फ बाकीबाब यांनीच केवळ कोंकणीच नाही, तर मराठी सारस्वतालाही शिकवलं. सर्वसाधारणपणे कविता वाचणं आणि त्यातल्या कवीतिक आशयाने तृप्त होणं एवढीच प्रक्रिया कविता आणि रसिक वाचक यांच्यात घडत असते. पण हा काव्यव्यापार केवळ एवढ्यापुरताच सीमित न ठेवता, रस, रंग, रूप, गंध आणि ध्वनी अशा सर्व अंगांनी कवितेचा आस्वाद कसा घ्यायचा, ते बाभंनीच दाखवून दिलं. कारण त्यांची कविता ज्ञानेंद्रियांची ही सर्वच आसक्ती पूर्ण करणारी होती. कधीही त्यांची कविता काढावी नि वाचायला सुरुवात करावी, प्रत्येक वेळी ही कविता सर्जनाच्या सोहळ्याचाच साक्षात्कार घडवते. बोरकरांच्या कवितेचं हे सर्जनशीलत्व किती चिरतरुण आणि चिरंतन आहे, याचाच साक्षात्कार दोन दिवसांपूर्वी आला. बा.भ. बोरकरांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आमी गोयंकार’, ‘विवेकआणि संवादया तीन संस्थांनी एकत्रितपणे दादरच्या दादर-माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये एका अनोख्या कार्यक्रमाची आखणी केली होती.

अनोख्या अशासाठी की, या कार्यक्रमात अथपासून इतिपर्यंत बाकीबाबांची कविता होतीच, परंतु तिचं प्रकटन मात्र वेगवेगळ्या माध्यमांतून होत होतं. कधी गाण्याच्या माध्यमातून. कधी चित्राच्या माध्यमातून तर कधी, नृत्याच्या माध्यमातून. बोरकरांची कविता अशा विविध माध्यमांतून सादर करणारी मंडळी अत्यंत तोलामोलाची होती. प्रसिद्ध संगीतकार-गायक डॉ. सलील कुलकर्णी यांनी बारेकरांच्या तीन मराठी कविता चाली लावून सादर केल्या, प्रसिद्ध शास्त्रीय गायिका निशा पारसनीस यांनी पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेली बाकीबाब यांची तीन कोंकणी गाणी सादर केली. चित्रकार सुहास बहुलकर यांनी बोरकरांच्या वनगाणेया कवितेवर बघता बघता एक सुरेख चित्र काढलं, तर ख्यातनाम नर्तिका राजश्री शिर्के व त्यांच्या शिष्यांनी बोरकरांनी अनुवादित केलेल्या कालिदासाच्या मेघदूताया खंडकाव्यावर अतिशय तरल आणि उत्कट अशी नृत्यरचना सादर केली. वेगवेगळ्या कलामाध्यमांतला हा साराच अनुभव बोरकरांची कविता रसिकांपर्यंत अधिकाधिक पोहोचवणारा होता.

विशेषत: राजश्री शिर्के व त्यांच्या शिष्यांनी मेघदूतकाव्यावर केलेलं नृत्य खूपच प्रेक्षणीय होतं. मुख्य म्हणजे मेघदूतातल्या यक्षाच्या मनातील भाव या नृत्यातू्न पुरेपूर व्यक्त होत होते. बाभंनी केलेलं मेघदूताचं हे भाषांतर म्हणजे एक चमत्कारच आहे. बोरकरांना संस्कृत येत नव्हतं. तरीही त्यांनी मेघदूताचा अनुवाद करायचाच, असा निश्चय केला होता. त्यांचे अनेक दिवस घालमेलीत गेले. अन् एके रात्री स्वप्नातच त्यांच्या डोळ्यासमोर कश्चिद् कान्ता विरहगुरुणा स्वाधिकारात् प्रमत्त:या मेघदूतातील पहिल्या श्लोकाचा अनुवाद प्रकटला. त्यानंतर जागं झाल्यावर बोरकरांनी एका धुंदीतच मेघदूतकाव्याचा अनुवाद पूर्ण केला. तो अनुवाद करताना बाकिबाबांच्या मनात, डोळ्यात किंबहुना शरीरात काय झिंग असेल, याचा अनुभवच राजश्री शिर्के व त्यांच्या शिष्यांनी केलेल्या नृत्यातून येत होता. असाच अनुभव प्रसिद्ध लेखिका-कवयित्री अरुणा ढेरे यांनी बोरकरांच्या कवितेच्या केलेल्या विश्लेषणातूही आला. खरं तर ते विश्लेषण नव्हतंच. बोरकरांच्या कवितेचा आस्वाद कसा घ्यायचा, याचं जणू प्रात्यक्षिकच अरुणा ढेरे यांनी रसिकांसमोर सादर केलं.

बोरकरांच्या रसमयी, नादमयी, रूपमयी. चित्रमयी आणि नृत्यमयी कवितेचाच हा सारा आविष्कार होता. जीवनाच्या नानाविध अंगांना स्पर्श करणारी बोरकरांची कविता या सा-यांतून पुन्हा एकदा रसिकाभिमुख झाली. जणू बाभच पुन्हा एकदा रसिकांना भेटले.      

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0