95 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा..
अॅनिमेशन, स्पेशल इफेक्ट्स हा आजच्या काळाचा मूलमंत्र आहे. भारतीयांनी या क्षेत्रात अगदी अमेरिकेपार झेंडे लावले आहेत. आता जगातला सर्वात खर्चिक अॅनिमेशनपट भारतात तयार झाला आहे. येत्या काही आठवडय़ांत तो प्रदर्शित होईल. चारशे अॅनिमेटर्स आणि इतर शेकडो कलाकारांच्या मेहनतीतून हा सर्वात महागडा अॅनिमेशनपट तयार झाला आहे. ९५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढं बजेट आणि चार वर्षाची अथक मेहनत यांच्या माध्यमातून तयार झालेल्या ‘लवकुश’ अॅनिमेशनपटावर एक प्रकाशझोत
भारतीयांचं आवडतं काव्य कोणतं, असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर हमखास ‘रामायण’ हेच असतं. अर्थात, रामाने रावणवध करून रामराज्य आणलं इथपर्यंतच या रामायणाचं ज्ञान अनेकांना असतं. रामाने सीतेचा त्याग केल्यानंतर सीतेचं वास्तव्य वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात होतं. तिथे तिने लव-कुश या जुळ्या बालकांना जन्म दिला. पुढे ते मोठे पराक्रमी वीर म्हणून उदयास आले, ही माहितीही आपल्यापैकी अनेकांना असते. मात्र लवकुशांचं बाल्य, सीतेचे त्यांच्यावरचे संस्कार, अश्वमेध यज्ञाचा अश्व अडवून त्यांनी रामापुढे उभं केलेलं आव्हान आणि नंतर रामाबरोबरची त्यांची भेट या सा-या विषयीची जिज्ञासा बालकांच्याच नव्हे तर मोठय़ांच्याही मनात आहे. हीच जिज्ञासापूर्ती करण्याचं आव्हान ‘रायडू व्हिजन मिडीया लिमिटेड’ या हैदराबादच्या मनोरंजन कंपनीने पेललं आहे. अॅनिमेशन तंत्राच्या वापराने त्यांनी निर्माण केलेला ‘लवकुश’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे.
हैदराबाद हे निजामी संस्कृती जपणारं भारतातलं एक सांस्कृतिक शहर. आंध्र प्रदेशची राजधानी असलेल्या या शहरात भारतातली सगळय़ात मोठी तेलुगू चित्रपट इंडस्ट्री आहे. आज भारतात सर्वात महागडे चित्रपट निर्माण करणारी इंडस्ट्री म्हणून तेलुगू चित्रपट इंडस्ट्रीकडे पाहिलं जातं. आपल्या याच प्रतिष्ठेला जपत ‘लवकुश’ या चित्रपटाची निर्मिती ‘रायडू व्हिजन मीडिया लिमिटेड’ने केली आहे. इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये या चित्रपटाचं डबिंग करण्यात आलं आहे. या चित्रपटाच्या कामाला प्रत्यक्षात 2006 साली सुरुवात झाली. चित्रपट करायचा तर तो भारतीय संस्कृतीशी निगडितच करायचा, असा निर्धार रायडू यांनी केला. शशांक रायडू यांनी या चित्रपटाच्या क्रिएटिव्ह डायरेक्टर पदाची धुरा सांभाळली आणि सुरुवात झाली एका महानिर्मितीला. या चित्रपटाच्या निर्मितीत कुठेही तडजोड करायची नाही हे आधीच निश्चित करण्यात आलं होतं. चित्रपटासाठी दिग्दर्शक म्हणून देवला सत्यम यांची निवड करण्यात आली. वीस वर्षांच्या कारकीर्दीत दोनशेहून अधिक तमिळ, तेलुगू, कन्नड चित्रपटांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. या चित्रपटाच्या इतर अंगांसाठीही तशाच ताकदीच्या कलावंताची निवड करण्यात आली. अॅनिमेशन चित्रपटांचा आत्मा म्हणजे या चित्रपटाचा आवाज असतो. संगीत आणि संवाद यांचा मिलाफ अॅनिमेशनपटात महत्त्वाचा असतो. ‘लवकुश’ या चित्रपटाला दिवगंत एल. वैद्यनाथन यांनी संगीत दिलं आहे. ‘मालगुडी डेज’ या मालिकेच्या त्यांच्या संगीताची जादू आजही रसिकांच्या मनावर कायम आहे. भारतीय व पाश्चिमात्य वाद्यांचा संगम त्यांच्या संगीतात पाहायला मिळतो. त्यामुळेच प्रभावी पार्श्वसंगीत हे या चित्रपटाचं एक वैशिष्ट्य ठरेल. या चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत. ती येशुदास, विजय येशुदास, शंकर महादेवन, चित्रा आणि साधना सरगम यांनी गायली आहेत.
द्विमिती अॅनिमेशन प्रकारात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. विविध पात्रं, वातावरणनिर्मिती आणि रोमांचक दृश्यांमुळे केवळ लहान मुलांनाच नव्हे तर प्रौढांनाही हा चित्रपट आवडेल, असा विश्वास दिग्दर्शक देवला सत्यम यांनी व्यक्त केला आहे. या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीत पात्रांसाठी अनेक नावाजलेल्या कलाकारांनी आपला आवाज दिला आहे. रामाच्या भूमिकेला ‘रामायण’ या हिंदी मालिकेतील लोकप्रिय राम अरुण गोविल यांचा आवाज लाभला आहे. हनुमानाच्या भूमिकेला दारासिंग पुत्र विंदू, तर वाल्मिकींना सुधीर पांडे यांनी आवाज दिला आहे.
कलाकारांशिवाय केवळ तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्याला हवी ती कथा पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न या अॅनिमेटेडपटातून करण्यात आला आहे. हैदराबाद इथल्या ‘रायडू अॅनिमेशन स्टुडिओ’त या चित्रपटाची संपूर्ण निर्मिती करण्यात आली. चित्रपटाच्या तांत्रिक अंगासाठीच तब्बल चारशे तंत्रज्ञ राबत होते. अगदी चित्रे काढण्यापासून ते संगणकावर काम करण्यापर्यंत सर्व प्रकारच्या कामांचा त्यात सहभाग होता. या सा-यांची ही मेहनत प्रत्यक्ष पडद्यावर पाहणं हा खरोखरच एक रोमांचक अनुभव असेल.
‘लवकुश’ हा चित्रपट केवळ लहान मुलांसाठी नाही, तर तो सर्व वयोगटातल्या लोकांनी पाहावा अशी निर्मात्यांची अपेक्षा आहे. केवळ पौराणिक सत्य सांगणं एवढाच या चित्रपटाचा उद्देश नसून त्यातून मनोरंजनावरही भर देण्यात आला आहे. या चित्रपटातले विविध प्रसंग अत्यंत परिणामकारक झालेत. आश्रमाबाहेरील जंगलात बाल लवकुशांची विविध प्राण्यांबरोबर असलेली मैत्री, खार-कासव व इतर पक्षी, जंगलातलं जग असो किंवा अगदी रामाबरोबरच्या युद्धाचे प्रसंग असोत, सिनेमात दृश्यांचा परिणाम अप्रतिम साधल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच भारतीय चित्रपटाच्या इतिहासात त्याचप्रमाणे अॅनिमेशनपटांच्या इतिहासात हा चित्रपट मानाचा तुरा खोवणार आहे निश्चित!



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा