PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: मर्कटलीला मर्कटलीला ================================================================================ संजय राणे on 20 February, 2010 06:45:00 AM सह्याद्रीच्या घनगर्द जंगलात जसे वाघ आहेत, बिबटे आहेत, गवे आहेत.. कोल्हे, अस्वले आणि अन्य प्राणीही आहेत. तसेच टोळीने राहणारे आदिमानवाचे वंशजही आहेत. सह्याद्री ओसाड झाली आणि या मारुतीरायाच्या वानरसेनेने सह्याद्रीचा पायथा गाठला. हत्तींच्या मुक्त संचाराने आणि गवारेडय़ांच्या गावातील वावराने भयभीत झालेले शेतकरी बागायतदार आता आणखी चिंतेच्या डोहात कोसळले गेले आहेत. बिबटय़ाही जंगल सोडून वस्तीकडे वळला आहे. तर वानरसेना घराच्या छपरावर पोहोचली आहे. या मर्कटलीलांच्या स्वैरसंचाराने सारेच गप्पगार झाले आहेत. सह्याद्रीच्या कुशीतून जाणारा घाटरस्ता हा एक मनोहारी प्रवास असतो. या प्रवासात झाडे जशी साथ करतात, तशीच वळणे साथ देतात. रस्ता वळवळत पुढे जात असतो. अशा एका अवचित वळणानंतर आपल्या पूर्वजांच्या वंशजांची पिलावळ दिसू लागते. त्यांची वस्ती सुरू होते. घर बांधता कधी न आलेली ही माकडे येणा-या-जाणा-यांचे मनोरंजन करत भक्तांकडून मिळालेला प्रसाद खात बागडत असतात. वैभववाडीतून करूळ घाटातून गगनगिरी गडावर पोहोचताना वानरसेनेच्या राज्यातून पुढे जावे लागते. तोच प्रकार फोंडाघाटच्या खिंडीत पाहायला मिळतो. फरक एवढाच फोंडाघाटच्या खिंडीतील वानरसेना झाडावरून उडय़ा घेत रस्त्यापर्यंत पोहोचतात आणि करूळ घाटातील वानरसेना तुमच्या हातातील पिशवी केव्हा घेऊन जाईल हे सांगता यायचे नाही. आंबोली घाटातही वानरसेनेचे प्रताप असेच पाहायला मिळतात. हुप्पऽऽ असा आवाज करत त्यांचं लगबगीचं पळणं लक्षवेधी ठरते पण घाटातून ही टोळी आता सह्याद्रीच्या गावांमध्ये उतरली आहे. कालपर्यंत घाटात थांबलेली ही वस्ती आता गावात उतरली आहे. घराची कौले काढून चुलीवर शिजत असणा-या जेवणाचे पातेले उचलून नेत आपला बेत मांडण्याचा प्रयत्न ते करतात. मारुतीरायाने रावणाच्या लंकेत जसा बाग उद्ध्वस्त केली तसाच खेळ या पूर्वजांच्या वंशजांनी मांडला आहे. नारळाच्या पेंडीच्या पेंडी तोडून टाकताना त्यांना काहीच वाटत नाही. या माकडांना वर्ज्य काहीच नाही. ते जेवढे खातात त्यापेक्षा नासधूस अधिक करतात. आंबा, केळी अगदी नारळ, नाही तर बांबूचे कोंबही त्यांना चालतात. नारळाला जे तीन डोळे असतात तेथून नारळ फोडून खाण्याची कला त्यांना चांगलीच अवगत आहे. तयार झालेल्या आंब्याचा वास, पेरूचा वास, चिकूचा वास, बागायतदारांपेक्षा यांनाच आधी लागतो. बरं हवे तेवढे खायचे, निघून जायचे असेही होत नाही. येताना कळप येतो आणि खाण्यापेक्षा नुकसान करूनच अधिक जातो. फणसाच्या कुव-याच या धाडीपुढे मस्तक टेकतात. कोकणचा फणस सर्वत्र प्रसिद्ध पण या माकड धाडीमुळे सह्याद्रीच्या अनेक गावांना फणसाची भूक भागविण्यासाठी अन्य गावात पोहोचणे भाग आहे. घरांची कौले काढून माजघरात प्रवेश करणा-या माकडांचा धसका तर अनेक मंडळींनी घेतला आहे. गावात शेतीत राबणारी माणसे अधिक. दिवसाचे बहुतांश तास शेतातच जातात. घरात एखाद् दुसरे माणूस असते. काही घरे कुलूपबंदच असतात. जेवण सकाळीच तयार होते. बिलंदर माकडांना त्याचा वास कसा लागतो समजत नाही. कौले-नळे काढून माकडे माजघरात पोहोचतात. जेवणाची भांडी पळविली जातात. अशावेळी कोणी पाहिलेच आणि पाठलाग केला की छपरावर मोठी धावपळ उडते, पळापळ सुरू होते. या पळापळीत छपराची भयानक नासधूस होते. त्यांच्या प्रत्येक उडीत कौले फुटून जातात. शेतक-याला हतबल होऊन पाहण्याशिवाय काहीच उरत नाही, अशा नुकसानीची नोंद महसूल विभाग करून घेत नाही आणि वन विभागाची मंडळी माकडांना रोखू शकत नाहीत. माकडांचा उपद्रव थांबविण्यासाठी माकडे मारणे हा पर्याय होऊ शकत नाही. मुळात माकडांचे जे खाणे आपण हिरावून घेत आहोत ते त्यांना परत मिळवून द्यायला हवे, डोंगर पुन्हा हिरवेगार व्हायला हवेत, देवराई पुन्हा गच्च व्हायला हव्यात, पूर्वजांच्या वंशजांना ताळय़ावर आणण्यासाठी आता नवी मोहीम आखावी लागणार आहे. ंं