लाभले अम्हास भाग्य
एखाद्या गाण्याशी भव्यतेची जेवढी परिमाणं जोडता येतील तेवढी जोडण्याचा प्रयत्न कौशल इनामदारने संगीत दिलेल्या मराठी अभिमान गीतामध्ये केला गेलाय. आज २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिवसाचं औचित्य साधून ठाण्याच्या दादोजी कोंडदेव पटांगणात या गाण्याचं तितकंच भव्य प्रकाशन होईल.
तसं मराठीशी भव्यदिव्य असं काही जोडलंच गेलेलं नाही असं नाही. म्हणजे संतकाव्याची परंपरा आहे, शिवाजी महाराजांचे गड-किल्ले आहेत, पंढरीची नेमाने निघणारी वारी आहे, वैचारीक, सामाजिक चळवळींची पार्श्वभूमी आहे, झालंच तर प्रभातचे सिनेमे आहेत, रंगभूमीची, लोककलांची गौरवशाली परंपरा आहे. तरीही का कोण जाणे, या सगळ्यातून मराठीला ओव्हरऑल भव्यपणा येण्यात काही तरी कसर राहूनच जाते. मराठीवरचा डाऊन मार्केटचा शिक्का इतर भाषिकांच्या आणि आपल्याही मनामध्ये इतका घट्ट बसला आहे की, त्यातून बाहेर पडणं काही केल्या शक्य होत नाही. अशा एकूणच निराशाजनक वाटणा-या पार्श्वभूमीवर एखादं ‘अप्सरा आली..’ धूम उडवून देतं, एखादा ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ भारताकडून ‘ऑस्कर’ला पाठवला जातो आणि मराठीचे चांगले दिवस परतताहेत असं मराठीप्रेमींना वाटून जातं.
नव्या पिढीचा गुणी संगीतकार कौशल इनामदार याने असंच काहीसं काम आपल्या संगीताच्या माध्यमातून आरंभलं आहे. मराठीचं कधी नव्हे इतकं भव्य अभिमानगीत रचण्याचं. गेलं दीड वर्ष त्याचं हे काम सुरू आहे आणि बातम्यांमधूनही या ना त्या कारणाने गाजतही राहिलं आहे. कधी त्याने साडेतीनशेहून अधिक लोकांना घेऊन जगभरात कधीही कुठेही झालेला नाही इतका भव्य कोरस रेकॉर्ड केल्याचं वाचण्यात येतं. कधी चेन्नईला जाऊन थेट रेहमानच्या स्टुडिओत गाण्यावर ध्वनिसंस्कार केल्याचं कळतं. कधी हरिहरन, शंकर महादेवन वगैरे हिंदीतली बडी मंडळी या गाण्यामध्ये गायल्याची बातमी होते. बिश्वदीप चॅटर्जी या देशातल्या सध्याच्या सगळ्यात मोठय़ा ध्वनिसंयोजकाने या गाण्यावर काम केल्याचं कळतं. या सगळ्याचा एकत्रित परिणाम नेमका कसा असणार आहे आणि सुरेश भटांच्या लेखणीतून उमटलेलं
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी.
हे काव्य मराठीचं अभिमान कसं बनलं आहे, हे आज संध्याकाळी ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर या गीताच्या प्रकाशन सोहळ्यासाठी जमलेल्या मराठीप्रेमींना प्रत्यक्षच अनुभवायला मिळेल. खुद्द कौशलही या कार्यक्रमाच्या यशाबद्दल आता खूपच पॉझिटीव्ह आहे. ‘एकूण प्रकल्पाचं स्वरुप पाहता कार्यक्रम मोठय़ा स्केलवरच व्हायला हवा. पण माझी आणि माझ्या सहका-यांना तशी खात्री नव्हती की आम्ही ते हाताळू शकू. त्यामुळे समर्थ सेवक मंडळाच्या दोन हजार क्षमतेच्या पटांगणावर तो आम्ही करणार होतो. पण आम्हाला मिळत चाललेल्या प्रतिसादामुळे जाणवलं की, ही जागा कमी पडणार. प्रायोजकही सरसावून पुढे यायला लागले. मग कार्यक्रम स्टेडिअमवर करण्याचं ठरवलं आणि तिकिटं लावण्याऐवजी खुलाच केला. असं शेवटच्या क्षणी जागा बदलल्यामुळे येणा-या अडचणी भरपूर आहेत, पण हा त्रास हवाहवासा आहे.’ तो सांगतो.
कलाकारांनी प्रांत, भाषा, धर्म जातींच्या संकुचित सीमांमध्ये अडकू नये, असं म्हणतात आणि कौशल तर स्वत: कॉस्मोपॉलिटन म्हणावं अशा वातावरणात वाढलेला. इंग्रजी माध्यमात शिकलेला, हिंदी, इंग्रजी, उर्दूवरही तितकंच प्रेम करणारा. त्याने या भाषेच्या अस्मितेच्या मुद्दय़ाबद्दल एवढं आग्रही कशाला असायला हवं, असा प्रश्न साहजिकच पडतो. त्याचं स्पष्टीकरण तो अगदी तर्कनिष्ठ पद्धतीने देतो. ‘मी पाचगणीच्या पब्लिक स्कूलचा विद्यार्थी. मराठीचे कोणतेही संस्कार तिथे झाले नाहीत. पण कॉलेजमध्ये आल्यावर मी ‘कुण्या एकाची भ्रमणगाथा’ वाचलं. त्याच वेळी नाटकाच्या निमित्ताने चेतन दातारशी संपर्क आला तेव्हा लक्षात आलं मराठीत जे लिहिलं जातंय, इथे जे सांस्कृतिक काम होतंय त्याचा माझ्या आयुष्याशी अगदी थेट संबंध आहे. इंग्रजी वाचन अत्यंत उत्तम असूनही मराठीबाबत हे वेगळेपण जाणवलं आणि तेव्हा माझी मातृभाषेबद्दलची जाणीव जागी झाली. मुळात मला असं कधीच वाटलं नाही की, कुठचीही भाषा ही श्रेष्ठ-कनिष्ठ असते. प्रत्येक भाषेशी तिची अशी संस्कृती जोडलेली असते. रोजचा व्यवहार जोडलेला असतो.’ तो सांगतो.
गाण्यामागच्या प्रेरणेचा शोध घेताना ब-याच वर्षांपासूनचे प्रसंग घटना मग आठवत जातात. तो सांगतो, ‘2005 साली भरलेल्या पहिल्या मुंबई फेस्टिव्हलच्या भव्य उद्घाटन सोहळ्यात मला एक गाणं करण्याची संधी मिळाली. पाडगावकरांनी लिहिलेली ती प्रार्थना 63 लहान लहान मुलांनी गायली.
तुझा सूर्य उगवे आम्ही प्रकाशात न्हातो.
तुझे गीत गातो देवा तुझे गीत गातो..
या पाच मिनिटांच्या मराठी गाण्यानंतर पुढच्या तीन तासांच्या कार्यक्रमात नाना पाटेकरचं उत्स्फूर्त भाषण सोडलं तर मराठीचं एक अक्षरही उच्चारलं गेलं नाही. मध्यंतरी असंही लक्षात आलं की एकाही खासगी एफएम वाहिनीवर एकही मराठी गाणं लागत नाही. माझ्या एका रेडिओ जॉकी मित्राला मी त्याबद्दल विचारलं. तो म्हणाला, ‘ती आमची पॉलिसी आहे.’ म्हटलं, तुमची महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी गाणं न लावण्याची पॉलिसी आहे? भारताच्या आणखी कुठच्या शहरात तुमची अशी पॉलिसी आहे? कोलकत्यात बंगाली गाणं लावणार नाही वगैरे. मुंबई कॉस्मोपॉलिटन आहे,असं तो म्हणाला खरा पण नंतर ऑफ द रेकॉर्ड हे ही म्हणाला की मराठी गाणं लावलं तर एक डाऊन मार्केट फिल येईल असं आमच्या वरिष्ठांना वाटतं. म्हटलं एखादी भाषाच डाऊन मार्केट असते, हे असं कसं ठरवलं जातं?आणि मराठीच्या बाबतीत म्हणायचं तर ‘युनेस्को’च्या पाहणीनुसार जगात सहा हजाराहून अधिक भाषा, बोलीभाषा आहेत, त्यात सर्वाधिक प्रमाणात बोलल्या जाणा-या भाषांच्या यादीत मराठीचा क्रमांक पंधरावा आहे. अशी भाषा डाऊन मार्केट कशी?’ पण या सगळ्याला कुठे तरी मराठी माणसाच्या मनातला न्यूनगंडच कारणीभूत आहे, हेही त्याला जाणवतं. ‘मित्रांना मी हे सांगायचो तेव्हा ते म्हणायचे जग जवळ येण्याच्या या काळात भाषेचा मुद्दा कुठे उरलाय? तू प्रगतीच्या बाबतीत बोल. पण म्हटलं प्रगतीचा मुद्दाही थेट भाषेशीच निगडित आहे. आपण जे आहोत, ज्या भाषेचे आहोत, त्याबद्दल आपल्यालाच आतून चांगलं वाटत नाही तोपर्यंत कुठची प्रगती साध्य होणार आहे? जगात श्रेष्ठ ठरलेल्या सगळ्या कलाकृती मातृभाषेतच रचल्या गेल्या आहेत. कुरोसावाने जगाची भाषा इंग्रजी म्हणून आपले सिनेमे इंग्रजीतून काढले का? टागोरांना नोबेल त्यांच्या बंगाली काव्यासाठी मिळालंय. आणि जितके जास्त प्रादेशिकतेशी तुम्ही जोडले जाल तेवढे चांगल्या पद्धतीने तुम्ही ग्लोबल होत जाणार, हे तर एक सर्वमान्य सत्यच आहे. म्हणून मुळात हा स्वभाषेबद्दलचा गंड जायला हवा.’ कौशल सांगतो. इथे राजकारण्यांना शिव्या घालत बसण्यापेक्षा आपण काही करू शकतो का?या प्रश्नावर विचार करताना आपण संगीतकार आहोत तर आपण गाणं करू शकतो या उत्तराशी तो पोहोचला. असं गाणं ज्याला डाऊन मार्केट म्हणण्याची कुणाची टापच होणार नाही. ‘सुरुवातीला मी एकटाच माझ्या या संकल्पनेबद्दल सगळ्यांजवळ भरभरून बोलत असायचो. ऐकणा-यांच्या प्रतिक्रिया दोन प्रकारच्या. एक म्हणजे असं काही होणं शक्य नाही. दुसरी, एका गाण्याने काय होणार आहे? दोन्हीसाठी माझ्याकडे उत्तर होतं. म्हटलं सुरुवात कुठून तरी करायलाच हवी. हिमालय गाठायचा तर आहे, पण घराबाहेर पाऊल मात्र मी टाकणार नाही, असं कसं चालेल.’ तो विचारतो. लोक आपोआपच या प्रकल्पाशी जोडले जाऊ लागले. पाहता पाहता साडेतीन लाखांचं आर्थिक पाठबळ फक्त इच्छुकांच्या प्रत्येकी पाचशे रुपयांच्या हातभारातून उभं राहिलं.
कौशलच्या संपर्कातले सगळे मराठी गायक अगदी शंकर महादेवन, हरिहरनसारखे मराठीप्रेमी अमराठी गायकही या गाण्यात एकेक ओळ गायला तयार झाले. श्रीधर फडके, आरती अंकलीकर, सत्यशील देशपांडे, विठ्ठल उमप अशी मोठय़ा नावांची मांदियाळीच इथे जमली. कौशलच्या पिढीच्या गायक, संगीतकारांपैकी तर जवळ जवळ प्रत्येकानेच आपला स्वर या गाण्याला देऊ केला. ‘मराठी माणूस एकत्र येत नाही ही दंतकथा आहे, असं वाटावं इतका चांगला हा अनुभव आहे.’ तो सांगतो.अनेक खटपटी, धावपळींनंतर आता कौशलचं गाणं प्रदर्शनासाठी सज्ज आहे. ऐकताक्षणी डोळ्यांसमोर महाराष्ट्राच्या भव्यतेचं सगळं वैभव उभं राहावं इतकं ते छान जमलं आहे. महाराष्ट्राच्या नामवंत मंडळींच्या उपस्थितीत हे गाणं आज लाइव्ह सादर होईल तेव्हा तिथे हजर मराठीप्रेमींचा ऊर अभिमानाने नक्कीच भरून येईल. पण या गाण्याची खरी कसोटी खरं तर पुढेच आहे. कौशल म्हणतो तसं या गाण्यामुळे मराठीवरचा डाऊन मार्केट असण्याचा शिक्का काही अंशी तरी पुसला जाईल का? मुजोर ‘एफएम’ वाहिन्या यानंतर मराठी गाणी वाजवतील का? आणि मुख्य म्हणजे मराठी माणसाच्या मनातला स्वत:च्याच भाषेबद्दलचा न्यूनगंड पुसायला हे सूर हातभार लावतील का? कौशल आणि त्याच्या सहका-यांचा हा प्रयत्न मराठी माणसाच्या क्षणिक भावनेलाच केवळ हात घालतो की बुद्धीलाही आवाहन करण्यातही यशस्वी होतो, त्यावरच त्याचं यश ख-याअर्थी अवलंबून असणार आहे.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा