PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: कॅमे-यासमोरील गर्दीचा चेहरा कॅमे-यासमोरील गर्दीचा चेहरा ================================================================================ राजेश शिरभाते on 27 February, 2010 08:00:00 AM आशुतोष गोवारीकरच्या ‘जोधा अकबर’ चित्रपटातलं ‘अजिमोशान शहंशाह’ हे गाणं, चित्रपटातली अनेक युद्धाची दृश्यं, बाजारातली दृश्यं. ‘सरकार राज’मध्ये शेवटच्या प्रसंगात सरकारला म्हणजेच अमिताभ बच्चनला अटक करण्यात येतो तो प्रसंग. ‘मोगल-ए- आझम’ या चित्रपटातली अनेक दृश्यं. अनेक चित्रपटांमधून दिसणारी वेगवेगळ्या प्रसंगांतली गर्दी. गर्दीला चेहरा नसतो असं म्हणतात. मात्र या गर्दीला एक भावना असते. त्या गर्दीमधून एक वातावरण निर्माण होत असतं. चित्रपटांच्या प्रभावासाठी दृश्यं अधिक वास्तव वाटण्यासाठी अशा प्रकारच्या गर्दीच्या प्रसंगांची आवश्यकता असतेच असते. कसं असतं या गर्दीच्या दृश्यांचं चित्रीकरण? काय काय करावं लागतं त्यासाठी दिग्दर्शकाला, निर्मात्याला आणि तंत्रज्ञांना? कुठून आणतात ही गर्दी? कसं काय मॅनेज करतात, या गर्दीला? या सा-या प्रश्नांची उत्तरं शोधणं खरोखरच मनोरंजक आहे. पडद्यावर काही मिनिटांसाठी दिसणा-या या दृश्यांसाठी किती तरी दिवसांची मेहनत असते. त्यासाठी अफाट खर्च आणि अनेकांचे श्रम यातून घडतात ही दृश्यं. अशाच एका गर्दीच्या चित्रीकरणाचा घेतलेला हा आढावा. एक-दोन कलाकारांच्या साहाय्याने एखाद्या दृशाचं चित्रीकरण करणं वेगळं आणि या इतक्या लोकांना घेऊन चित्रीकरणं करणं वेगळं. दिग्दर्शक सुभाष काळे यांच्या ‘मोहन आवटे’ या चित्रपटातलं असंच एक गर्दीचं दृश्य कुर्ल्याला दूध डेअरीच्या परिसरात चित्रित करण्यात आलं होतं. अर्थात, आता या ठिकाणी एक बांधकाम होत असलेला फ्लायओव्हर आहे. त्या बाजूला असलेल्या एका हॉलमध्ये या गर्दीच्या दृश्याचं चित्रीकरण होणार होतं. दिग्दर्शक सुभाष काळे यांनी ही जागा निवडली होती. या विभागात मागवण्यात आलेल्या अनेक एक्स्ट्रा कलाकारांबरोबरच तिथल्या स्थानिकांनीही या चित्रीकरणात भाग घेतला होता. चित्रपटाच्या सेटवर मोठी गर्दी जमवण्यात आली होती. चित्रपटातली दोन प्रमुख पात्रं म्हणजे संजय नार्वेकर आणि अशोक शिंदे हे दोघेही उमेदवार आहेत. त्यांच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे आणि त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांची जी प्रतिक्रिया उमटते, ती चित्रित करण्यासाठीचा घाट घातलेला होता. तिथे असलेल्या एका लग्नाच्या हॉलचं रूपांतर सेटिंग डिपार्टमेंटने निवडणूक कार्यालयात केलं होतं. तिथे उभारण्यात आलेल्या फलकावरून आणि तिथल्या टेबलखुच्र्यावरून ते दिसून येत होतं. दिवसाचा प्रसंग असल्याने हेवी लाइट नव्हते, मात्र अनेक रिफ्लेक्टर्सच्या साहाय्याने आणि काही बेबी लाइटच्या साहाय्याने प्रकाशयोजना करण्यात आली होती. बेबी लाइटचं वैशिष्टय़ असं असतं की, ते माणसाच्या उंचीपेक्षा कमी उंचीवर लावले जातात. याचं कारण म्हणजे डे लाइटमध्ये कपाळाची सावली जी गालांवर पडते, ती झाकण्यात येते. त्यामुळे गर्दीवर काही बेबी लाइट्स आणि रिफ्लेक्टर्स सोडण्यात आले होते. प्रत्येक स्टँडच्या जवळ लाइटमन होते. काही ठिकाणच्या प्रकाशाची तीव्रता कमी करणारे बटर पेपर सोडण्यात आले होते. तर काही ठिकाणी काळ्या कपडय़ांच्या साहाय्याने प्रकाश थांबवण्यात आला होता म्हणजे ब्लॉक करण्यात आला होता. साऊंड मशिनने सिंक साऊंड ध्वनिमुद्रित करण्यावर भर देण्यात आला होता. या दृश्याचं डबिंग करून त्यात नंतर वेगळा आवाज भरण्यापेक्षा आहे, तो गर्दीचा, त्यांच्या कुजबुजीचा, त्यांच्या जल्लोषाचा आवाज दिग्दर्शकाला हवा होता. त्यासाठी थेट गर्दीच्या जवळ मात्र कॅमे-यात येणार नाहीत, अशा प्रकारे बूम धरून माणसांना उभं करण्यात आलं होतं. छायाचित्रणासाठी ट्रॉली लावण्यापेक्षा थेट जीमी जीप कॅमेराच वापरण्यात आला होता. एका उंच अशा कुठेही फिरता येणाऱ्या स्टँडवर हा कॅमेरा लावण्यात आला होता. हा कॅमेरा एका माणसाकडून ऑपरेट होतो. तो या कॅमे-याला कितीही उंचीवर खाली, आजूबाजूला करू शकतो. मॉनिटरजवळ दिग्दर्शक सुभाष काळे सगळ्यांना आवश्यक त्या सूचना देत आहेत. दोन कसलेले कलाकार आणि कॅमे-याचा अनुभव नसलेले अनेक जण अशा प्रकारचं ते दृश्य होतं. अर्थात, संध्याकाळी संजय नार्वेकर म्हणजेच ‘मोहन आवटे’ यांच्या जाहीर सभेचंही चित्रीकरण करायचं होतं. म्हणजे निवडणूक निकालाचं चित्रीकरण दुपारी आणि त्याच संध्याकाळी जाहीरसभेचं चित्रीकरण आहे की नाही सिनेमाची गंमत. चित्रीकरण सुरू झालं. त्या बरोबर सुरू झाली ती साहाय्यक दिग्दर्शकांची लगबग. सगळय़ांना एका रांगेत उभं करणं त्यांना इकडून तिकडे जाण्याच्या सूचना करणं. त्यातल्या त्यात चांगल्या दिसणा-यांना पुढे उभं करणं त्यांना थेट कॅमे-यात न पाहण्याच्या सूचना देणं, असं सारं सुरू होतं. पहिल्या शॉटमध्ये निवडणूक अधिकारी निकाल घोषित करतात आणि सगळे जण जल्लोष करतात, असा प्रसंग होता. निकालाचा शॉट झाला आणि जल्लोषाचा हा शॉट काही दिग्दर्शकाच्या मनाप्रमाणे झाला नाही. कारण गर्दीतल्या एकाने आपल्या जागेवरून डोकं पुढे करून निवडणूक अधिका-याकडे पाहण्याचा आगाऊपणा केला होता. त्यामुळे कॅमे-यात तो सीन बरोबर आला नाही. पुन्हा सूचना बोंबाबोंबी झाली. तो शॉट ओके झाला. अशा प्रकारच्या चित्रीकरणासाठी काही विशेष माणसांनाही आमंत्रित केलं जातं. ते पुढे असतात. बाकी हौशी गर्दीला त्यांच्या मागे उभं करण्यात आलं होतं. निवडणूक निकालाचा प्रसंग असल्याने नाशिक बाजा पथकही बोलावण्यात आला होता. चित्रपटात दोन पक्ष दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे त्यासाठी एकूण तीनशे माणसं एका ठिकाणी उभी करण्यात आली होती. त्याबरोबरच स्थानिक लोकांवर आणि बघ्यांवर कॅमेरा रोखून त्यांच्याही प्रतिक्रिया नोंदवण्यात आल्या होत्या. गर्दीच्या दृश्यातलं सगळ्यात मोठं आव्हान असतं, ते सूचना देण्याचं आणि ते पाळण्याचं. काही ठिकाणी या गर्दीतल्या लोकांना कॅमेरासमोर कशा हालचाली द्यायच्या किंवा कधी कधी खोटं खोटं हसायचं, हातवारे करायचं किंवा इकडून तिकडे जायचं इतकं जुजबी ज्ञानही नसतं. या क्राउडमध्ये प्रत्येकालाच समोर काय चाललं आहे, याचीही माहिती नसते. मात्र एकदा का कॅमेरा ऑन झाला की, तो आपल्याला हव्या असलेल्या हालचाली टिपत असतो. त्यामुळे एखाद्याची एकही साधी किंवा कथाबाह्य अ‍ॅक्शन सगळा सीन बिघडवू शकत असते. या गर्दीत विविध वयोगटातली माणसं होती. म्हणजे काही कॉलेजची मुलं, काही मध्यमवयीन माणसं, काही स्त्रिया, मुली. त्याच्या विविध भाव टिपण्याच्या सूचना साहायक दिग्दर्शक आणि कॅमेरामन यांना देण्यात आली होती. अनेक वेळा असं असतं की, अमूक एक गोष्ट करा, असं सांगून त्यांना करता येत नाही. त्यामुळे या कलाकारांच्या हालचाली टिपण्यासाठी त्यांच्या नकळत त्यांच्यावर कॅमेरा आणून त्यांच्या हालचाली टिपाव्या लागतात. या सा-या गोष्टी विनासायास होण्यासाठी आवश्यक घटक कोणता तर तो एका साहाय्यक दिग्दर्शकाकडे असलेली शिटी. या शिटीच्या सूचनेवर सगळे काही करण्यात येते. अर्थात, गर्दीतल्या लोकांना सतत मोठ्याने ओरडून सूचना कराव्या लागतातच. दिग्दर्शक तर अशा वेळेस मोठय़ाने बोलण्यापेक्षा माईकवरून सूचना देण्याचं अधिक पसंत करतात. तरीही गर्दीच्या चित्रीकरणानंतर दिग्दर्शकाचा घसा बसतोच बसतो. काही दिग्दर्शक वॉकीटॉकीवरून सूचना देऊन आपल्यावरचा ताण थोडय़ाफार प्रमाणात हलका करतात इतकेच. गर्दीच्या एका एका सीनला नेहमीपेक्षा अधिक वेळ लागतो. काही वेळा गर्दीच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया चित्रित करून घेतल्या जातात आणि नंतर संकलनात त्यात आवश्यक ते बदल करण्यात येत असतात. मात्र आपल्या चित्रपटाप्रमाणे त्यातल्या वातावरणाप्रमाणे काही बेस शॉट हे घ्यावेच लागतात. गर्दीच्या या दृशांमध्ये कधी केवळ गर्दीच्या प्रतिक्रिया नोंदवून घ्यायच्या असतात. जसं एका सामन्याच्या वेळेस प्रेक्षकांची प्रतिक्रिया. ते तुलनेने सोपं असतं, मात्र जेव्हा गर्दीला अ‍ॅक्शन करायची असते, ते फारच अवघड असतं. उदाहरणार्थ, एखाद्या वेळेस काही संकटात पळण्याचं चित्रीकरण, दंगलींचं चित्रीकरण हे अधिक अवघड असतं. ‘युद्धस्य कथा रम्या:’ असं आपण सहज म्हणतो, मात्र युद्धाच्या प्रसंगाचं चित्रीकरण हे सगळय़ात अवघड असतं. एक तर मीडियम किंवा लाँग शॉटमध्ये दृश्यं चित्रित करायची, दिवसभर ही माणसं आपली पोझिशन म्हणजे जागा सोडणार, तर नाहीत ना, याची काळजी घ्यायची आणि नंतर त्यातल्या काही जणांचं एकमेकांबरोबरचं युद्ध जवळून चित्रित करायचं, हे फारच अवघड असतं. एका बाजूला लाइट जात असतो, दुसरीकडे जागेचं भाडं, इतरांचे पैसे आणि गर्दीसाठी मोजावे लागणारे पैसे यामुळे अनेक वेळा दिग्दर्शक गर्दीची दृश्यं टाळत असतात किवां संवादांमधूनच तो प्रसंग आपल्यासमोर आणतात. मात्र काही दिग्दर्शक ते आव्हान स्वीकारतात कितीही त्रास झाला तरी गर्दीच्या दृशांचं चित्रीकरण करतातच करतात. अवघड भाग गर्दीचे चित्रीकरण हा सिनेमातला सगळ्यात अवघड भाग असतो. तुम्ही कलाकारांना ज्या सूचना देता, त्याप्रमाणे त्यांच्याकडून काम करवून घेता येतं. गर्दीच्या बाबतीत ते शक्य नसतं. दिग्दर्शन टिमची ती कसोटी असते. सगळय़ा गोष्टींचं नियोजन करावं लागतं. असं असतानाही कधी कधी आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी या गर्दीच्या भागाचं संकलन करतानाही फार दक्षता बाळगावी लागते. कधी एखादा गंभीर प्रसंग असतो आणि एखादा माणूस हसताना दिसला तर तेही डोळ्यात तेल घालून पाहावं लागतं. माझ्या प्रत्येक चित्रपटात असे गर्दीचे प्रसंग असतातच. ‘पांगिरा’ जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा आम्ही दीड-दोन हजार लोकांच्या गर्दीचं एक दृश्य चित्रित केलं आहे. ‘१८ भुजा सप्तश्रुंगी’ या माझ्या चित्रपटासाठी आम्ही कोणालाही न कळू देता वणीच्या यात्रेचं चित्रीकरण केलं होतं. ‘ब्लाईंड गेम’ या चित्रपटासाठी गोदावरीच्या काठावरचा बाजार आम्ही लपवून ठेवलेल्या दोन-तीन कॅमे-यांनी चित्रबद्ध केला होता. दृश्य परिणामांसाठी गर्दीच्या चित्रीकरणाचा त्रास सहन करूनही ते करावंच लागतं. राजीव पाटील,दिग्दर्शक रोमांचक भाग गर्दीच्या चित्रीकरणाचा भाग एक कॅमेरामन म्हणून मला फारच उत्साहवर्धक आणि रोमांचक वाटतो. एक तर आपल्या सगळय़ा तांत्रिक ज्ञानाचा इथे कस लागत असतो. या चित्रीकरणासाठी मोठय़ा प्रमाणावर माणसांचं व्यवस्थापन लागत असतं. त्याचप्रमाणे मोठय़ा प्रमाणावर मॅनपॉवर लागत असते. कधी कधी काय असतं की, चित्रीकरणाची एक भाषा असते, ती या गर्दीला समजत नाही. त्यामुळे त्यांना सूचना देताना अनेक अडचणी येत असतात. ‘डोंबिवली फास्ट’ चित्रपटाच्या वेळी ऐन गर्दीतला सीएसटी स्टेशनचा परिसर आम्ही चित्रित केला होता. त्या वेळेस जे काम करावं लागलं, ते अविस्मरणीय होतं. माझ्या कारकीर्दीतला तो दिवस फारच रोमांचक होता. गर्दीचं चित्रीकरण करणं हे कॅमेरामन म्हणून आणि दिग्दर्शक म्हणूनही मला नेहमीच रोमांचित करत आलं आहे. संजय जाधव,दिग्दर्शक-छायाचित्रकार